• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

सह्याद्रीचे वारे - १२१

प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या दृष्टीनें, लोकशाही संघटनांचें कृतीकरण कोणत्या रूपांत करावें यासंबंधीं सर्व देशभर चर्चा चालू आहे. या गोष्टीलाच अनुलक्षून आम्हांला पंचायत राज्य निर्माण करावयाचें आहे, असें म्हटले जातें. परंतु या शब्दप्रयोगाच्या बाबतींत बरेच गैरसमज निर्माण झाले आहेत. कांहीं लोकांना असें वाटतें कीं, पंचायतींची कल्पना आपल्या देशांत फार जुनी आहे. पण मी असें सांगूं इच्छितो कीं, ग्रामपंचायतींची कल्पना आपल्या देशांत जुनी असली तरी आजच्या काळांत तिला एक नवीन अर्थ प्राप्त झाला आहे. या शब्दप्रयोगाच्या बाबतींत माझा व्यक्तिशः जो विचार आहे तो असा कीं, आमचें जें ग्रामीण जीवन आहे तें संघटित करून आम्हांला एक नवें ग्रामीण जीवन निर्माण करावयाचें आहे. ग्रामीण जीवन व त्या जीवनाची संघटना म्हटल्याबरोबर कांहीं मंडळींच्या डोळ्यांसमोर भूतकाळाचें चित्र उभें राहतें. परंतु माझ्या नजरेपुढे केवळ भूतकाळांतीलच ग्रामीण जीवनाचें चित्र उभें राहतें असें नाही. अर्थात् भूतकाळांतील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचें जरूर आकर्षण राहणार आहे. भूतकाळांतील चांगल्या परंपरा आहेत त्यांचा विसर पडून चालणार नाहीं हे मलाहि मान्य आहे. परंतु ज्या वेळीं ग्रामीण जीवन आणि पंचायत राज्य या शब्दांचा आपण उच्चार करतों त्या वेळीं एक गोष्ट लक्षांत घ्यावयास हवी ती ही कीं, आज दुनियेमध्ये ज्या नव्या शक्ति निर्माण झाल्या आहेत आणि जें नवें सामर्थ्य निर्माण झालें आहे त्या नव्या शक्तींनी आणि त्या नव्या सामर्थ्यानें आपल्या सामाजिक जीवनांत प्रवेश केला आहे. या शक्तींच्या आणि सामर्थ्यांच्या मदतीनें घडणारें उद्याच्या नवीन ग्रामीण जीवनाचें मी एक चित्र पाहत आहें. ग्रामपंचायत म्हणजे कुठल्या तरी म्हाता-या माणसाच्या नेतृत्वाखालीं तुम्हीआम्ही चांगले या भावनेंने काम करणारी एक संस्था अशा त-हेचें ग्रामपंचायतीचें चित्र माझ्या डोळ्यापुढें नाहीं. ग्रामपंचायत म्हटली म्हणजे माझ्या डोळ्यापुढे नवीन त-हेचें शिक्षण आणि नवीन त-हेच्या शक्ति उभ्या राहतात.

खेड्यापाड्यांतून सहकारी चळवळ आज सर्वत्र पसरत असून औद्योगिक विकासासाठी विद्युत शक्ति देण्यासंबंधीचे विचारच खेड्यापाड्यांत पोहोंचत आहेत असें नव्हे, तर या विचारांच्या पाठोपाठ विद्युत शक्तीहि खेड्यापाड्यांत जाऊन पोहोंचत आहे. त्याचप्रमाणें खेड्यापाड्यांतील जीवनावर फार महत्त्वाचा परिणाम करणारें नागरिक जीवनाचें आकर्षण लोकांत निर्माण झालें आहे. ह्या ज्या सर्व शक्ति निर्माण झाल्या आहेत त्यांचा विचार नजरेसमोर ठेवून ग्रामीण जीवनांतील लोकशाही संघटना आम्हांला उभी करावयाची आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या पाठीमागचा हा मूळ विचार, हा खरा विचार आहे. आपल्यासमोर जीं आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टें आहेत तीं कोणत्या पद्धतींची संघटना निर्माण केली असतां साध्य होऊं शकतील या दृष्टीनें या देशांत जो विचार झाला, त्या विचारांतूनच लोकशाही विकेंद्रीकरणाचा मार्ग निघाला. त्याचबरोबर ब्रिटिश अमदानीच्या काळांत लोकशाहीच्या ज्या प्रवृत्ति येथें निर्माण झाल्या त्यांतील कांहीं प्रवृत्ति हाताशीं धरून आपल्या देशांतील लोकशाही, सत्तेच्या विकेंद्रीकरणाने अधिक मूलगामीं रीतीनें गतिमान करतां येईल असाहि एक विचार प्रसूत झाला. विकेंद्रीकरणाच्या ह्या मूळ विचाराचा विस्तार करण्यासाठीं गेल्या चार-पांच वर्षात या देशांत अनेक त-हेची चर्चा झाली. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांत ग्रामपंचायत राज्याच्या रूपानें सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रयोग सुरू करण्यात आला. आतांपर्यंत राजस्थान, मद्रास आणि आंध्र या राज्यांत हा प्रयोग सुरू करण्यांत आला आहे. परंतु मला असें सांगावयाचें आहे कीं, अमक्या ठिकाणीं अमकी गोष्ट झाली आहे म्हणून लोकशाही विकेंद्रीकरण समितीनें त्या गोष्टीचें अनुकरण केलेलें नाहीं. तशा त-हेचें अनुकरण करावें असा आग्रहहि आपण धरतां कामा नये. इतर राज्यांत त्या दृष्टीनें चाललेल्या प्रयोगाचें नुसतें अनुकरण न करतां ज्या त्या विभागांतील अनुभव, परंपरा आणि राज्यकारभाराची परिस्थिति या गोष्टींचा विचार करून समितीनें हा अहवाल तयार केला आहे. त्याचप्रमाणें हा अहवाल तयार करतांना विकेंद्रीकरणाच्या प्रश्नाबाबत समितीकडे आलेल्या सूचनांचा विचारहि समितीकडून झालेला आहे.

विकेंद्रीकरणाच्या प्रश्नासंबंधीं या राज्यांत एकदोन त-हेचे विचारप्रवाह व प्रवृत्ति आढळून येतात. त्यांतील एक विचारप्रवाह असा आहे कीं, खेड्यापाड्यांतील ग्रामपंचायतींना सत्ता देण्याची फारशी आवश्यकता नाहीं. याचें कारण असें कीं, खेड्यापाड्यांतील ग्रामपंचायती ह्या निव्वळ अडाणी माणसांच्या हातांत जाणा-या संघटना असून त्यांत थोडासा जातीयवाद व सरंजामशाही वृत्ति आहे. त्याचप्रमाणें खेड्यापाड्यांत थोडेंसे गुंडगिरीचें वातावरणहि असतें. तेव्हां विकेंद्रीकरणामुळें अशा लोकांच्या हातांत सत्ता गेल्यास, काय घडेल ते सांगण्याची आवश्यकता नाहीं, परंतु माझ्या मतें अशा प्रकारचे जे विचार व्यक्त केले जातात किंवा विचार मांडण्याची ही जी प्रवृत्ति आहे ती सामाजिक जीवनाशीं सुसंगत नाहीं. कारण या देशांत लोकशाहीची वाढ करावयाची असल्यास लोकशाही विकेंद्रीकरणाशिवाय दुसरा मार्ग नसल्यामुळें विकेंद्रीकरणासंबंधींचा निर्णय आपण थोडा ध्येयपूर्वक घेतला पाहिजे. आणि या निर्णयानुसार ग्रामपंचायतींना अधिक सत्ता देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.