• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११०

११० - महाराष्ट्राचा मोहरा हरपला – साधना साप्ताहिक

सातारा जिल्ह्यातील अगदी गरीब कुटुंबात जन्मलेल्या यशवंतरावांनी कष्टाने आणि हिमतीने शिक्षण केले. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात, आईने त्यांच्यावर स्वाभिमानी जीवनाचा केलेला संस्कार, कराडमधील त्या वेळचे सार्वजनिक जीवन, म.फुले यांच्यामुळे बहुजन समाजात अंकुरलेल्या नव्या आकांक्षा, स्वातंत्र्य चळवळीचा संवेदनाक्षम विद्यार्थ्यांच्या मनावर झालेला परिणाम, यांचे मोठे बहारीचे चित्र रेखाटले आहे. विद्यार्थी असताना यशवंतरावांना वाचनाची आवड निर्माण झाली आणि ग्रंथांच्या संस्कारातून त्यांच्या मनास योग्य ते वळण लागले. समाजातील जातिभेदाविरूद्ध सत्यशोधक समाजाने घेतलेली भूमिका त्यांना पटत होती, परंतु त्याच वेळी लो.टिळक ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध ज्या झुंजारपणाने लढले त्याचेही त्यांच्या मनाला मोठे आकर्षण वाटत होते. १९३० साली यशवंतराव मॅट्रिकच्या वर्गात असताना त्यांनी म.गांधींच्या हाकेला ओ देऊन सत्याग्रह केला आणि त्यांना कारावासाची शिक्षा झाली. तुरूंगामध्ये त्यांच्या वाचनाला निश्चित वळण लागले. तुरूंगातील आठवणी लिहिताना आचार्य भागवत यांचे, कार्यकर्त्याचे शिक्षण करणारे आदर्श आचार्य म्हणून यशवंतरावांनी आत्मचरित्रात केलेले वर्णन वाचताना तुरूंग हे कार्यकर्त्याचे विद्यापीठ कसे होते याची योग्य कल्पना येते.

राजाराम कॉलेजमध्ये गेल्यावर यशवंतरावांच्या बौद्धिक जीवनाला एक शिस्त लागली व वाचनातही विविधता निर्माण झाली. बी.ए. व एल्एल्.बी. झाल्यावर यशवंतरावांनी वकिली सुरू केली आणि चलेजावची चळवळ आली. एका वेळी रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आलेल्या यशवंतरावांनी रॉय यांची भूमिका बाजूस सारून राष्ट्रवादी भूमिकेवरून स्वांतत्र्य आंदोलनात धडाडीने काम करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीस झालेल्या पुढा-यांच्या धरपकडीत पकडले न जाता यशवंतराव भूमिगत झाले. पुढे त्यांनी क्रान्तिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारमध्ये काम केले. या चळवळीच्या अंतरंगातील विविध प्रवाहांचे यशवंतरावांचे ज्ञान मोठे अचूक होते. मोजक्या शब्दात सातारा जिल्ह्यातील भूमिगत आंदोलनाची ठसठशीत वैशिष्ट्ये त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात रेखाटली आहेत.

१९४६ साली यशवंतराव चव्हाण मुंबई असेंब्लीत निवडून गेले आणि बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात ते पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. यशवंतरावांना जी संधी मिळाली, तिच्यातून त्यांच्या गुणांचा अधिकाधिक विकास होत गेला. प्रशासनातील अडचणी त्यांना समजून आल्या. त्याच बरोबर पक्षातील कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाला वाव देऊन समाजाला नवीन वळण कसे द्यावयाचे या दृष्टीने ते आत्मविश्वासपूर्वक काम करू लागले. ग्रामीण भागातील कठोर वास्तव त्यांनी अनुभवले होते. हा अनुभव आणि प्रशासनकार्यातून आलेला आत्मविश्वास यामुळे अल्पावधीतच महाराष्ट्राच्या काँग्रेस संघटनेत व राजकीय जीवनात यशवंतरावांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.

यशवंतराव चव्हाण यांचे काही राजकीय आडाखे पक्के होते. पं. नेहरूंच्यावर, त्यांच्या पुरोगामी विचारांवर त्यांची अविचल निष्ठा होती. त्याचबरोबर पक्ष संघटनेचे महत्त्वही त्यांनी अचूक ओळखले होते. काँग्रेस पक्षात ते त्यांचे विचार स्पष्टपणे मांडीत, परंतु मतभेद टोकाला नेणे हे त्यांना अव्यवहारीपणाचे आणि कार्यघातक वाटे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी हीच भूमिका घेतली. त्या वेळी यशवंतरावांच्यावर अनेकांनी कठोर टीका केली. परंतु यशवंतरावांनी पं.नेहरूंच्या समवेतच राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या हिताची त्यांना काळजी होतीच. पण हे हित कोणत्या रीतीने साधावयाचे यासंबंधी ते मुत्सद्देगिरीने निर्णय घेत होते. १९५७ साली यशवंतराव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे सामर्थ्यओळखून यशवंतरावांनी तणावाचे वातावरण कमी करून महाराष्ट्राच्या जीवनात राजकीय सौहार्दाचे वातावरण ज्या त-हेने निर्माण केले त्यातून लोकशाहीचा संस्कार मराठी मनावर निश्चितच झाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी माडखोलकरांना सडेतोड उत्तर देताना सांगली येथे केलेल्या भाषणात ‘‘संयुक्त महाराष्ट्र हे सर्व मराठी भाषिकांचे राज्य असेल. ते केवळ मराठ्यांचे राज्य असणार नाही’’ हे दिलेले आश्वासन फार महत्त्वाचे होते आणि त्यातून यशवंतरावांचा व्यापक दृष्टिकोण व्यक्त झाला.

१९५७ ते १९६२ या काळात मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी केलेले कार्य अतिशय मोलाचे होते आणि या कामामुळे ते आधुनिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीचे शिल्पकार मानले जातात. यशवंतरावांनी बहुजनसमाजाला एक नवीन आत्मविश्वास दिला.