मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २

२. एक सौजन्यशील व्यक्तिमत्त्व – श्रीमंत छ. राजमाता सुमित्राराजे भोसले

मा. यशवंतरावजींचे जीवन-चरित्र हीच एक मोठी आठवण आहे. अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी शिकत असतानाच समाज जाणला, राष्ट्र जाणले, स्वातंर्त्र्याची महती ओळखली. परकीय चाकरीचा मोह त्यांना आकर्षित करू शकला नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले यशवंतराव आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तास्थानावरून राष्ट्राची सेवा करणारे यशवंतराव चव्हाण विविध आव्हाने पेलू शकले. त्यांच्या राजकीय, सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रातल्या वाटचालीत त्यांची वैचारिक जडणघडण महत्त्वाची वाटते. त्यांच्या भेटीत आम्हाला त्यांच्या ठिकाणी असलेली वैशिष्ट्ये जाणवली ती अशी की, त्यांचे वाचन दांडगे होते. त्यांचे स्वत:चे ग्रंथालय विविध प्रकारच्या उपयुक्त ग्रंथांनी समृद्ध होते. त्यांची स्वत:ची कृति चिंतनशील होती. ते राजकीय नेते होते. परंतु त्यांचे नेतृत्व अभ्यासू होते. त्यांचे वागणे आणि बोलणे अत्यंत संयमशील असेच असायचे. सौजन्यशीलता हा त्यांचा स्थायीभाव होता. मोजक्या शब्दात परिणामकारकता कशी साधावी याचे कौशल्य त्यांनी साध्य करून घेतले होते.

यशवंतराव चव्हाणांनी विविध पदे भूषविली. परंतु या पदांवरून त्यांनी जे समाज प्रबोधन केले ते महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय ऐक्यभाव, एकात्मतेची गरज, सामाजिक समता, आर्थिक विषमता, अस्पृश्यता आणि जातिभेद, साहित्य शिक्षण व संस्कृती, कृषि औद्योगिक समाजरचना इत्यादी संबंधीची त्यांची विचारसरणी मार्गदर्शक स्वरूपाची आहे. त्यांचे ‘विचार-धन’ हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय होऊ शकेल.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे कर्तृत्व संपन्न वाटचालीचा उल्लेख अटळ आहे. प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण समारंभास भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. या सोहळ्याचे वेळी फलटणचे मालोजीराजे निंबाळकर आणि यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधानांचा हा कार्यक्रम अत्यंत समयसूचकतेने आणि कौशल्याने पार पाडला.

अनेक सभा-समारंभाच्या निमित्ताने मा. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातील विवेकाची आणि सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची जाणीव स्पष्ट होत असे. त्यांची बोलण्याची शैली श्रोत्यांना जिंकून घेणारी असे. वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा संगम झालेले यशवंतराव चव्हाणांचे सौजन्यशील व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र विसरू शकणार नाही.