• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३८

१३८. माझा भाऊ जिम्मेदारीचा – डॉ. सरोजिनी बाबर

उभ्या पुण्याला खाऊ का गिळू करीत आक्राळविक्राळ रूप धारण करून भरधाव वेगानं गावात शिरण्याच्या त्या दिवशीच्या महापुराची आठवण झाली तरी अंग सरारून शहारतं न पाठोपाठ ‘‘आक्काताई कुठाय?’’ विचारीत सदाशिव पेठेतून फेरफटका मारीत सर्वत्र फिरणा-या साहेबांचा आवाज कानात घुमला की, अजूनही खरंच जिवात जीव येतो.

त्या दिवशी ध्यानीमनी नसताना पुण्यावर ओढवलेल्या ह्या भयानक आपत्तीनं माणसं हवालदिल झाली होती. पण साहेब देवासारखे अचानक मदतीचा हात देत पुण्यात येऊन ठेपल्याकारणानं माणसांना विलक्षण धीर आला होता. ‘‘साहेब आलेत ना? मग काय व्हायचं ते होऊ देत’’ म्हणत माणसांनी स्वत:ला सावरलं होतं. इतरांच्या मदतीला धावली होती. साहेब आल्याकारणानं निचींतीनं वावरत होती. ज्यांचं सर्वस्व वाहून गेलं त्यांच्याकडे जात होती. जवळचं शक्य ते देत होती. ते बघून साहेब म्हणाले, ‘‘त्यांना पहिलं प्रेम द्या, जिव्हाळा द्या. बाकीचं हळूहळू मिळेल.’’ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या ग्वाहीनं पुणे गाव बघता बघता पहिलं रूप धारण करीत गेलं.

एवढं मोठं धरण फुटलं म्हणून पुण्याला पाण्याची टंचाई कधीच जाणवली नाही. शासनयंत्रणा पणाला लावीत स.गो. बर्व्यांसारख्या अधिका-याच्या सहाय्याने साहेबांनी पुण्याला जणू जीवदान दिलं. लोकं म्हणाली, ‘‘भारी लाख माणूस, मोठा जिम्मेदारीचा. याला म्हणावं मुख्यमंत्री. राजा-पालनकर्ता किती अगत्यानं सगळ्यांची विचारपूस केलीत पाहिलीत ना?’’

अडल्या माणसाला मदतीचा हात देत साजिवंत करणं हा साहेबांचा जणू स्थायिभावच म्हणावा. आणि अशावेळी त्यांनी अमूक करायला हवं म्हणायचा अवकाश की, त्यांच्या लोकांनी पण त्यांच्या विनंतीला शिरोधार्य मानीत उचलून धरावी हे पण ठरलेलं जणू विधिलिखितच !

मला आठवतं, साहेबांची मुंबईहून दिल्लीला बदली झाली तेव्हाची गोष्ट. म्हणजे संरक्षण मंत्री म्हणून साहेब दिल्लीला निघाले ती काळवेळ. पुण्याच्या शनिवारवाड्यावर भली दांडगी सभा भरलेली न् साहेब म्हणाले, ‘‘देशाला सोन्याची गरज आहे. देशाला माणूसबळ हवं आहे. आर्थिक स्वावलंबन पाहिजेल आहे.’’ तशी भराभर लोकांनी साहेबांपुढं पैशाचा जणू पाऊस पाडीत म्हटलं अन् बायकांनी हातातल्या बांगड्या, गळ्यातल्या साखळ्या काढून भराभर देऊन टाकल्या. त्या वेळी साहेबांच्या पुढ्यात बसलेल्या माझ्याकडे खालचा ओठ मुडपीत त्यांनी पाहिलं मात्र न् मी क्षणाचाही विलंब न लावता हातातल्या बांगड्या काढून त्यांच्या हातावर ठेवल्या !... साहेब खुश झाले. त्यांनी सांगून टाकलं, ‘‘बहिणीचा आधार फार मोठ्ठा असतो भावाला’’ इंदिराजींनीही आपली सगळी बाळलेणी न् भावल्यांचे अलंकार देऊ केलेले तर आम्हाला एकदम बरं वाटलं. ‘‘आपल्यापेक्षा देश मोठा आहे.’’ हे साहेबांचं बोलणं आपण अल्पांशानं का होईना सार्थ करू शकलो यातल्या समाधानानं आम्ही घरी परतलो..

दिल्लीला गेल्यावर साहेबांनी फोन केला, ‘‘आक्काताई, आपण समाधानी आहोत. वेणूबाईनंही पाटल्या दिल्यात. घरची अशी स्वयंस्फूर्त कृती लाख मोलाची.’’ त्या वेळी काय वाटलं कसं सांगू? साहेबांच्या नजरेतील त्या वेळच्या आनंदाश्रूंनी आम्ही जशा न्हाऊन उठलो !

आपल्या माणसाबद्दल साहेबांना अपार माया, उदंड प्रेम. कुणाला कधी काही स्वत:साठी म्हणून मागायचे नाहीत. पण त्यांचे डोळेच एवढं बोलून जायचे की, शब्दांचा तिथं काय पाड लागावा? साहेबांना माझ्याकडून एकच अपेक्षा असायची की, मी भरपूर लिहावं न् लेखक म्हणून नाव कमवावं. त्यासाठी ते म्हणायचे देखील, ‘‘आक्काताई, माझी लेखनाची हौस तुझ्यामुळे भागू देत...’’ आणि मी पण ‘हं !’ करीत जे जे म्हणून लिहीन ते ते त्यांना पाठवून द्यायची.

पण एकदा खूपच गंमत झाली. लोकसंस्कृतीवर आधारित असा एक शोध निबंध मी अंग्रजीत लिहून दिल्लीला पाठवलेला. तिथं अखिल भारतीय अशी या विषयातील सभा भरलेली. तर माझा निबंध वाखाणला जाऊन चारचौघांत झालेलं नाव छापून आलेलं हं ! तशी साहेबांनी सगळीकडं माझी चौकशी केली. ओळखीतल्या लोकांकडे फोन केले न् कुठंच पत्ता गवसेना तशी त्यांनी पुण्याला फोन लावून आमच्या वडिलांना, अण्णांना विचारलं, ‘‘आक्काताई कुठाय? लगेच परतली का?’’ त्यासरशी मी तिथंच उभी तर अण्णा हसले न् म्हणाले, ‘‘आक्काताईशीच बोला.’’ मग मला त्यांनी रागावून विचारलं, ‘‘असं न भेटता का परत गेलीस?’’ म्हणताना शांतपणानं मी उत्तर केलं, ‘‘मी आलेच नव्हते ना ? फक्त निबंध पाठवला !’’