२२ मार्च १९५७ ला भारत कृषक समाज संस्थेची प्रथमच कॉन्फरन्स दिल्लीत व्हायची होती. मी या संस्थेचा लाईफ मेंबर झालो होतो आणि शेती या विषयावर रूरल लाईफवर मी एक चित्रप्रदर्शन (वन मॅन शो) दिल्लीत भरविणार होतो. त्यासाठी मला दिल्लीतील महाराष्ट्रीय पुढा-यांच्या ओळखपत्रांची गरज होती. मार्चमध्येच ना. यशवंतराव कराड मतदारसंघातून उभे होते, व उंब्रजला त्या दिवशी त्यांची जाहीर प्रचारसभा होती. तिथे त्यांना पलुसचे राजाराम पाटील व मी जाऊन भेटलो. त्यांना दिल्लीत चित्रप्रदर्शन भरविणार असल्याचे सांगितले व मला चारदोन लोकांच्या ओळखपत्रांची गरज असल्याचे सांगताच त्यांना ती कल्पना आवडली व तशाही गडबडीत त्यांनी चार दोन पत्रे दिली व त्यांना भेटा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही म्हणून सांगितले. त्याप्रमाणे खरोखरच मला त्या पत्रांचा खूप उपयोग झाला. त्या वेळचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना भेटता आले. त्यांना मी केलेले कल्याणचा खजिना या विषयीचे चित्र महाराष्ट्राचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंगाचे चित्र भेट म्हणून त्यांना दिले. ते राष्ट्रपती भवनात लागले आहे. आणि एक चित्र पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी हे स्त्री मासिकावर प्रसिध्द झालेले चित्र पंडितजींना आवडले होते, ते त्यांना दिले. त्यांच्याशी संभाषण करायला मिळाले. हस्तांदोलन करता आले. तो माझ्या दृष्टीने सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल. हा प्रसंग आठवला की आजही मा. यशवंतरावांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
पुणे युनिव्हर्सिटीत लावण्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पेंटिंगची ऑर्डर उद्योगपती राहुल कुमार बजाज यांचेकडून मला मिळाली होती. त्या पेंटिंगचे अनावरण ना. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व्हावयाचे होते. त्या निमित्ताने मी एक यशवंतरावांचे चित्र केले होते. ते थोडे प्रतिकात्मक केले होते. संरक्षणमंत्री होते. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राची ढालच. अशा सह्याद्रीच्या बॅकग्राऊंडवर यशवंतराव संरक्षणात्मक जवानांना मार्गदर्शन करतात असे ते चित्र होते. कणखर देशा दगडांच्या देशा महाराष्ट्र देशा, अशा या खंबीर नेतृत्वाच्या मा. यशवंतरावांच्या बॅकग्राऊंडला सह्याद्री टाकून ते संरक्षणात्मक जवानांना काहीतरी मार्गदर्शन करतात, एक हात पुढे करून काट्याकुट्यांनी भरलेल्या जंगलामागे दीपस्तंभासारखा सह्याद्रीचा काळा फत्तर संरक्षण म्हणजे खंबीर नेतृत्व सिंहासारखे व्यक्तिमत्त्व असे ते चित्र त्यांना भेट म्हणून दिले. ते त्यांना एवढे आवडले की, त्यांना यापूर्वी इतके हसताना मी कधी पाहिले नव्हते. त्या संमारंभास समाजवादी नेते श्री. एस्. एम्. जोशी आले होते. त्यांनाही ते चित्र फार आवडले होते. तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला ब्राह्मणप्रतिपालककर्ता शूर वीर म्हणून नाव लौकिकता मिळविली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन जनतेचे प्रेम त्यांनी संपादन केले. तीच जनता त्यांना प्रतिशिवाजी मानू लागली.
मा. यशवंतरावजींना ४२ च्या आंदोलनात पाहिले. त्यांचे कार्य पाहिले. त्यांची लीडरशीप पाहिली. खंबीर नेतृत्व व मुख्यमंत्री म्हणून विचार केल्यास विरोधकानाही यशवंतराव आपलेच वाटत असत. त्यांनी राष्ट्राचे संरक्षणपद सांभाळले, अर्थखाते सांभाळले, आदर्श अशी त्यांची कारकीर्द गाजवली. अशा या अष्टपैलू महापुरूषाची महाराष्ट्राला देशाला नितांत गरज होती. याच वेळी काळाने झडप घालावी ही फार मोठी हानी महाराष्ट्राची, देशाची म्हणावी लागेल. कारण असा अभ्यासू चौफेर दृष्टीचा नेता आजतरी पाहण्यात नाही.