• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२२-२

सत्यशोधक समाजाच्या चळवळीनंतर व शे.का.पक्षाच्या निर्मितीनंतर बहुजनसमाज व उच्चवर्ग यांच्यात गेली अनेक वर्षे निर्माण झालेला दुरावा यशवंतरावांनी हळुवारपणे व सौहार्दाने दूर केला. हे त्यांचे दुसरे राजकीय सुयश आहे. विचाराने ‘बहुजनवादी’ असूनही यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विचारवंतांशी, साहित्यिकांशी, पत्रपंडितांशी, अर्थतज्ज्ञांशी, बुद्धिवाद्यांशी समंजस संवाद साधून त्यांचा स्नेह प्राप्त केला. शिवाय दुरून गंमत पहाणा-या या वर्गालाही त्यांनी जगन्नाथाचा रथ ओढायला उद्युक्त केले. यशवंतरावांनी या वर्गाला वेगवेगळ्या कामात स्वखुशीने जुंपून दिले. उत्तम साहित्यिक कृतीला बक्षिसे देण्याची योजना सुरू केली. वाईला नव्या ज्ञान यज्ञाची मुहूर्तमेढ रोवली. विद्वज्जनांचे, पंडितांचे, सरकारी सत्कार सुरू केले. अनेक सांस्कृतिक संस्थांना अनुदाने सुरू केली. जाणत्या पत्रकारांना दौ-यावर जाण्याची संधी प्राप्त करून दिली.

साहित्य संस्था, चित्रपट संस्था, वृत्तपत्र संस्था, नाट्य संस्था, शिक्षण संस्था, सांस्कृतिक संस्था, संशोधक संस्था, प्रकाशन संस्था, यांना जागा मिळवून देणे, अनुदान देणे, त्या त्या संस्था वाढीला लागतील असा प्रयत्न करणे या विविध क्षेत्रातील हुन्नरी माणसांना सरकारच्या विविध कमिट्यांवर नियुक्त करून त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा करून घेणे हे यशवंतरावांनी आवर्जून केले. आपल्या सहका-यांनाही तसेच करायला भाग पाडले. त्यामुळे ‘उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया’ अशी महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गाची स्थिती झाली, यशवंतरावांनी स्नेहाने विचारवंतांची मने जिंकली, आमीष दाखवून नव्हे. यशवंतरावांना मिळालेली ही विद्वन्मान्यता खरोखर हेवा वाटणारी अशी होती. विद्वानांना राज्यमान्यता हवी होती. व यशवंतरावांना विद्वन्मान्यता हवी होती. महाराष्ट्रात परंपरांचा कृष्णा-कोयना संगम होणे हा केवढा महत्त्वूर्ण योग आहे !

श्रेष्ठ राजकारणी पुरूषाला उज्ज्वल असे सार्वजनिक चारित्र्य असावे लागते. सत्ताधारी सर्वश्रेष्ठ पुरूष एका अर्थाने विराट समाज पुरूष ‘ट्रस्टी’ असावा लागतो. ट्रस्टीच लपंâगा असेल तर त्या समुदायाचे ते महान दुर्दैवच समजले पाहिजे. यशवंतरावांचे सार्वजनिक जीवनही उजाड होते. राजकारणी पुरूषांसंबंधी कितीतरी वदंता ऐकायला मिळतात. पण यशवंतरावांसंबंधी त्याच्या विरोधकांनीही- त्यांना खाली मान घालावी लागेल असे कुठे कधी आरोप केले नाहीत ! सत्ताधारी व्यक्तीला लक्ष्मीचा मोह अनावर होतो. रम, रमी, रमा या राजकारणी पुरूषाच्या मार्गातील तीन प्रचंड मोहमयी चेटकिणी असतात. पण यशवंतराव या चेटकिणीपासून लीलया दूर राहिले. यशवंतरावांना लक्ष्मीने कधी भुलविले नाही की कधी तोंडघशी पाडले नाही ! रम, रमी, रमा यांच्या भोव-यात भ्रष्ट झालेल्यांना व शरणांगतांना यशवंतरावांनी भले कीव येऊन संरक्षण दिले असेल, पण या मोहांचा त्यांच्या जीवनाला जराही स्पर्श झाला नव्हता ! विरागी पुरूषाचेच हे सारे लक्षण आहे.

यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचा सुसंस्कृत व सार्वजनिक चारिर्ताचा आरसा होता. श्रेष्ठ, शालीन जीवन कसे जगावे याचा तो कित्ता होता.

राजकारणी पुरूषाला विचाराची बैठक असावी लागते. त्याचे जीवनविषयक, समाजधारणाविषयक स्वत:चे खास तत्त्वज्ञान असावे लागते. त्या शुद्ध व लोककल्याणकारी तत्त्वज्ञानाने तो समाजपुरूषाशी जवळीक साधीत असतो. मराठमोळ्या माणसांशी स्नेह राखून, त्यांचे सर्वांचे हित साधून महाराष्ट्राचे मंगल करायचे हे यशवंतरावांचे स्वप्न होते ! जात, पंथ, नातेगोते, घराणे, धर्म यांच्या डबक्यात यशवंतराव कधी अडकले नाहीत. उगवत्या सूर्याला साक्षीदार ठेवून लोकोत्तर व राजकारणी पुरूषाची ती ध्येयस्पर्शी वाटचाल सुरूच होती. हिमालयाच्या सान्निध्यात राहणा-या या झुंझार पुरूषाला सह्याद्रीचा कधी विसर पडला नाही. यशवंतराव म्हणजे भारतीय राजकारणाला लाभलेला अजिंक्य सिंहकडा होता.