३७. माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय व्यक्ती – कुलगुरू दत्ताजीराव साळुंखे
तसा मी स्वत:ला मोठा भाग्यवान समजतो. कारण लहानपणापासून मला ब-याच थोर व्यक्तींचा सहवास लाभला. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, साहेब उर्फ यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई आणि सध्याचे राजस्थानचे राज्यपाल माननीय श्री. वसंतदादा पाटील यांनी माझ्या आयुष्याला वेगळेच वळण दिले. इतकेच नव्हे तर माझ्या व्यक्तिमत्त्वावरही त्यांच्या विचारसरणीचा फार मोठा ठसा उमटलेला आहे.
लहानपणी स्वातंर्ताच्या लढ्यात मी आणि माझे काही मित्र त्या वेळी भूमिगत असलेल्या यशवंतराव चव्हाण आणि श्री.वसंतदादा यांना मदत करीत असू. निरोप देणे, माहिती काढून आणणे, जेवणाचे डबे देणे, इत्यादी कामे मोठ्या हुरूपाने करीत असू. त्या वेळी ‘‘देशाला स्वतंत्र करायचे’’ ह्या भावनेचा मोठा पगडा आमच्या मनावर असे की, कित्येकदा शाळेला बुट्ट्या मारून आमचे हे देशकार्य नियमितपणे चालायचे. हे जेव्हा यशवंतराव चव्हाण उर्पâ साहेब यांच्या कानावर येऊ लागले तेव्हा त्यांनी मला बाजूला नेऊन ‘‘शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे’’ यावर चांगलेच भाषण सुनावले. त्यांचे म्हणणे खूप जरी पटले तरी स्वातंर्ताच्या लढ्यात हिरीरीने भाग घेण्याच्या कल्पनेने भारावलेल्या माझ्या मनाला काही पटेना. तेव्हा एक ठरवले की, साहेबांच्या व माझ्या वडिलांच्या नकळत तरी आपले कार्य चालू ठेवायचेच! पण दुर्दैवाने मी आणि माझा मित्र पकडलो गेलो. आम्हांला पोलिसचौकीवर नेण्यात आले. पोलिस म्हणताच आम्ही चांगलेच हादरलो. कारण साहेब आणि माझे वडील यांच्या कानावर हे जाणार आणि आमची चांगलीच चटणी होणार, हे भवितव्य डोळ्यासमोर येऊ लागले.
पोलिसांनी खूप माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना दाद लागू दिली नाही. तेव्हां त्यांनी आम्हांला तुरूंगात डांबून ठेवले. माझ्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘अभ्यास सोडून उनाडक्या करतोय तेव्हा त्याला जितके दिवस ठेवता येईल तितके दिवस तिथेच ठेवा.’’ झाले! वडिलांनी असा निर्णय घेतल्यावर काय करावं तेच सुचेना. आम्ही स्वातंत्र्यवीर जरी होतो तरी खूपच छोटे वीर होतो. त्यामुळे आम्हांला दम देणे किंवा कित्येकदा आमची टर उडवण्याखेरीज दुसरे काहीच होईना. हळूहळू पश्चाताप होऊ लागला आणि आठवू लागले की, वडील आणि साहेब यांचे सांगणे किती हिताचे होते ते...
अंदाजे दहा ते पंधरा दिवसांनंतर एक पोलीस अधिकारी तेथे आले. त्यांनी आम्हांला बोलावून घेतले आणि खूप दम देऊन सोडून दिले. जाताना तेही म्हणाले की, ‘‘शाळा शिकून मोठं व्हा आणि मग देश सांभाळा, नाहीतर परत तुरुंगातून सोडणार नाही.’’ त्यांच्या उपदेशाला मान तुकवीत आम्ही जे पळालो ते थेट घरी आलो. घरी वडिलांच्या जवळ साहेब बसले होते. त्यांना पाहताच धडकीच भरली. परंतु साहेबांनी ‘‘दत्ता, इकडे ये, माझ्याजवळ बैस’’, म्हणून शांतपणे बोलावल्यावर मी त्यांच्या जवळ जात म्हटले की, ‘‘साहेब रागवू नका, मी चुकलो, तुमचे ऐकले नाही. मलाही स्वातंर्ताच्या लढ्यात भाग घ्यायचा होता म्हणून मी तुमच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले.’’ साहेबांनी मला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवीत एवढेच सांगितले की, ‘‘दत्ता, उत्तम शिक्षण घेऊन आपल्या देशातल्या लोकांना साक्षर करणं, मोठमोठे शोध लावून देशाचे नाव उज्ज्वल करणं हा देखील एक प्रकारे स्वातंर्ताचा लढाच आहे. त्या लढ्यात तू उतर, तुझ्यासारख्यांची गरज त्या लढ्यात आहे.’’ मला पोटाशी जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवीत साहेब बोलत होते. माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. साहेबांचे शब्द अजूनही माझ्या अंत:करणात कोरले गेलेले आहेत. माझ्या हातून काहीही संशोधन, पेपर्स प्रसिद्ध झाले किंवा पुस्तके प्रसिद्ध झाली की, मी न चुकता साहेबांना कळवीत असे. अत्यंत अभिमानाने साहेबही मला उत्तेजन देत असत. केव्हांही भारतात मी आलो तरी साहेबांची गाठ घेतल्याशिवाय कधीही परत फिरलो नाही.
ब-याच वर्षांनी मला माझ्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. साहेबांनी इकडे येण्यास उत्तेजन दिले आणि मी राहुरीची कृषी विद्यापीठाची सूत्रे साहेबांच्या आशीर्वादाने हातात घेतली. मध्यंतरी सौ.वेणूताई उर्फ वहिनींचे निधन झाले. त्याचा फारच परिणाम साहेबांच्यावर झाला. त्यांची प्रकृती नीट राहत नव्हती, आणि आम्ही जेव्हा भेटत असू तेव्हा सौ.वहिनींच्या आठवणीने साहेब खूप व्याकूळ होत असत. मी त्यांच्या मुलासारखाच होतो, त्यामुळे ते मोकळेपणे आपली व्यथा माझ्याजवळ सांगत असत. गेल्या वर्षी त्यांचा अचानक भेटण्यास येत असल्याचा निरोप आला. माझ्या पत्नीला त्यांनी सांगितले भरपूर थालिपिठे तयार ठेवा, कारण पुष्कळ दिवसांनी मी थालिपीठ खाणार आहे. त्या दिवशी साहेबांनी आमच्याबरोबर बराच वेळ घालवायचा असे ठरवले होते. त्या दिवशी साहेबांच्या बरोबर आमच्या आक्का उर्फ डॉ. सरोजिनी बाबरही आल्या होत्या, त्यामुळे आठवणी, गप्पागोष्टींत वेळ कसा गेला तेच समजले नाही. त्या वेळी साहेबांना आम्ही आमच्याकडे राहण्याचा खूप आग्रह केला. परंतु दुस-या दिवशी सकाळीच त्यांना दिल्लीला जायचे होते म्हणून राहू शकले नाहीत. जाताना मला पोटाशी घेऊन एवढंच म्हणाले, ‘‘दत्ता, तुझा मला खूप अभिमान वाटतो.’’ मी देखील अश्रू पुसत त्यांच्या चरणांवर माथा ठेवीत म्हटले, ‘‘हे सारे तुमच्या शिकवणीचं व मार्गदर्शनाचं फळ आहे साहेब.’’ साहेब दिल्लीला गेले. त्यांची प्रकृती बरी नव्हती तेव्हा फोनवरून बरेच वेळा चौकशी केली, आणि अचानकच एके दिवशी रात्री फोन आला की, साहेब दवाखान्यात असून खूप सीरियस आहेत. खूप प्रयत्न केला परंतु फोन काही लागेना. ईश्वराजवळ प्रार्थना करीत होतो की, साहेबांची तब्येत ठीक होऊ देत. मला वाटते की, परमेश्वराला देखील वाटले असेल की साहेबांनी खूप कष्ट काढले आहेत. खूप सोसले आहे. त्यांना ख-या विश्रांतीची गरज आहे. साहेब गेले. पण त्यांनी माझ्यावर केलेले प्रेम आयुष्यभर माझी राखण करणार आहे आणि मला मार्गदर्शन देणार आहे. खरेच या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे.