मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १६

१६.  कौटुंबिक मार्दव – धोंडीराम माळी

भारताच्या स्वातंर्ताचा नुकताच सूर्योदय झाल्याचा तो काळ होता. दक्षिणी संस्थाने विलीन झाली होती. विलीनीकरण झालेल्या विभागातून मुंबई असेंब्लीवर काही प्रतिनिधींची नेमणूक केली गेली होती.

या लोकशाही विरोधी घटनेस विरोध करण्याचा कार्यक्रम समाजवादी पक्षाने निश्चित केला होता. नियुक्त केलेले आमदार मिरज रेल्वेस्टेशनवरून मुंबईला असेंब्लीसाठी मिरज-मुंबई रेल्वेने जाणार होते. त्यांच्यासमोर निदर्शने करण्यासाठी आम्ही समाजवादी कार्यकर्ते मिरज रेल्वेस्टेशनवर जमलो होतो.

हे नूतन आमदार ज्या रेल्वेने जाणार होते त्याच रेल्वेने श्री. यशवंतरावजी चव्हाण व सौ. वेणूताई चव्हाण मुंबईला निघाले होते.

सौ.वेणूताई चव्हाणांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना काही दिवस मीशन हॉस्पिटल, मीरजमध्ये अॅडमीट केले होते. औषधोपचार घेऊन ते दोघे परत जात होते.

यशवंतरावजी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यांना पाहून मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी माझा हात हातात घेतला. ते मला घेऊन डब्यात गेले. त्यानी माझी सौ. वेणूतार्इंशी भेट घालून दिली. सौ.वेणूतार्इंची तब्बेत कृष झाली होती. त्यांच्या अंगी कमालीचा थकवा आला होता. त्या फिक्कट झाल्या होत्या. त्यांची प्रकृती पाहून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सौ.वेणूतार्इंच्याही डोळ्यांत पाणी तरारले. त्या दृश्याने धीरगंभीर यशवंतरावही गदगदले. आमच्या कुणाच्याही मुखातून एक अक्षरही उमटले नाही. फक्त अश्रूंच्या द्वारे मनातील व्यथेला वाट मोकळी करून दिली जात होती. मने हलकी हलकी होत होती.

देशाच्या राजकारणात सामील झालेल्यांना व्यक्तिगत दु:खावर एक कवच पांघरूनच वावरावे लागते, यात शंकाच नाही. परंतु सौ.वेणूतार्इंच्या आजारपणाने यशवंतरावजींच्या मनावर चांगलाच ओरखडा काढला होता. त्या झंझावाती जीवनातील कौटुंबिक मार्दवतेने माझ्या मनात कायमचे घर केले आहे.

क-हाड स्टेशनपर्यंत मी त्यांना सोबत केली.