महाराष्ट्राचे पाश तोडायचे होते. या सा-या कठीण मन:स्थितीतून यशवंतराव जात होते. आणि पहिल्याच पार्लमेंटमध्ये त्यांनी सभागृहाचे मन जिंकले. संरक्षण फळी भक्कम केली. पंतप्रधानांच्या विश्वासास पात्र ठरले, आणि दिल्लीत महाराष्ट्रातील एक नेक आदमी म्हणून नाव मिळविले. पंतप्रधानांचे पाचारण, वेणूतार्इंचा होकार, महाराष्ट्राचा निरोप हे सारे यशस्वी झाले.
त्यापूर्वी त्या वेळच्या पक्षाध्यक्षा इंदिराजी गांधींच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्रात आणण्याचे मंगलकार्य त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे काम होते. महाराष्ट्राचे मंत्री, मुख्यमंत्री आणि देशाचे यशस्वी संरक्षणमंत्री ही त्यांच्या जीवनाची यशाची मालिका कोणालाही हेवा वाटण्यासारखीच होती. पण त्याचबरोबर ती महाराष्ट्राच्या मातीला अभिमान वाटण्यासारखी होती. १९६२ साली यशवंतराव दिल्लीला गेले. तरी ते क्षणभरही महाराष्ट्राला विसरले नाहीत. जणू ते महाराष्ट्रातच आहेत असा भास होत होता. असे नव्हे तर ते येथेच आहेत असे वातावरण त्यांनी टिकविले. कै. कन्नमवार यांना व त्यानंतर लगेच. कै. वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रशासनात, पक्षात, कार्यकर्त्यांत पान हलत नव्हते. एवढी त्यांनी स्वत:ची पकड ठेवली होती. अर्थात याचा गैरफायदा त्यांनी कधीच दाखविला नाही. त्यांच्या सल्ल्याने महाराष्ट्र चालत होता. त्यांच्याशिवाय निर्णय होत नव्हते. एखाद्या खेड्यातील कार्यकर्त्यास मी सरपंच व्हावे असे वाटत असेल व ते साहेबांना पसंत असेल तर तोच सरपंच होणार. कै. वसंतराव नाईक ११ वर्षे मुख्यमंत्री होते, तरी यशवंतरावांच्या शब्दाला पूर्वी जी किंमत होती तीच शेवटपर्यंत होती. त्यांनी सांगावे आणि नाईकसाहेबांनी ते डावलावे असे कधीच घडले नाही आणि याउलट मुख्यमंत्री यांचा निर्णय फिरविण्याचे पातकही कधी यशवंतरावांचे हातून घडले नाही. म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे निर्णय त्यांच्या पूर्वसल्ल्यानेच घेतले जात असतील हे राजकीय सुज्ञांना सांगावयास नकोच.
यशवंतरावांनी जेवढे प्रेम महाराष्ट्राला दिले, आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर जेवढे अलोट प्रेम केले तेवढे कोणत्याही नेत्याच्या वाट्याला आले नसेल. यशवंतराव म्हणजे आपल्या घरातीलच एक असे प्रत्येक कार्यकर्तास वाटे. ते आमच्या घरातील सर्वांशी सलोख्याने वागत. आमच्या घरातीलच ते एक आहेत असे वातावरण तयार झाले होते. प्रत्येक कार्यकर्त्याची आपुलकीने चौकशी करण्याचा त्यांचा स्वाभावविशेष होता. कार्यकर्तास मोठे करावयाचे, त्यास संरक्षण द्यावयाचे, वेळप्रसंग आला तर त्या कार्यकर्त्याच्या मागे त्याचे कुटुंबाला रांकेला लावून द्यावयाचे हा जिव्हाळा, प्रेम महाराष्ट्रात त्यांनीच दिले. प्रत्येत कार्यकर्त्यांस साहेब आमचे वाटत होते. तसे महाराष्ट्रातील साहित्यिकांना, शिक्षकांना, शेतक-यांना, कर्मचा-यांना, पोलिसांना वाटत होते. सर्वांनाच त्यांनी प्रेम आपुलकी दिली. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथम त्यांनी पेलिसांच्याबद्दल जे उद्गार काढले त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस गहिवरून गेला होता. राजकीय लोकांचे वावडे असणा-या साहित्यिकांना त्यांनी केव्हा जिंकले ते कोणासही कळले नाही. ते स्वत:ही उत्तम साहित्यिक होते, याची जाण त्यांनी आपल्या साहित्यातून दिली. उत्तम वक्ता असल्याचे आपल्या वक्तृत्वाने सिद्ध केले. कर्मचा-यांचे प्रेम त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना मिळविले. त्यामुळे त्यांना कर्मचा-यांचे संपाचा त्रास झाला नाही. याउलट महाराष्ट्रात त्यांच्या नंतर काही प्रश्न उपस्थित झाले तर ते एक सल्ल्याचे ठिकाण ठरले होते. राजकीय जीवनाच्या काही काळात इंदिराजींचे व त्यांचे काही मतभेद असले तरी शेवटच्या काळात त्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले. जीवनातील सुवर्ण क्षण यशवंतरावांनी अनुभवले तसेच काही अपमानास्पद क्षणही अनुभवले, पण हे सारे क्षण त्यांनी सारख्याच संयमाने पचविले.