या जेलमध्ये काढलेले एक वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारे विद्यापीठीय जीवन होते. १९३२ साल उजाडले आणि शिक्षेपैकी एक वर्षाचा कालावधी झाला. एक वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेल इथे झाली. विसापूर जेल म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल, अशी त्याची ख्याती होती. हवामान चांगले नाही, पाण्याची कमतरता, फार कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल, अशी या जेलीची ख्याती होती.
दुसर्या दिवशी आम्ही विसापूरला पोहोचलो. विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रेल्वे-लाईनवर असलेल्या विसापूर स्टेशनपासून दोन-तीन मैलांवर आहे. एखाद्या ओसाड वाटणा-या माळावर बांधलेला हा जुना जेल ब-याच लांबून पाहिल्यावर मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो. तेथे पोहोचल्यानंतर मात्र आमच्या ध्यानात आले, की गेले वर्षभर तेथे राहणा-या परंतु सत्याग्रहींनी त्याला अतिशय वेगळे रूप दिलेले आहे, जेल अधिका-यांची आणि सत्याग्रहींची एक सहकाराची भावना तेथे निर्माण झाली होती. गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहत होते. या जेलला अनेक बराकी होत्या आणि प्रत्येक बराकीतल्या सत्याग्रहींतून एक प्रमुख ‘स्पोक्समन’ निवडला जात असे. त्या बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील, ते हा पुढारी सोडवून घेत असे.
आम्ही तेथे गेल्यानंतर थोड्याच दिवसांत येरवड्यातील बाराव्या बराकीचे रूप या विसापूरच्या बराकीस देण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे प्रसिद्ध नेते स. का. पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी केली होती. शेकडो जुनी पुस्तके दररोज परत जात आणि शेकडो जुनी पुस्तके येत, असा या सहकार्याचा संबंध येथे प्रस्थापित झालेला मी पाहिला. आमच्या या बराकीमध्ये कँप जेल १२ मधील बराकीतीलही काही मित्र होते. तात्या डोईफोडे, दयार्णव कोपर्डेकर आणि मी होतो. योगायोगाने ह. रा. महाजनी सुद्धा या बराकीत आले होते. त्यामुळे वाचनाच्या चर्चेच्या बैठकी येथेही सुरू झाल्या.
१९३२ च्या मे महिन्यात आमची शिक्षेची मुदत संपली व आम्ही सजा होण्यापूर्वीचे आमचे घरचे कपडे अंगावर चढवून विसापूर स्टेशनवर येऊन दाखल झालो. तात्या डोईफोडे आणि मी एकदम जेलमध्ये आलो होतो आणि दोघेही परत चाललो होतो. घरचे कपडे अंगावर घालताच काही क्षण मला चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले; पण फक्त थोडा वेळ. जेलचे अधिकारी तिकिटे वगैरे काढून देण्याकरता स्टेशनवर आले होते. त्यांच्या मदतीने तिकिटे काढून घेतली आणि दौंडहून पुण्याला जाणार्या गाडीत बसलो आणि या तर्हेने कारागृहातील एक लांब मुदतीचा मुक्काम संपवून आम्ही आता आमच्या घरच्या वाटेला लागलो होतो.