१९५७ च्या विधानसभेच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळींनी मनोभावे सक्रिय सहभाग घेतला याचा आम्हास आनंद वाटतो.
१९५७ ची निवडणूक म्हणजे क-हाडच्या, (तालुक्यातील ते कुरूक्षेत्रच होते) एका अर्थाने श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या, राजकीय जीवनाची सत्त्वपरीक्षा होती. नव्हे ती तर महाराष्ट्राच्या भवितव्याची नांदी ठरणार होती. क-हाडच्या राष्ट्राभिमानी मतदारांनी पक्षावरील निष्ठेने, अत्यंत बाणेदारपणाने यशवंतरावांना यशस्वी केले. त्या कामी आमच्या कार्वे गावचा व माझ्या मित्रांचा सिंहाचा वाटा आहे याबद्दल आम्हास चिरंतन अभिमान वाटतो. पुढे यशवंतराव यांचे मित्रप्रेम आणि गावावरील लोभ याचे दर्शन आम्हाला अनेक वेळा झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील व श्री. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सांगण्यावरून मी ५२ ची निवडणूक लढविली. निवडणूक म्हणजे जय-पराजय, झंझावाती प्रचार हे सर्व आलेच. काही मंडळींनी आम्हाला जबरदस्त विरोध केला. निवडणूक होऊन गेली. मला राहवेना म्हणून साहेबांजवळ माझे मन मी मोकळे केले.
पुढे माझे मुलीचे लग्नात सर्वच मंडळी कार्वे येथे जमली होती. या मंगल कार्यासाठी फलटणचे मालोजीराव नाईक निंबाळकर, कर्मवीर आण्णा व साहेब असे सर्वचजण आले होते. ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोहोचविणारे आण्णा व समाजप्रबोधन करून देशाला प्रभावी नेतृत्व देणारे यशवंतराव या निमित्ताने एकत्र आले होते. दोघेही आमचे घरातील माडीवर मुक्तपणे चर्चा करत होते. मला भेटीबद्दल कुतूहल होतेच. ते काय बोलतात ते जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. मी तेथेच रेंगाळत होतो. आण्णा यशवंतरावांना म्हणाले, ‘‘यशवंता, तुझे व माझे काही बाबतीत मतभेद झाले असतील पण एक लक्षात ठेव, मी हा जो एवढा अवाढव्य शिक्षणाचा प्रपंच मांडला आहे तो पुढे कोण सांभाळणार? मी आता थकलो. या सर्व शिक्षणाचा गाडा पुढे चालविण्याची क्षमता तुझ्यातच आहे. ’’ आण्णांनी साहेबांकडून होकार मिळविला. साहेब रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले.
यशवंतरावांच्या मातोश्री विठाई यांचे वास्तव्य कराडला होते. वृद्धापकालाने त्या फारच आजारी होत्या. मी अधूनमधून शुक्रवार पेठेतील घरी जात असे. साहेब तर आईच्या भेटीसाठी दिल्लीहून देखील कामाचा प्रचंड व्याप सांभाळून येत असत. एकदा साहेब येणार अशी वार्ता माझ्या कानी आली होती. मी सायंकाळी ४ च्या सुमारास यशवंतरावांचे घरी जाऊन पोहोचलो. साहेब आईची तब्येत पाहण्यासाठी डॉ. ग्रँटना बरोबर घेऊनच आले होते. विठाई फारच थकलेल्या होत्या. डॉक्टरनी विठाईना पाहिले. प्रकृती गंभीर होती. त्यांनी साहेबांना काही गोष्टी सुचविल्या व ते निघून गेले. मी तेथेच उभा होतो. यशवंतराव मातोश्रींशेजारी बसले होते. विठार्इंनी यशवंतरावांचे हात धरले. त्यांच्या तोंडून लवकर शब्द बाहेर पडेना. अखेर त्या क्षीण आवाजात म्हणाल्या; ‘‘यशवंता, टांग्याला पैसे कोठून रे दिलेस?’’ यशवंतरावांचे डोळे अश्रूंनी दाटून आले. साराच प्रकार गंभीर. मला काहीच कळेना. थोड्या वेळाने मी व साहेब बाहेरील बाजूस आलो. आमच्या इतर काही गप्पा सुरू होत्या. मी साहेबांना म्हणालो, ‘‘रागावणार नाही ना? एक विचारू का?’’ साहेब म्हणाले, ‘‘विचार.’’ मी म्हणालो, ‘‘साहेब विठाई टांग्याचे पैसे इ. काय म्हणत होत्या?’’ साहेब एकदम गंभीर झाले व म्हणाले, ‘‘संभाजीराव, माझ्या सर्व गोष्टी ध्यानात आहेत. मी कोल्हापूरला कॉलेजसाठी होतो. घरची अत्यंत गरिबी, कोल्हापूरहून इकडे मुद्दाम रात्री येत असे. स्टँडवर उतरल्यावर सर्व सामान डोक्यावर घेऊनच पायी घरी येत असे. एकदा जरा सामान जास्त म्हणून रात्री टांगा केला व घरी आलो. आईने विचारले, यशवंता, टांग्याला पैसे कोठून दिलेस? साहेब त्या आठवणीने पुन्हा गंभीर झाले. थोडे बेचैन झाले. मी तर ऐकून स्तिमितच झालो. मला वाटले यशवंतरावांचा जीवनमार्ग अनंत अडचणींनी संकटांनी व्यापलेला आहे. पण असा खडतर मार्ग यशस्वी रितीने पार करणारे साहेब, खरेच धन्य.