• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २२

२२. एक कार्यकर्ता, एक नेता – वामनराव कुलकर्णी

यशवंतराव चव्हाण रॉयवादी होते, आणि म्हटले तर नव्हतेही. देशपातळीवर जे जे अत्यंत उच्च नेते झाले त्यांच्यात त्यांचा समावेश होतो. ज्यांची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विश्लेषण करण्याची जबरदस्त हातोटी होती त्यापैकी यशवंतराव एक होते. माझा आणि यशवंतरावांचा परिचय अगदी घनिष्ठ होता. सन १९३२ पासून ते ४० सालापर्यंत आम्ही एकत्र काम केले. येरवडा जेलमध्ये आम्ही एकत्र होतो. मी तसा रॉयना मानणारा आणि रॉयवादी कार्यकर्ता होतो. यशवंतराव चव्हाण हे त्या वेळी माझ्या मते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. सातारा जिल्ह्यात त्या वेळी आत्मारामबापू पाटील यांचे नेतेपद निर्विवाद होते. असेंब्लीच्या निवडणुकीच्या वेळी आत्मारामबापू पाटील ३६ हजार मतांनी निवडून आले.
 
तिकीट कोणाला द्यायचे, हे अच्युतराव पटवर्धन, जेधे, शंकरराव देव यांनी विचारले. त्या वेळी मी त्यांना आत्मारामबापूंचे नाव सुचविले. त्या वेळच्या काँग्रेसमध्ये काँग्रेस सोशालिस्ट पार्टी असा गट होता. त्यात कम्युनिस्ट होते. रॉयिस्ट होते. यशवंतराव मात्र सोशालिस्ट, कम्युनिस्ट की रॉयिस्ट या तीनपैकी कोणत्या गटात जायचे, या संभ्रमावस्थेत होते. रॉय त्यांना समजला किंवा नाही, हा भाग वेगळा, परंतु रॉयिस्ट विचारसरणीचा गौरव यशवंतराव नंतर नंतरच्या काळात आपल्या भाषणात करीत असत. म. गांधीजींच्या आदेशाने अहिंसेद्वारा राज्य पदरात पडेल, असे मी, लालजी पेंडसे अशा मंडळींना वाटत नव्हते. १९३२ मध्ये यशवंतराव आमच्या गटात सामील झाले. सातारा जिल्ह्यात त्या वेळी मी पोलिस खात्यात नोकरीला होतो. मी ती नोकरी सोडून बाहेर पडलो. त्यामुळे जनमानसात एक उसळी तयार झाली. त्या वेळी आम्ही बिळाशी येथे सत्याग्रह केला. या सत्याग्रहामुळे सातारा जिल्हा खडबडून जागा झाला. जुन्या कार्यकर्त्याच्या संघटित आंदोलनामुळे तरुण कार्यकर्ते आम्हाला येऊन मिळाले. जेलमध्ये आम्ही अडकलो, त्या  वेळी आमच्यावर ‘‘रॉयवादी’’ लेबल लागले. १९३४ मध्ये सातारा जिल्ह्यात आपले कार्यकर्ते किती आहेत, हे पाहावे म्हणून मी क-हाडात मुक्काम ठोकला. जेलमध्ये भेटलेले सर्व मित्र रॉयिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे कार्यकर्त्याची चाचपणी करायची मी ठरविले.

मात्र त्या वेळी यशवंतराव चव्हाण कोणी होते का? का ते नगण्य होते? असा मी विचार केला. तर त्या वेळी ते तसे नगण्यच होते. सुमारे १२५ कार्यकर्ते आमच्या गटाकडे होते. दुसरा गट गांधीवादी होता. त्या गटाकडे २०-२५ कार्यकर्ते होते. मग मोठा गट कोणता? तर रॉयिस्ट! म्हणून यशवंतराव आमच्या प्रवाहात येऊन मिसळले. त्या वेळी सांगलीचे गौरीहर सिंहासने आमच्याबरोबर होते. असेंब्ली निवडणुकीनंतर मी, आत्माराम पाटील, गौरीहर सिंहासने, आबा फाटक आणि यशवंतराव असे बोरगावला जमलो होतो. त्या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली परंतु यशवंतरावांनी एका फुलस्केप कागदावर एक स्टेटमेंट लिहून आणले होते. कम्युनिस्ट पक्ष स्विकारावा, असे त्यात त्यांनी म्हटले होते. गौरीहर सिंहासने यांनी तो कागद वाचला व फाडून टाकला. ‘‘तू एकटा काही निर्णय घेऊ नकोस. सर्व कार्यकर्त्यानी मिळून निर्णय घेऊ.’’ असे सिंहासने यांनी त्यांना सांगितले. तरी देखील यशवंतरावांची संभ्रमावस्था जाईना!

क-हाडमध्ये यशवंतरावांच्या घरी मी बैठक घेतली व सातारा जिल्हा काँग्रेसची कमिटी निवडली. त्यात यशवंतराव चव्हाण व ह.रा.महाजनी यांना सेक्रेटरी म्हणून निवडले. ही पहिली व शेवटचीच बैठक ठरली. त्या बैठकीला फार माणसे नव्हती. अगदी २० ते २५ कार्यकर्ते होती. त्यानंतर काँग्रेस सोशालिस्ट पार्टीत मतभेद निर्माण झाले. समाजवादी मंडळी बाहेर पडून स्वतंत्र पार्टी करण्याच्या नादाला लागली. त्या वेळी रॉय यांनी दोन पत्रे लिहिली. ती पत्रे मी पं. नेहरूंना नेऊन दिली. लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनात ती पत्रे दिली.

मला तीन दिवस नेहरूंनी पाहुणा म्हणून थांबवून घेतले. परंतु त्या पत्रातील मजकुराचा जाहीर उल्लेख अलाहाबाद काँग्रेसमध्ये करू असे सांगितले. त्या पत्रात काँग्रेस सोशालिस्ट पार्टी फुटू नये, शिवाय काँग्रेसच्या निष्ठेला तडा जाऊ नये, असे लिहिले होते. दरम्यान १९३८ सालापर्यंत काँग्रेसमधील रॉयवादी गट स्वतंत्र आकार घेऊ लागला. त्रिपुरा काँग्रेसच्या वेळी या प्रकाराची दिशा स्पष्ट होऊ लागली. आता फार काळ रॉयिस्ट गट काँग्रेसमध्ये राहणार नाही असे मला वाटले. १९३९ मध्ये यशवंतराव रॉयिस्ट म्हणूनच काम करीत होते. परंतु सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट याबद्दलही त्यांच्या मनात द्विधा अवस्था होती. युद्धाचे सावट पडू लागले. १९४० ला वयैक्तिक सत्याग्रह सुरू झाला. त्याचवेळी युद्धाच्या बाजूने की विरोधी असा मतप्रवाह पुढे आला. सोशालिस्ट काँग्रेसबाहेर आणि रॉयिस्टही बाहेर पडले.

त्याचवेळी यशवंतराव काँग्रेसबरोबर राहिले. आम्ही अलग झालो. तथापि यशवंतरावांचे मोठेपण मी त्यांच्या जाहीर सभांतून पाहिले. ‘‘विचार कसा करावा हे मी रॉयपासून शिकलो,’’ असे ते सांगायचे. दूरगामी परिणामाचा विचार करणारा व विचार करण्याची क्षमता असलेला हा एकमेव नेता की, ज्याचा समावेश देशपातळीवरील निवडक नेत्यांतच होतो.