• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११०-१

श्री. बाळासाहेब खेर व ब-याच अंशाने मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात शहरी, पांढरपेशा मंर्त्याचे वर्चस्व होते. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यामध्ये ग्रामीण नेतृत्वाला निश्चित स्थान मिळाले. विधिमंडळाचे कामकाजही मुख्यत: मराठीतच होऊ लागले. मात्र केवळ मंत्रिमंडळात मूठभर व्यक्तींना स्थान देणे ही यशवंतरावांची दृष्टी नव्हती. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका यांचे जाळे निर्माण करून कार्यकर्त्याच्या उपक्रमशीलतेला वाव देता येईल हे यशवंतरावांनी अचूक हेरले. पद्मश्री विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्याच्या उत्तरभागातील कामाचे महत्त्व त्यांनी बरोबर ओळखले. डॉ.धनंजयराव गाडगीळ यांचा सल्ला यशवंतराव फार मानीत असत. पद्मश्री विखे पाटील तसेच स्वातंत्र्य चळवळीत कार्य केलेले रत्नाप्पा कुंभार, वसंतदादा पाटील आदींच्या संघटनचातुर्याच्या आणि विधायक कर्तृत्वाच्या मागे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळेच महाराष्ट्रात सहकारी चळवळ फोफावली.

राजकीय क्षेत्रात सत्तेचे विकेन्द्रीकरण झाले पाहिजे आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्याना विकासकार्यात सहभाग मिळावा हा यशवंतरावांचा दृष्टिकोण होता आणि या दृष्टीनेच ना.वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांची त्यांनी उभारणी केली. आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनातील हे फार महत्त्वाचे पाऊल होते. ही गोष्ट खरी की प्रत्यक्षात यामुळे बागाईत शेती करणा-या शेतक-यांची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त पकड निर्माण झाली ! सहकारी संस्था, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या या सत्तास्थानांमधून गटबाजी व गळेकापू स्पर्धा सुरू झाली. अर्थात याबद्दल दोष यशवंतरावांना देता येणार नाही.

दुस-या एका गोष्टीचा येथे उल्लेख करणेही आवश्यक आहे. एका भाषणात श्री.यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, महाराष्ट्रातील प्रश्न हा मुख्यत: जिराईत शेतीचा प्रश्न आहे. परंतु या जिराईत शेतक-याची स्थिती सुधारेल, त्याच्या जीवनावर कायम पडलेले दुष्काळाचे सावट दूर होईल यासाठी पुरेसे उपाय योजण्यात आले नाहीत.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रसारासंबंधीही यशवंतरावजींच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या द्वारा ग्रामीण भागात जे शिक्षणप्रसाराचे कार्य केले त्याचे महत्त्व यशवंतराव पुरेपूर जाणत होते. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंतराव हे पंचवीस वर्षाहून अधिक काल राहिले ही त्यांची कृती अत्यंत उचित होती. ‘‘ग्रामीण भागात महाविद्यालये काढण्याच्या निर्णयामुळे शिक्षणाचा दर्जा खाली येईल.’’ अशी टीका झाली. त्या टीकेतील सत्य समजत असले तरी जो वर्ग पिढ्यान्पिढ्या ज्ञानापासून वंचित राहिला त्या शेतकरी समाजातील पहिल्या पिढीला उच्च शिक्षणाची संधी मिळणे हेही सांस्कृतिक जीवनातील दरी कमी करण्यासाठी जरूर आहे, ही यशवंतरावांची वास्तववादी भूमिका होती. ग्रामीण भागातील ग्रॅज्युएट झालेल्यांना नोक-या मिळत नाहीत या टीकेला उत्तर देताना, ‘‘अशिक्षित बेकारांपेक्षा सुशिक्षित बेकार वेगळीच आव्हाने समाजापुढे निर्माण करील व त्यातूनच सामाजिक प्रगती होईल.’’ हे यशवंतरावांनी दिलेले उत्तर समर्पक व दूरदृष्टीचे द्योतक होते.

१९६२ साली चिनी आक्रमणाच्या वेळी भारतीय सेनेला जी माघार घ्यावी लागली त्यामुळे राष्ट्राचा तेजोभंग झाला. अशा वेळी पं.नेहरूंनी त्या वेळचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्या राजिनाम्यानंतर यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून बोलावून घेतले. त्यावेळी महाराष्ट्राला तो आपला गौरव वाटला आणि या घटनेचे वर्णन ‘‘हिमालयाच्या मदतीस सह्याद्री धावून गेला’’असे करण्यात आले. यशवंतरावांनी ही जबाबदारी स्वीकारणे योग्यच होते.

यशवंतरावांनी दिल्लीमध्ये संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, उपपंतप्रधान आदी विविध पदांवरून काम केले. ते अतिशय कुशल प्रशासक होते. मुख्य समस्या कोणत्या आहेत हे ते अचूक जाणीत असत. ते मोजकेच बोलत. चर्चा विचार-विनिमय सतत करीत. निर्णय घेताना ते हट्टाग्रह धरीत नसत. परंतु निर्णय तत्त्वांच्या आधारे व्हावा, तो करताना वास्तवाचे भान कायम राहावे आणि त्याचबरोबर एकदा निर्णय झाला की, त्याची अंमलाजावणी खंबीरपणे व्हावी ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती. देशाच्या दृष्टीने या जबाबदा-या यशवंतरावांनी स्वीकारल्या हे योग्य झाले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्याशी त्यांचा पूर्वीचा संपर्क काहीसा कमी झाला आणि त्यामुळे येथील काही अनिष्ट प्रवृत्तींना आटोक्यात ठेवणे त्यांना शक्य झाले नाही.

समाजपरिवर्तन झाले पाहिजे हा यशवंतरावजींचा दृष्टिकोण स्पष्ट होता. परंतु सत्तेचा वापर करून या परिवर्तनप्रक्रियेस गती दिली पाहिजे आणि असा सत्तेचा योग्य वापर सत्ताधारी पक्षाने सतत केला पाहिजे अशी यशवंतरावांची भूमिका होती. राजकारणात असताना यशवंतरावांची रसिकता कधी लोपली नाही. त्यांच्या मनाला कधी रूक्षपणा आला नाही. साहित्यावर त्यांचे अलोट प्रेम होते. ते स्वत: मराठी उत्तम लिहीत. त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग हा मराठी साहित्याचा एक अलंकार आहे. हे आत्मचरित्र पुरे व्हावयास हवे होते. दुर्दैवाने ते घडले नाही.यशवंतरावांचे ग्रंथप्रेम हा त्याच व्यक्तिमत्त्वाचा एक विलोभनीय पैलू होता.

आज देश कठीण अवस्थेतून जात असताना कोणत्याही एका पक्षाचे नेतृत्व सर्व समस्या सोडवू शकणार नाही. अशा वेळी यशवंतराव चव्हाणांसारखा व्यापक दृष्टिकोण ठेवणारा मुत्सद्दी केन्द्रीय मंत्रिमंडळात असणे आवश्यक होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यशंवतराव हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांबरोबर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून नंतरच निर्णय घेत. ही कार्यपद्धतीच लोकशाहीला योग्य असून भारतासारख्या खंडप्राय देशात राज्यकर्त्यांनी विविध दृष्टिकोण सामावून घेतले पाहिजेत. यशवंतरावांसारखा ज्येष्ठ मुत्सद्दीच आत्मविश्वासाने अशी कार्यपद्धती स्वीकारू शकतो.