• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२०

१२०. हे तो योगायोगाचे देणे – श्री. भा.द. खेर

त्या दिवशी मी प्रथम विमानात बसलो ते गृहमंत्र्यांच्याच ! आकाशातून जाणारी विमानं तोपर्यंत मी जमिनीवरून पाहिली होती.

त्या दिवशी संक्रांत होती. वेणूतार्इंच्या हस्ते तिळगूळ मिळाला.

आकाशात विमानाने झेप घेतली. मी थोडा स्थिरस्थावर झालो.

यशवंतराव मला एकदम म्हणाले, ‘‘माझ्याकडे बरेच अर्ज आले आहेत.’’ मी गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागलो.

मग हसत म्हणाले, ‘‘मी तुम्हाला रशियात पाठवतो आहे. आम्हालाही पाठवा, असा एकेक अर्ज येऊ लागला आहे. रशियात जाणं तसं सोपं आहे. मी पाठवलं की झालं !’’

मग काहीशी गंभीर मुद्रा करून म्हणाले, ‘‘तुम्ही हे कुणाजवळ बोलत जाऊ नका. अशा वेळी कमी बोलायचं असतं.’’

कमी बोलणं हा त्यांचा स्थायिभाव, तर भडाभडा सारं बोलणं हा माझा स्थायिभाव ! पण त्यांच्या संदर्भात कमी बोलण्याचं व्रत मी कसोशीनं पाळलं.

मला जपानला पाठविण्याची कामगिरीही त्यांचीच ! पण मी त्याबाबत तोंडाला कुलुप घातले होते. परवा ६ ऑगस्ट १९८४ ला ‘‘हिरोशिमा’’ च्या प्रकाशन समारंभाच्या वेळी मी तो गौप्यस्फोट केला.

हिरोशिमाला जाण्याची मनिषा मी तब्बल तीस वर्षं मनाशी बाळगून होतो. ती धाडसी कल्पना यशवंतरावांच्याजवळसुद्धा बोलून दाखविण्याची माझी छाती झाली नव्हती. शेवटी ती कल्पना मनात ठेवणे असह्य झाले. मी अत्यंत अस्वस्थ झालो. २२ जून १९७५ रोजी मनाला येईल तसे यशवंतरावांना पत्र पाठवले.

मी माझे मन मोकळे करून गप्प बसलो. ते माझे काम मनात ठेवून गप्प बसले. शेवटी जपानला जाण्याची परराष्ट्र मंत्रालयाची तार मला ३ डिसेंबरला आली. तीस वर्षांपूर्वी उराशी बाळगलेले माझे स्वप्न अशा त-हेने साकार झाले.

ही हकिकत मी ६ ऑगस्टला प्रकाशन समारंभाच्या वेळी सांगितली, त्या वेळी मी म्हणालो, ‘‘काही माणसं अशी असतात की, दुस-यासाठी काही न करता सगळं केलं, असं सांगतात. उलट फारच थोडी माणसं अशी असतात की, दुस-यासाठी सारं करून कोणतेही श्रेय स्वत:कडे घेत नाहीत. यशवंतरावजी दुस-या प्रकारात मोडतात.’’

माझ्या बोलण्याला उत्तर देताना त्या वेळी यशवंतराव म्हणाले, ‘‘खेरांनी आता जाहीर केलंच आहे. मीही आता माझं सांगतो. खेरांच्या २२ जूनच्या त्या पत्रावर मी गप्प बसलो होतो, ही गोष्ट खरी आहे. पण मी गप्प का बसलो होतो? जपानला जाणं सोपं होतं. पण तिथली कामगिरी खेर पार पाडतील, याची खात्री पटल्यावरच मी त्यांना जपानला पाठवायचं ठरवलं. त्या यशाची ग्वाही आता त्यांनी दिली आहे.’’

त्या दिवशी प्रकाशक अनिलकुमार मेहता यांनी सुरेख जेवण दिलं. पण यशवंतराव फारसे जेवले नाहीत. अलीकडे माझ्या ध्यानात येत चालले होते, की वेणूताई गेल्यापासून गाडे थकत चालले आहे. मन उदास होत चालले आहे. वेणूतार्इंचा पहिला स्मृतिदिन क-हाडला झाला. त्या वेळी त्यांच्यावर ‘‘ ही ज्योत अनंताची ’’ हे रामभाऊ जोशींनी लिहिलेले चरित्र तर्कतीर्थांच्या हस्ते प्रसिद्ध  झाले. त्या प्रकाशन समारंभाच्या वेळी मला ऐनवेळी अध्यक्षस्थान पत्करावे लागले. माझ्या अध्यक्षीय भाषणात मी म्हणालो, ‘‘वेणूताई हा चव्हाणांच्या देवघरातला नंदादीप होता. नंदादीप कधी विझत नसतो, मालवत नसतो!’’

यशवंतराव समोरच कोचावर बसले होते. माझे भाषण ऐकताना त्यांचे डोळे चांगलेच पाणावले होते!