२५. कृष्णाकाठचा सुपुत्र – शंतनुराव किर्लोस्कर
यशवंतराव चव्हाणांचा आमच्या किर्लोस्करवाडी गावाशी फार जुना संबंध होता. यशवंतराव कराडचे. किर्लोस्करवाडीपासून कराड तीस-बत्तीस मैलांवर. यशवंतरावांच्या ओळखीचे कितीतरी लोक आमच्या किर्लोस्करवाडीत राहात. माझा व यशवंतरावांचा व्यावसायिक संबंध मात्र सुरूवातीला फारसा नव्हता. ते लहान वयातच राजकरणात शिरले तर मी कारखानदारीत.
मी स्वत: राजकारणात शिरलो नसलो तरी आमचे किर्लोस्कर कुटुंब आणि किर्लोस्करवाडी गाव मात्र राजकारणात भाग घेई. माझी आई, कै.ममा, (राधाबाई किर्लोस्कर), माझी पत्नी सौ.यमुनाताई यांनी पुढाकार घेऊन सूतकताईचे वर्ग चालविले होते. किर्लोस्करवाडीत प्रभात फे-या निघत. त्यात दोघीही पुढाकार घेत. माझे वडील कै.लक्ष्मणराव (पपा) किर्लोस्कर हे तर निष्ठेने खादी वापरीत. त्यावेळचे राजकीय पुढारी किर्लोस्करवाडीला भेट देत, प्रचार करीत, व्याख्याने देत. महात्मा गांधींनी पुरस्कारलेल्या प्रत्येक लढ्याला किर्लोस्करवाडीने प्रत्यक्ष कार्य करून सक्रिय पाठिंबा दिला. पपांनी किर्लोस्करवाडीत अस्पृश्यता पाळलीच नाही व त्यासाठी शेजारच्या कुंडल गावच्या ब्राह्मणांनी टाकलेल्या बहिष्कारालाही तोंड दिले! राजकीय दृष्टीने किर्लोस्करवाडी जागृत होती. माझे वडील पपा स्वातंत्र्य संग्रामाला पैशाची आणि इतरही खूप मदत करीत.
१९४२ सालच्या स्वातंत्र्य युद्धात किर्लोस्करवाडीला विशेष महत्त्व आले. ह्या काळात यशवंतरावांचा आणि किर्लोस्करवाडीचा संबंध वाढला. ह्या स्वातंत्र्य युद्धात किर्लोस्करवाडीचे विशेष स्थान होते. सांगली, सातारा, कराड आणि भोवतालची गावे ही हिरीरीने १९४२ च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेत होती. त्यावेळी ही गावे ब्रिटिशांच्या हद्दीत होती तर किर्लोस्करवाडी औंध संस्थानात होती. वाडीची माणसे प्रत्यक्ष चळवळीतही होती. इस्लामपूरच्या तहसील कचेरीवर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासाठी गेलेल्या मोच्र्यात किर्लोस्करवाडीचे एक तरूण इंजिनिअर उमा शंकर पंड्या हे डी.एस.पी. पेद्रस यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले. त्या मोच्र्यात किर्लोस्करवाडीच्या गोविंदराव खोत व इतर ब-याच राजकीय कार्यकर्त्यानी भाग घेतला होता. पुढे ब्रिटिशांविरूद्ध ‘चले जाव’ चळवळीतले बरेच पुढारी व कार्यकर्ते ‘भूमिगत’ झाले आणि वाडीला विशेष महत्त्व आले. किर्लोस्करवाडी औंध संस्थानात असल्याने राजकीय पुढा-यांना पकडण्यासाठी ब्रिटिश शासनाखाली असलेल्या पोलिसांना औंध संस्थानच्या शासनाच्या सहकार्याशिवाय वाडीला येता येत नसे. त्यास वेळ लागे व शिवाय वाडीला येऊन राहणा-या राजकीय पुढा-यांना आधी सूचना मिळे व ते निसटून जात. यशवंतरावही त्या वेळी ‘भूमिगत’ होते. त्यांच्या विशेष ओळखीचा एक तरूण किर्लोस्करवाडीला राहात असे.
पुष्कळदा यशवंतराव त्याच्या घरी येऊन राहात. वाडीच्या लोकांना हे माहीत होते. पण कोणीही बोलत नसत व पोलिसांना पत्ता लागू देत नसत. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य ळाल्यानंतरही काही वर्षे राजकीय पुढारी आणि कारखानदार आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एकत्र काम करीत होते. नंतर समाजवादाचे वारे जोरात आले आणि हे दोन्ही वर्ग दूर जाऊ लागले. १९६० ते ७० ह्या दशकात ह्या दोन्ही वर्गांतले मतभेद वाढत गेले. यशवंतराव महाराष्ट्रातून केंद्रीय सरकारची धोरणे ते आपल्या प्रभावी वक्तृत्वाने मांडू लागले व त्या धोरणांचा आग्रह धरू लागले. मी भारतीय उद्योग-व्यावसायिकांच्या मध्यवर्ती संघटनेचा प्रथम उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष झालो. (१९६४-६६) त्यावेळी आर्थिक धोरणात मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंधात अंतर पडले नाही. यशवंतराव भारत सरकारची धोरणे मांडीत. त्या धोरणांवर मी टीका करीत असे. पण आमच्या व्यक्तिगत संबंधात त्यामुळे काही फरक पडला नाही. जेव्हा आमच्या भेटी होत तेव्हा थट्टाविनोद होई. त्याला यशवंतरावांचा स्वभावही कारणीभूत होता. विरोधक असले तरी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून, नीट समजावून घ्यायचा त्यांचा स्वभाव होता. कोल्हापूर ते कराड ह्या भागात किर्लोस्कर कारखान्यामुळे झालेली प्रगती यशवंतराव अभिमानाने इतरांना सांगत. कै.पपांच्या जन्मशताब्दीच्या समारंभात आम्ही सर्वांनी पपांचा पुतळा किर्लोस्करवाडीला उभा केला.
त्याच्या उद्घाटनाच्या वेळी यशवंतरावांनी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘आज एखादा कारखाना उभा करायचा तर प्रथम आपण वीज, पाणी, रस्ता, फोन ही सारी आहेत का ह्याची खात्री करून घेतो. आजची तरूण पिढी सर्व सोयी असल्या तरी कारखाने काढावेत का नाही ह्याचा विचार करते. कै. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत कारखाना काढला तेव्हा कारखान्याला अनुकूल असे काहीच नव्हते. प्यायला पाणी सुद्धा नव्हते. उजाड रान होते. पण लक्ष्मणरावांचा निश्चय कडवा होता. चिकाटी दांडगी होती. आत्मविश्वास पक्का होता. त्यांनी कारखाना काढला, यशस्वी केला आणि इतरांना शिकवून स्फूर्ती देऊन, आणखी कारखाने काढण्यास मदत केली. हे कर्तृत्व असामान्य आहे.’’ तसेच मी कारखाने वाढविले, जगभर महाराष्ट्रात तयार केलेला माल पोहोचवला ह्याचेही तोंड भरून कौतुक केले. त्या समारंभाला वसंतदादाही होते. दोघेही एकाच आपलेपणाने आले, बोलले.
मला वाटते यशवंतराव जितके मोठे झाले त्यापेक्षा आणखी कितीतरी मोठे व्हायला पाहिजे होते. मला राजकारणातल्या अंतर्गत वाटा, प्रवाह ह्यांचा अनुभव नाही. ह्या प्रवाहांचा, वाटांचा यशवंतरावांच्या आयुष्यावर जो परिणाम झाला असेल त्यामुळेही पुढे पुढे त्यांच्या मोठ्या पदाला धक्का पोचला असेल ! ते गेले तेव्हा मला वाटले यशवंतरावांच्या कर्तबगारीच्या मानाने त्यांना आणखी मानाचे स्थान मिळावयास हवे होते. कदाचित माझी ही भावना व्यक्तिगत असेल. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर कृष्णाकाठची ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी खाऊन वाढलेले आम्ही. आमच्यातून ते गेले तेव्हा त्यांची जागा जी रिकामी झाली ती रिकामीच राहिली !