मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १८

१८. मैत्रीचे अतूट नाते – अनंतराव कुलकर्णी

टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना लोकमान्य पुण्यतिथीनिमित्त शाळेने निबंध स्पर्धा ठेवली होती. यशवंतरावांनी मला या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. लेखनासाठी त्या वेळी वैचारिक मार्गदर्शन केले. मला या स्पर्धेत बक्षीसही मिळाले, खूप कौतुक झाले. आपल्या जवळच्या मित्रांना बरोबर घेऊन यशवंतराव इंग्रजीतील कठीण भाग समजावून देत. टेनिसनसारख्या कविता ते मोठ्या कुशलतेने समजावून सांगत. स्वत: त्या वेळी वृत्तपत्रे व लेख वाचीत. वृत्तपत्राबद्दल त्यांना लहानपणापासून आकर्षण होते. या आकर्षणामुळेच त्यांनी अनेक वृत्तपत्रांना साहाय्य आणि मार्गदर्शन केले. साप्ताहिक ‘‘समर्थ’’ वर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यांनीच २३ नोव्हेंबर १९७४ रोजी मला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते ‘‘समर्थने जिल्ह्यात केलेल्या थोर कार्याची मला तरी नित्य आठवण राहील. समर्थच्या कार्याच्या यशासाठी जे काय सहकार्य माझ्याकडून अपेक्षित करीत असाल ते नित्य मिळत राहील असा विश्वास ठेवा.’’

यशवंतरावजींची मैत्रीच अशी होती की तेथे काही अपेक्षा करावी असे मनाला कधी स्पर्शूनच गेले नाही. त्यांचेच १९ मे १९७५ चे पत्र, मैत्रीचा अर्थ सांगते. ते या पत्रात लिहितात, ‘‘पंचेचाळीस वर्षांची तुमची माझी मैत्री आहे. ती तुम्ही जिव्हाळ्याने अजून ठेवली आहे. तुम्ही आशेने काहीच केले नाही, निव्र्याजपणे तुम्ही फक्त मैत्रीच केली.’’

‘‘कृष्णाकाठ’’ मध्ये यशवंतरावजींनी माझ्या मित्रत्वाचा उल्लेख केला आहे, त्यातही त्यांच्या या मित्रप्रेमाची ग्वाही आहे.

यशवंतरावजींचा जीवनप्रवास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषि-औद्योगिक क्षेत्रातील उत्तुंग कर्तृत्वाचे प्रतीक आहे. मोठेपणातही त्यांचे मोठेपण सातत्याने प्रत्ययास आले. छोट्यामोठ्या प्रसंगांतून त्यांचा जिव्हाळा आणि आपुलकी नेहमीच संस्मरणीय ठरली आहे.
 
१ डिसेंबर १९८३ च्या पत्रात आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात, ‘‘तुमच्या जीवनात छायाप्रकाशाचे अनेक प्रसंग आले. परंतु ते तुम्ही हसतमुखाने व धीमेपणाने सहन केलेत. समर्थला सातत्य देण्याचे मोठे यश तुम्ही मिळवलेत. तुमची माझी वारंवार भेट होत नाही पण तुमची आठवण नित्य असते. मित्रांचा स्नेह लागतो तो तुम्हास अमाप आहे. ’’