मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ५

५. आम्ही एका जोडीचे – द. र. कोपर्डेकर

कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत असल्यापासूनच यशवंतराव चळवळीत भाग घेत असत. २६ जाने. १९३२ ला चावडीवर झेंडा लावायचा असे ठरवले. झेंडा लावला, पोलिसांनी डोईफोडे नावाच्या मित्राला पकडले. यशवंतराव निसटले. दुसरे दिवशी टिळक हायस्कूललमध्ये जाऊन हे.मा.कडून बोलावून घेऊन त्यांना पकडले. खटला होऊन शिक्षा झाली.

येरवड्याच्या कँप जेलमध्ये (राहुट्याच्या) १२ नं. च्या बराकीत त्यांना ठेवण्यात आले. त्या बराकीला विद्वानांची बराक म्हणत असत. त्यात आचार्य भागवत, एस.एम.जोशी, ह.रा.महाजनी, वि.म.भुस्कुटे, रावसाहेब पटवर्धन, राघु अण्णा लिमये वगैरेंना ठेवले होते. आचार्य भागवत रोज काही तास मराठी वाङ्मय, काव्य यावर बोलत असत. केशवसुतांवर त्यांनी ८।१० दिवस रसग्रहण कसे करावे हे समजावून देऊन आपले विचार मांडले. तसेच सावरकरांच्या सुप्रसिद्ध कमला खंडकाव्याचा शब्द न् शब्द फोड करून ते काव्य शिकवले. यशवंतरावांचा व माझा असे बिस्तारे शेजारी शेजारी. रोज आम्ही संपूर्ण कमला काव्य आवडीने म्हणत असू.

रावसाहेब पटवर्धन यांनी ऑप्टन सिंक्लेअरच्या कादंब-या व गॉर्कीची मदर आणली होती. ती सर्व पुस्तके यशवंतरावांनी अभ्यासली.

प्रसिद्ध संस्कृत पंडित ह.रा.महाजनी यांनी आम्हाला ‘शाकुंतल’ समजावून सांगितले. मी व यशवंतराव शाकुंतल वरचेवर वाचत असू.

राघुअण्णांचा आवाज चांगला होता. आणि ते नाशिकचे राष्ट्रशाहीर गोविंद यांच्या कविता व यशवंत कवींची बंदिशाला -‘वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती’- ही कविता म्हणत असत. त्या ऐकून आम्हीही गुणगुणत असू. काँप जेलमध्ये म. गांधींचे सुपुत्र रामदास गांधी त्या वेळी होते. कर्नाटक, गुजराथ यामधील थोर थोर कार्यकर्ते यांच्या विचारांची देवाणघेवाण होत असे.

सहा महिन्यांनी येरवड्याहून विसापूर जेलमध्ये आम्ही गेलो. या जेलजवळ सुमारे एक मैल अंतरावर एक मोठा तलाव होता. तिथे आम्ही पोहायला जात असू. परिसर रम्य होता. तिथेही काम काहीच नसल्याने आम्ही खूप वाचन व चर्चा करीत असू. म. गांधींचे आफ्रिकेतील सहकारी रावजीभाई, ‘यंग इंडिया’चे मोहनलाल भट्ट, आमच्या बराकीत असल्याने आम्हाला म.गांधींचे जीवन व विचार यांचा जवळून परिचय झाला.

विसापूर जेलमध्ये गुजराथी लोक जास्त. त्यामुळे यशवंतरावांना गुजराथीचाही (लिपीसकट) अभ्यास करता आला. उर्दूचे प्राथमिक ज्ञानही झाले.

या जेलमध्ये आम्ही राष्ट्रीय सण साजरे करत असू.

एस्.के.पाटील नुकतेच इंग्लंडला जाऊन आले होते. त्यांची इंग्रजीत व्याख्याने होत. त्यामुळे जगातल्या राजकारणाची आम्हाला ओळख होत होती.

विसापूरला आम्हाला खूप स्वातंत्र्य मिळण्याचे कारण म्हणजे तेथील आयरिश जेलर. तो काहीच पाहात नसे. एस.के.पाटीलच पाहात असत. जणू तेच कंट्रोलर त्यामुळे त्रास नव्हता आणि आचारविचार स्वातंत्र्य भरपूर. अभ्यासही करता आला.

तुरुंगातून सुटल्यावर अभ्यास पुन: चालू झाला. अकरावीचा अभ्यास करताना हे.मा.च्या समाधानासाठी संस्कृत घेतलेले. पण जिल्हाभर काँग्रेस संघटना बांधणे, कार्यकर्त्याशी चर्चा करणे यात वेळ जात असल्याने संस्कृतच्या कारिका, रूपे इत्यादी पाठ करण्याला वेळ झाला नाही. म्हणून ऐन वेळेला फॉर्म भरताना संस्कृतऐवजी मराठी हा विषय हे.मा.ला नकळत घेतला. महिनाभराच्या अभ्यासाने यशवंतराव मराठी विषयात पहिले आले! हे.मा.ला हा धक्काच होता.