• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११८

११८. मंत्रदाता, दृष्टा नेता – वि. ना. देवधर

श्री.यशंवतराव चव्हाण हे एक सुसंस्कृत, संमजस, आणि शक्य तितके सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते होते. त्यांचा मित्रपरिवार पाहिला म्हणजे त्याची साक्ष पटल्याशिवाय राहात नाही. प्रा.ना.सी.फडके हे तर त्यांचे गुरू होते. पण फडके, खांडेकर या त्यांच्या आधीच्या पिढीतील खंदे साहित्यिक, त्यांच्याशी यशवंतरावांनी जवळीक ठेवलेली होतीच. पण त्यांच्या पिढीतील अत्रे, भावे, माडगूळकर यांच्याशीही त्यांचे तेवढेच निकटचे संबंध होते. तसेच निकटचे संंबंध त्यांनी द.मा.मिरासदार, धाकटे माडगूळकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांच्या पिढीतील साहित्यिकांशी ठेवले होते. या क्षेत्रात त्यांनी ‘‘जनरेशन गॅप’’ येऊ दिली नव्हती, हे त्यांच्या रसिकतेबरोबरच ताजेतवानेपणाचेही गमक मानावे लागेल. त्याही नंतरच्या दलित साहित्यिकांशी त्यांचा उत्तम ‘‘रॅपोर्ट’’ होता, हे प्रासंगिक भाषणातून समजत असे. साहित्याच्या क्षेत्रातील त्यांचा हा संपर्क केवळ दलित साहित्याच्या क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्राची जी एक वैचारिक साहित्याची परंपरा होती, त्या परंपरेशीही ते चांगले परिचित होते. मराठी भाषेत ‘‘विश्वकोश’’ (एन्सॉयक्लोपीडिया’’) तयार व्हावा व त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, हे त्यांना भावले ते या परिचयामुळेच. तर्कतीर्थ जोशी यांच्या समर्थ खांद्यावर ही जबाबदारी त्यांनी सोपविली. तीही केवळ मित्रकर्तव्य म्हणून नव्हे तर विश्वकोशाची निर्मिती ‘‘उत्तम’’ व्हावी या जाणिवेने. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहाशी ते समरस झालेले होते. लोककला, रंगभूमी, चित्रपटसृष्टी या सा-याबद्दल त्यांची आस्था अनुपमेय होती, कलावंतांशी राज्यकर्ते म्हणून ते कधीही आश्रयदाते म्हणून वागले नाहीत, तर त्यांच्याशी आदरयुक्त स्नेहभाव त्यांनी ठेवला होता.

नेतृत्व यशस्वी व्हायला केवळ एवढ्या गोष्टी पुरेशा होत नाहीत. प्राप्त परिस्थितीत स्वत:ची अशी खास ‘‘कॉन्ट्रिब्युशन’’ जो करू शकतो तोच नेता यशस्वी होतो.

अशा नेत्यांकडून इतर राजकीय डावपेचाच्या जोडीने आवश्यक असते, तीं दूरदृष्टी. पायापासले पहाणारा राजकारणी पुरूष इतिहासावर ठसा उमटविणारा नेता कधीच होत नाही, होऊ शकणार नाही. ज्याची दृष्टी पिढ्या-दोन पिढ्यांच्या पुढल्या भविष्यकालाचा वेध घेते तोच द्रष्टा नेता. श्री.चव्हाण हे अशा प्रकारचे पुढचे पाहणारे द्रष्टे नेते होते. याची लहानमोठी अनेक प्रमाणे देता येतील. पण महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या सुरक्षित आणि विकसनशील असे राज्य बनविण्याचे धोरण अवलंबिले होते. याचे विस्मरण नको. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याला विरोध करणारे आक्षेप घेत होते की, हे शिपाई गडी मराठे यांना कारखानदारीतले काय कळते? मुंबईतील कारखाने पळून जातील.

या विधानातील अतिशयोक्ती सोडून द्या, पण अशी भीती अनेक व्यापारी संघटनांनी व्यक्त केली होती. श्री.चव्हाण यांनी वर्ष दोन वर्षांतच असे धोरण अवलंबिले की, महाराष्ट्र हे ही उत्तम औद्योगिक राज्य होऊ शकते; असा विश्वास उद्योगपतींत निर्माण झाला. एकीकडून टाटा, बिर्ला, मफतलाल या उद्योगपतींशी वैयक्तिक संबंध स्नेहपूर्ण ठेवले तर दुस-या बाजूने जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या लढाऊ कामगार नेत्यांशी व डांगे यांच्यासारखा मुरब्बी नेत्यांशीही स्नेह ठेवून मुंबईतील औद्योगिक शांतता प. बंगालमधील कम्युनिस्टांच्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर एवढी उठून दिसली की, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पाच वर्षांत या राज्यात जेवढी भांडवल गुंतवणूक झाली तेवढी इतर राज्यात झाली नाही. औद्योगिक शांतता हा विकासाचा फार मोठा घटक असतो व तो यशवंतरावांच्या सामंजस्य आणि तडजोडवादी भूमिकेमुळे महाराष्ट्रात व विशेषत: मुंबईत उपलब्ध झाला. यशवंतरावांचे महाराष्ट्राचे नेते म्हणून मूल्यमापन करताना या एका घटकाचे विस्मरण होऊ देणे योग्य ठरणार नाही.

पण केवळ या गोष्टीमुळे ते द्रष्टे किंवा मंत्रदाते ठरले असे नव्हे तर ते त्यांचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. तोच नेता यशस्वी होतो की जो आपल्या अनुयायांना भारून टाकणारा मंत्र देतो आणि या मंत्राच्या अंमलबजावणीसाठी तंत्र देतो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनाकाळात यशवंतरावांनी महाराष्ट्राला असा मंत्र दिला तो ‘‘कृषि -औद्योगिक समाजरचनेचा’’. या एका मंत्राने महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग कार्यकर्त्याना आणि प्रशासनाला स्पष्ट दिसू लागला. शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय. पण महाराष्ट्रात शेतीवर आधारित असे उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजेत हा या कृषि औद्योगिक समाजरचनेचा अर्थ होता. ऊस, कापूस ही महाराष्ट्रातील प्रमुख पिके. त्यावर आधारित उद्योगाची एक बृहत् योजना यशवंतरावांच्या डोळ्यासमोर होती. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, कापड गिरण्या यांच्या रूपाने गेल्या वीस वर्षांत ही कल्पना मोठ्या प्रमाणात साकार झाली. हे सारे कृषिऔद्योगिक विकासाच्या मंत्रात सामावलेले होते.