• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३६

३६. संस्कारसंपन्न सौजन्यशीलता – बाबूराव पारखे

मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना प्रथम भेटलो. एक छोटासा कारखानदार फार मोठ्या प्रकल्पात उडी घेणार होता. आत्मविश्वास हेच माझे भांडवल होते. यशवंतरावजींना तेच पुरेसे वाटले असावे आणि एका मोठ्या कारखानदाराला डावलून त्यांनी मलाच प्रोत्साहन द्यावयाचे ठरविले. आमच्या सोनगड (गुजरात)च्या कारखान्याच्या उभारणीचे असे श्रेय यशवंतरावजींना आहे. एक राज्यकर्ता म्हणून मी त्यांना प्रथम भेटलो पण त्यातून आमचा स्नेह निर्माण झाला तो अगदी शेवटपर्यंत. मी दिल्लीला गेलो असता वृत्तपत्रात वाचले की, यशवंतरावजी बडोद्याला जाणार आहेत. त्या वेळी ते अर्थमंत्री होते. सहज वाटले की, विचारावे बडोद्यापासून सोनगडला भेट देणार का? जाण्या-येण्याचा तीनशे मैलांचा प्रवास, कितपत हो म्हणतील असे वाटत होते. पण यशवंतरावजींनी अनुमती दिली व त्याप्रमाणे आलेही.

यशवंतरावजींचा जसा स्नेह वाढत गेला तसतसा त्यांच्या विशाल कर्तृत्वाचा परिचय होत गेला. माझ्या आयुष्यात अनेक कर्तृत्ववान मंडळी भेटली, पण यशवंतरावांचा माझ्या मनावर उमटलेला ठसा काही आगळा आहे. त्यांच्या कर्तृत्वाला संस्कारशीलतेची जी झलक होती ती त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. राजकारणात अशी माणसे विरळा होत चालली आहेत. हिमालयाच्या संरक्षणासाठी ते धावून गेले, पण कृषणाबाईचा संथपणा बरोबर घेऊन. जनसामान्यातून ते वर आले पण स्वत:च स्वत:ला घडवीत असताना स्वत:तील असामान्यत दाखवून दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद असो किंवा देशाचे संरक्षण असो, परराष्ट्र धोरण असो वा अर्थसंचलन असो, त्या प्रत्येकात यशवंतरावजींचे  वैशिष्ट्य प्रत्ययाला आलेले आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राची जी जडण-घडण झाली आहे तिचे फार मोठे श्रेय यशवंतरावजींनाच द्यावयाला हवे. नावाप्रमाणेच महाराष्ट्र ‘‘महाराष्ट्र’’ व्हावयाला हवे, त्याच्यातील गरिबीचा न्यूनगंड त्यांना घालवावयाचा होता. त्याची अस्मिता जागृत करावयाची होती. एकीकडे शिवछत्रपतींचे आदर्श कार्य सारखे दुमदुमत राहील हे पाहिले तर दुसरीकडे लोकशाहीत जनसामान्यांचाच खरा आधार म्हणून त्यांच्यातील नेतृत्व उदयाला येईल हे आवर्जून पाहिले.

त्यासाठी कृषी-उद्योग या नव्या प्रयोगाला त्यांनी खतपाणी दिले. ज्या सहकार क्षेत्राला यशवंतरावजींनी योजनापूर्वक वाव दिला त्यातील गुणदोषांचे विश्लेषण अधूनमधून वाचावयाला मिळते. त्याची सत्यता थोडीफार मान्य करूनही असे कबूल करावे लागेल की योग्य संधी न लाभल्याने ज्या सुप्त शक्ती वाया जात होत्या त्यांना वाव मिळाला. ग्रामीण भागात त्यांचे कर्तृत्व उदयाला येत गेले.

यशवंतरावजींचा परिचय झाला की, संधी मिळताच त्यांना भेटावे, त्यांचे प्रसन्न हास्य जवळून न्याहाळावे आणि त्यांच्या तोंडून एखादा मौलिक विचार ऐकावा, असे कोणालाही वाटेल अशा प्रकारचा विलोभनीय, सौजन्यशील आणि संस्कारसंपन्न स्वभाव त्यांचा होता. ते मुरब्बी राजनीतिज्ञ असल्याने बेताने बोलावयाचे. या स्वातंर्ताच्या लढ्यात पडले आणि त्यातून राजकारणी बनले, पण त्यांचा आणखी एक पैलू उपजत साहित्यिकाचा होता. प्रचंड कार्यबाहुल्यातूनही वाचन-लेखनाला ते वेळ काढू शकत. त्यांना कामाचा उरकही तसा दांडगा होता. घरी अगर कचेरीत टेबलावर फायलींचा ढीग पडला आहे, असे क्वचितच दिसे. जे खाते त्यांच्या अखत्यारित असावयाचे त्याचा पूर्ण आवाका असल्याशिवाय असे काम उरकले जाणे कसे शक्य आहे? तसे म्हटले तर यशवंतरावजी महाराष्ट्रात होते तेव्हा किंवा केंद्रात गेले तेव्हाही कोणाचीही योग्य असणारी कामे केलेलीच आहेत. ते त्याबद्दल फारसे बोलत नसत. पण मुकाट्याने रास्त काम करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असावयाची. ते अधिकारावर होते तेव्हा आणि अधिकारावर नव्हते तेव्हाही त्यांना भेटावे आणि त्यांचा पोक्त सल्ला घ्यावा, असेच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते.

यशवंतरावजींना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सर्वजण गौरवितात ते खरे आहेच, पण अनेकांची जीवने त्यांनी घडविली आहेत. नामनिर्देश न करता एक दलित प्राध्यापक मला अकस्मात भेटले होते. त्यांची आणि यशवंतरावजींची भेटही झालेली नव्हती व त्या गृहस्थांनी बालवयात शिक्षणासाठी मदतीची विनंती केली आणि त्यांचे सारे शिक्षण पुरे होईपर्यंतची व्यवस्था त्यांनी परस्पर करून दिली होती ! एक निस्सीम मातृभक्त, एक संस्कारसंपन्न राजकीय नेता, एक चतुरस्त्र कर्तृत्व असलेला प्रशासक, चेह-यावरून न दाखविणारा पण तितकाच मनाने हळवा असलेला स्नेही आज आपणातून निघून गेला असला तरी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उठवून.