१२. माझे स्नेही यशवंतराव – बा. म. गोगटे
सकाळचे ११-३० वाजले होते. कराड येथील टिळक हायस्कूलमधील पाचव्या इयत्तेचे वर्गशिक्षक आपला धडा विद्याथ्र्यांना समजावून सांगत होते. तेवढ्यात हायस्कूलच्या आवारात एक मोठा जमाव आला. ‘‘महात्मा गांधी की जय’’च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. खेटूनच बसलेल्या एका मुलाने हळूच चिमटा घेतला व खूण केली. ‘‘महात्मा गांधी की जय’’ अशा घोषणा देत तो वर्गाबाहेर गेला. खूप मोठ्याने घोषणा देऊ लागला. निमिषार्धात हायस्कूलमधील सर्व मुले वर्ग सोडून बाहेर आली. त्यांतील चिमटा घेऊन खूण करून बाहेर पडलेल्या विद्याथ्र्याने समोरच्या लिंबाच्या झाडावर चपळाईने झेप घेतली व झाडाच्या शेंड्यावर राष्ट्रीय निशाण फडकाविले. सर्वांनी जयघोष केला व तेथेच मोठी सभा घेऊन आमच्या मित्राने धडाडीने उत्कृष्ट भाषण करून त्या वेळचे वातावरण भारून टाकले. त्याचा तरुण मनावर परिणाम झाला. सर्वांच्या मनात राष्ट्रपे्रमाचा स्फुलिंग जागृत केला. त्या तरुणांनी या आमच्या मित्राला आपला नेता मानला. तो मित्र म्हणजेच यशवंतराव चव्हाण, ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा रथ समर्थपणे हाकला. केंद्रशासनात संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून विविध पदे भूषवून आपल्या तडफदार कार्याचा ठसा तेथे उमटविला व आपल्या कार्यकुशलतेने, मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी भारतीय राजकारणात मानाचे स्थान पटकावले. त्याच सुमारास कराडला सत्यशोधक म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचे वारे वाहात होते. आमच्या मागील गल्लीला डुबल आळी म्हणत. तेथे मान्यवर मराठा मंडळींच्या सत्यशोधक समाजाच्या बैठकी होऊन, गावात पुष्कळ ठिकाणी ब्राह्मणेतर चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावणार अशी हवा निर्माण झाली होती.
आमच्या तरुण मित्राच्या मनावरही त्या चळवळीचे वारे वाहू लागतील असे वाटले होते. परंतु स्वतंत्र विचारांच्या मित्राने एवढ्या लहानपणीच महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू इत्यादी राष्ट्रीय पुढा-यांची भाषणे ऐकल्यामुळे व वाचल्यामुळे सत्यशोधक समाजाची चळवळ संकुचित स्वरूपाची आहे असे मनाने ठरविले व राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्यास आम जनतेचा उद्धार व कायापालट होईल अशी त्याची खात्री पटली. त्याने सर्व बाजूंनी परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला व राष्ट्रीय चळवळीत जर आपला समाज धडाडीने भाग घेईल तर आपण प्रथम सातारा जिल्ह्यात व नंतर महाराष्ट्रात स्वराज्याची खंबीर चळवळ राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारू अशी खात्री करून घेऊन त्याने राष्ट्रीय चळवळीत जोमाने झेप घेतली. ‘‘कृष्णाकाठ’’ या त्यांच्या आत्मचरित्रात याचा संदर्भ आलेला आहे.
दिवस जात होते. राष्ट्रीय चळवळीचा नेता म्हणून आमचा मित्र आपल्या सवंगड्यांना कार्यकर्ते बनवत होता. सातारा जिल्ह्यात व महाराष्ट्रातील राष्ट्रीय कार्य करणा-या मंडळीत त्यांच्या गुणांची, धडाडीची व कुशल नेतृत्वाची चमक दिसू लागली. तो महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचा सेक्रेटरी झाला.
मुंबई इलाख्यात पहिली निवडणूक झाली. बेळगावहून जीप घेऊन आमच्या टेंभू गावात आठ दिवस मुक्काम केला. निवडणुकीत पाहिजे तेवढे मतदान मिळाले. निवडणूक जिंकल्यावर सौ. वेणूताईने ‘‘भाऊजी, तुम्ही सर्वांनी एवढ्या कळकळीने काम केलेत म्हणून हा विजय मिळाला’’ असे म्हटल्यावर जो हर्ष झाला त्याला तोड नाही.