• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८७

८७. मोठ्या मनाचे साहेब – आर. एस. चोपडे

आमच्या महाराष्ट्रात शिवाजी—बाजीच्या पराक्रमाची परंपरा आहे. टाकलेली जबाबदारी यशस्वी पूर्ण करणार नाही तो मराठी माणूस कसला? मराठी माणसाला तुम्ही मोठे केलेत साहेब ! ६२ च्या चीन युद्धाने भारतास मोठा धडा मिळाला. आपल्या कुशल नेतृत्वाने तुम्ही संरक्षक संरक्षणयंत्रणा उभी केलीत व त्याचेच प्रत्यंतर पुढे पाकिस्तानशी झुंज देण्यात दाखविले. तीन वर्षांत केलेले हे परिवर्तन तुमच्याच कर्तृत्वाचे फळ होते. पंडितजींच्या आकस्मिक मृत्यूमुळे सारा भारत तुमच्याकडे एक आशास्थान म्हणून पाहात होता. एक मुरब्बी राजनीतितज्ज्ञ असा आपला नावलौकिक होता. ‘‘प्रतिशिवाजी’’ च्या रूपात महाराष्ट्र तुम्हास पाहात होता.

पण साहेब, कृष्णाकाठी वाढलेल्या तुमच्या सुसंस्कृत मनात कधी ‘‘कपटनीती’’ व सत्तास्पर्धेचे राजकारण शिरले नाही. स्वकर्तृत्वावर तुमचा विश्वास होता. म्हणूनच तुम्ही स्वामिनिष्ठा ठेवून दिल्लीत राजकारण केले. कित्येक वेळा अवहेलना झाली, पण तुमच्या हिमालयाएवढ्या मोठ्या मनास असले ओरखडे काय करणार. तुम्ही मनाचा तोल कधी सोडला नाही हेच तुमच्या विशाल मनाचे द्योतक होते. तुमच्या या विशाल व खंबीर मनाची मशागत ज्या कृष्णाकाठास झाली त्या कृष्णेलासुध्दा तिच्या पुत्राचा रास्त अभिमान वाटला. एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन तुम्ही भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलात, महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे जणू एक मोहोळ उभे केलेत!

भारताच्या स्वांतंत्र्यपर्वात सांगली-सातारच्या रांगड्या सेनेचे नेतृत्व तुम्ही केलेत. भूमिगत राहून प्रतिसरकारचा हिसका तुम्ही इंग्रजी राजसत्तेस दाखविलात, महाराष्ट्रात शिवाजीचे स्मरण करून दिलेत, शिवाजीने अनेक पराक्रमी मावळ्यांना कार्याची दिशा दिली, त्यांना मोठे केले, तुम्हीसुद्धा अनेक कार्यकर्त्यांना दिशा दाखविली. संधी दिली त्यांना मोठे केले पण.....शिवाजीच्या जिवाला जीव देणारे जसे बाजी भेटले ते भाग्य मात्र अभावानेच तुम्हाला लाभले! माणसाच्या पडत्या काळात त्याची खरी कसोटी लागते. स्वार्थासाठी अनेकांनी तुमच्यावर टीकेचे प्रहार केले !

तुमच्या प्रेरणेने उभी राहिलेली अनेक स्वार्थलोलुप माणसे संधी येताच तुमच्यापासून दूर झाली पण तुमचे विशाल मन यामुळेसुद्धा कधी दोलायमान झाले नाही. अजोड संयमी मनाचे प्रत्यंतर तुम्ही अनेक वेळा दाखविलेत. तुमच्या धीरगंभीर व शांत व्यक्तिमत्त्वाने असे झंझावाती तडाखे अनेक वेळा हसतखेळत स्वीकारले, पण त्याने तुमचा संयमाचा बांध कधी फुटला नाही. तो बांध नव्हताच! हिमालय होता.

साहेब, तुमची मधुरवाणी अनेकांना दिपावून गेली, तुमच्या तोंडून कधी जळफळाट, द्वेष, राग हा ऐकलाच नाही. एका सभेचा प्रसंग आठवतो. तुमच्या विरोधकाने आपल्या बेताल बोलण्याचे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी घडविले. तुमची कुचेष्टा केली, वाटेल ते आरोप करून तुमची मानखंडना केली. हजारो मनांस दुखविले, दुसरे दिवशी तुमची सभा होती. तुमच्या एका तापट कार्यकर्त्यांने रागात येऊन तुम्हास सुनावले, ‘‘आजच्या सभेत याचे उत्तर द्या. चांगले उत्तर द्या. टोलस प्रतिटोला हाणा!’’ पण साहेब, हसत हसत तुम्ही सांगितलेत, ‘‘गांधी-नेहरूंच्या काँग्रेसने शिव्या देण्यास मला शिकविले नाही.’’ आणि त्या सभेत धीरगंभीरपणे भारतापुढच्या समस्या तुम्ही मांडल्यात! वैयक्तिक टीकेचा एका अक्षराने उल्लेख केला नाहीत. उलट विरोधी उमेदवाराबद्दल आदराने बोललात! केवढ्या मोठ्या मनाचे दिग्दर्शन तुम्ही केलेत!

साहेब, महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा तुमचा आहे. महाराष्ट्रास सहकाराची दिशा तुम्ही दिलीत, पंचायत राज्याची नेहरूंची कल्पना ग्रामपातळीपर्यंत राबवून सामान्य माणसास प्रशासनयंत्रणेचा घटक बनण्याची संधी तुम्ही दिलीत, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संवर्धनात तुमच्याइतके अजोड कार्य कोणत्याही सत्ताधा-याने केले नाही. अनेक कलांना व गुणांना आपण वाव दिलात. त्यांच्या कल्याणासाठी अनेकविध योजना प्रत्यक्षात आणल्यात.

आपण एक अजोड साहित्यिक होता. एकाने म्हटले आहे, ‘‘चव्हाणांनी राजकारणात भाग घेतल्यामुळे महाराष्ट्र एका चांगल्या साहित्यकास मुकला!’’

आपला ‘‘कृष्णाकाठ’’ याची साक्ष देतोच! आपण कराड येथेच साहित्य-संमेलनास उपस्थित होता. सरस्वतीचा पाईक म्हणून आपण सभागृहात बसला होता. स्टेजवर साहित्यिक होते. आपण आपल्या साहित्यपूजेचे प्रत्यंतर त्या ठिकाणी दिलेत.