८६. यशवंतराव-एक नेक आदमी – आ. सौ. निर्मला ठोकळ
वेणूताई गेल्या, आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री निघाला असा ज्यांचा आम्ही एकेकाळी उल्लेख केला असे यशवंतराव चव्हाण मनाने, शरीराने खचून गेले.
त्यांच्या बोलण्यातील उभारी, मिश्कील विनोद, राजकारणाबद्दलची आस्था, मनमोकळया गप्पा हे पूर्वीचे सारे लुप्त झाले होते.
‘देवराष्ट्रे’ या एका लहानशा गावात छोट्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा स्वकर्तृत्वाने देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत जाताना त्यांची झेप पाहिल्यानंतर, त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालातील मनाची अवस्था पाहिल्यावर, अंत:करणात कुठेतरी खोल जखम होत आहे असे वाटते.
स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनच यशवंतरावांचा इतिहासाला उल्लेख करावा लागेल.
१९५२ पासून महाराष्ट्र घडवायला त्यांनी जी सुरुवात केली होती ती, त्यांनी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत चालूच ठेवली होती. त्यापैकी १९४९ पासून १९५७ पर्यंत पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री म्हणून ते असतील, पण महाराष्ट्रात बहुजन समाजाचे कार्य काही लोकांनी जोरात सुरू केल्यानंतर, त्यांनी महाराष्ट्र शासन जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ते १९५७ ला द्विभाषिकासारख्या मोठ्या प्रांताचे वयाने सर्वांत लहान असलेले मुख्यमंत्री झाले आणि पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याला त्यांनी प्रत्यक्ष सुरुवात केली.
‘कसेल त्याची जमीन’ सहकार चळवळ, सहकारी साखर कारखाने, ग्रामीण कारखानदारी काढण्यास कार्यकर्त्यांना उत्तेजन, १२०० रूपयांच्या आतील वार्षिक उत्पन्नाच्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण योजना, उजनी, कोयना, जायकवाडी, पानशेत अशा कितीतरी यशवंतरावांनी अचूक निर्णय घेतले की, ज्यामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू लागला. पुणे, मुंबई, नासिक, ठाणे या परिसरातील खाजगी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देऊन तो सारा पट्टा औद्योगीकरणाखाली आणून इतिहास व भूगोल बदलविला.
नुसत्या मोफत शिक्षणाची घोषणा करून चालणार नव्हते तर त्या त्या भागातील मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी, शिक्षणाचे दरवाजे खुले करून देण्यासाठी खाजगी संस्थांना उत्तेजन देऊन खेड्यापाड्यांतून शाळा, हायस्कूल्स, कॉलेजेस यांना परवानगीही त्यांनी दिली. साहाय्य केले. त्यामुळेच आज महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे चित्र दिसते आहे. ‘‘एस.टी.सारखे एक वाहन’’ सामान्यांचे खेडुतांचे एक हातातले वाहन करून टाकले. ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे महान काम यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात घडवून आणले. अशाप्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या काळात संपूर्णत: महाराष्ट्राचे स्वरूप, चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी सुरू केले आणि त्याचेच मूर्त स्वरूप आज आपण पाहातो आहोत. आज महाराष्ट्र हा देशाच्या नकाशात एक पुरोगामी महाराष्ट्र, सहकारी चळवळीतील अग्रेसर महाराष्ट्र, म्हणून उभा आहे.
महाराष्ट्रघडणीचे काम चालू असतानाच १९६२ साली अचानक चीनने भारतावर हल्ला केला. यशवंतरावांना सह्याद्रीच्या छातीचा कोट करून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याऐवजी हिमालयाचे, देशाचे संरक्षण करण्यासाठी त्या वेळचे पंतप्रधान ना. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाने दिल्लीस जावे लागले.
१९६२ साली यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून मुंबईचा सागरतळ सोडून यमुनातटी गेले. देशाच्या राजधानीत राहावयास गेले. देशाच्या, हिमालयाच्या संरक्षणासाठी गेले. चीनने हल्ला केला होता. कृष्ण मेननसारख्या एका संरक्षणमंत्र्याला अनेक उठावातून बाजूला केले गेले होते, आणि अशा युद्धजन्य परिस्थितीत यशवंतरावांवर खुर्चीवर बसवावयाचे होते, सा-या देशाचेच नव्हे तर सा-या जगाचे डोळे त्यांच्याकडे लागलेले होते. चीन पुढे-पुढे सरकत होता. आपली संरक्षणफळी फारच अपुरी होती. संरक्षण सोयीत कमतरता होती. देश हवालदील झालेला आणि नवीन जबाबदारी पेलायची होती.