८७. माणुसकीचे मूर्तिमंत रूप म्हणजेच यशवंतराव – राम खांडेकर
‘‘साहेबांना लोक देवासारखे मानत होते. तसेच ‘‘साहेब’’ही देवाला मानत होते. ‘‘साहेब’’ प्रवासात असताना मुक्कामाच्या आजूबाजूला एखादे प्रसिद्ध देवस्थान असले तर तेथे गेल्याशिवाय राहात नसत, सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील देवस्थानात तर ते सौ. वेणूतार्इंबरोबर अनेकदा गेले आहेत. परंतु त्याचबरोबर काशीचे विश्वनाथ मंदिर व हरिद्वारची ‘‘हरी की पावडी’’ ही त्यांनी कधी चुकविली नाही. परराष्ट्रमंत्री असताना उत्तर काशी येथील माउंटनिंग शाळेच्या कार्यक्रमासाठी गेले असताना तेथून ७०-८० किलोमीटरवर असलेल्या ‘‘गंगोत्री’’ येथे जाऊन गंगेची व शंकराची पूजा करण्यास ते चुकले नाहीत. ‘‘साहेबां’’ची ही श्रद्धा केवळ हिंदूंच्या देवांवरच नव्हती, तर इतर धर्मावर देखील त्यांची नितांत श्रद्धा होतीही. अजमेर व निजामुद्दीन (दिल्ली) येथील दग्र्यावरही ते कधी कधी जात. १९७७ च्या निवडणुकीनंतर जनता राज्य आले. त्यामुळे ‘‘साहेब’’ संसद सदस्य म्हणून होते. एके दिवशी सायंकाळी ते विचारमग्न असताना त्यांना काय वाटले कुणास ठाऊक ते सौ. वेणूतार्इंना म्हणाले, ‘‘आपण आग्र्यास जाऊ.’’ सौ. वेणूतार्इंना याचा अर्थबोध होईना. तेव्हा ते म्हणाले की, आग्र्याजवळील फत्तेपूर शिक्री येथील सलीम खिस्तीच्या समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. ताबडतोब दग्र्यावरील मखमली चादर, पुजेचे साहित्य आणण्यास माणूस गेला. दुस-या दिवशीच सकाळी साहेब सौ. वेणूताई, मी असे आम्ही फत्तेपूर शिक्रीस गेलो. १५-२० मिनिटे समाधी (दर्गा)चे दर्शन घेतले आणि परत दिल्लीस आलो. केवळ १५-२० मिनिटांच्या दर्शनासाठी साहेबांनी सौ. वेणूतार्इंनी ९-१० मीटरचा प्रवास प्रकृतीला झेपणे अशक्य असतानाही केला. पण श्रद्धेपुढे त्यांना याचे महत्त्व नसते. सकाळी साहेब घरातील साईबाबांच्या मूर्तीसमोर व देवासमोर ५-१० मिनिटे नतमस्तक होऊन उभे राहिल्याशिवाय आपल्या खोलीच्या बाहेर पडत नसत.
देव-देवतांवर त्यांची जशी श्रद्धा होती तसाच आदर व जिव्हाळा त्यांचे ठायी वेगवेगळ्या कलाकारांबद्दलही होता. दिल्लीत भरणारी पेंटिंगची प्रदर्शने ते जरूर पाहात व कलाकारांचे कौतुक करीत. आवडलेले चित्र ते हमखास विकत घेत. साहेबांच्या बंगल्यात अनेकांच्या चित्रकृती आजही पाहण्यास सापडतात. त्या वेळी दिल्लीत असलेले चित्रकार श्री. व सौ.साठे, वाघ वगैरे कलाकारांकरिता साहेबांचा बंगला आदराचे स्थान होते. ते वारंवार साहेबांना भेटत असत. मुख्यमंत्री असताना कलाकारांच्या भावनांना ते फार हळुवारपणे जपत असत. नाटक असो वा संगीत पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत बसू शकत असतील तरच ते शक्यतो त्या कार्यक्रमास जात. मधून उठून जाणे हा ते कलाकाराचा अपमान समजत व तो आपल्या हातून होऊ नये याची काळजी घेत. संगीत आणि नाटक यांची आवड हा साहेबांच्या जीवनातील महत्त्वाचा विरंगुळा. ते दिल्लीतील कार्यक्रम सहसा सोडत नसत. साहेब केंद्रीय गृहमंत्री असतानाची गोष्ट आहे. पार्लमेंट चालू होते. दुस-या दिवशी पार्लमेंटचे खूप काम होते. परंतु किशोरी आमोणकरांचे गाणे कमानी ऑडिटोरियमला आहे हे कळल्यावर साहेब बेचैन झाले. गाणे रात्री १०.३०—११ ला सुरू होणार होते. गाण्याला गेले तर कामासाठी रात्रभर जागावे लागेल. म्हणून विचार चालू होता. शेवटी सौ. वेणूतार्इंनी मध्य मार्ग काढला. एक राग ऐकून निघून यायचं ठरलं आणि आम्ही गेलो. पहिला राग १२ च्या सुमारास संपला. आम्ही तिघेही उठून मोटारीत बसलो. आयोजकांचा निरोप घेत असतानाच साहेब म्हणाले, ‘‘तुम्ही असं करा ’’ तुम्ही घरी जाऊन गाडी पाठवून द्या. मी पूर्ण गाणे संपल्यानंतर येईन आणि साहेब १-३० च्या सुमारास आले आणि रात्रभर ऑफिसचे काम करीत बसले !
‘‘श्री. यशवंतराव राजकारणात गेल्यामुळे महाराष्ट्र एका मोठ्या साहित्यिकास मुकला.’’ असे अनेकदा म्हटले जाते. साहेबांच्या जीवनात त्यांना सर्वांत प्रिय वस्तू म्हणजे पुस्तक होते. कोणी १०००, ५०० ची वस्तू देण्यापेक्षा पुस्तक भेट म्हणून दिले तर त्यांना अधिक आनंद व्हायचा. पण पंचाईत ही व्हायची की, बहुतेक ते पुस्तक त्यांच्याकडे अगोदरच आलेले असायचे. ते इंग्रजी, मराठी नियतकालिकांतील पुस्तक-परीक्षणाचा कॉलम हमखास पाहावयाचे आणि त्यातील निवडक पुस्तके आणायला सांगायचे. इथे मिळाली नाहीत तर मुंबईहून मागवावयाचे. दर महिन्यात त्यांचा पुस्तकसंग्रह वाढत होता. साहेबांचे पुस्तक वाचण्याचे एक मोठे वैशिष्ट्य होते, ते एका वेळी निरनिराळ्या विषयांवरील ६-७ पुस्तके वाचायला घ्यायचे आणि रोज प्रत्येकातील काही पाने वाचायचे. त्यांच्या हँडबॅगेत २-३ पुस्तके नक्कीच असायची. प्रवासात ते वाचन करीत. दिल्लीत असले की, रात्री १२-१ नंतर काम संपल्यावर ते वाचन करीत. पुस्तकांवर प्रेम करणा-या साहेबांना ‘‘साहित्यिका’’ बद्दल नितांत आदर होता. त्यांच्याशी गप्पा मारणे हा त्यांच्या जीवनातील मोठा विरंगुळा होता.