• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २४१

मराठी राज्याचा संसार १९६० साली सुरू झाला. पण त्यामागची मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ अशा साहित्य संमेलनांतून निर्माण झाली. १९०८ सालच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्यांनी या एकीकरणाचा उल्लेख केलेला मला आढळला. तेव्हा महाराष्ट्राच्या एकीकरणाशी या संमेलनांचा निकटचा संबंध आहे. म्हणून आपण महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षांत नेमके काय साध्य केले, काय करायचे आहे, याचा काहीसा आढावा या संमेलनाच्या निमित्ताने मी घेतला, तर तो उपयोगी पडण्यासारखा आहे. पूर्वीच्या अध्यक्षांची भाषणे वाचत असता महाराष्ट्र विद्यापीठ, मराठी भाषेची अ‍ॅकॅडमी या सर्वांचा उल्लेख पूर्वीच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेला आढळला. महाराष्ट्र स्थापनेनंतर या बहुतेक सर्व संस्था अस्तित्वात आल्या आहेत. त्या कार्यरत आहेत. शासकीय पातळीवर अनेक समस्यांचा विचार होऊन, मराठीला उत्तेजन देणारे उपक्रम हाती घेऊन जवळजवळ पंधरा वर्षे झाली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, भाषा संचालनालय, सांस्कृतिक विभाग, लोकसाहित्याचे मुद्रण, मराठी रंगभूमीला उत्तेजन, शास्त्रीय व लोकसंगीताच्या जोपासनेसाठी असे अनेक साहित्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम चालू केले.

पण या सर्व उपक्रमांप्रमाणेच मराठीच्या दृष्टीने आणखी एक-दोन प्रश्न मी आपल्यापुढे मांडू इच्छितो. एक म्हणजे ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथप्रसार. अलीकडे प्रकाशकांनी केलेली भाषणे व 'मौज' प्रकाशनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त झालेली भाषणे मी वाचली. मला वाटते, की केवळ उत्कृष्ट साहित्य निर्माण करून भागणार नाही, तर त्यांचे सुबक प्रकाशन व स्वस्त पुस्तक योजनांद्वारे त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आता औद्योगिक विस्तार झाल्यामुळे काहीसा सुस्थितीत असलेला नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. तो वर्ग टेलिव्हिजन जितकी प्रतिष्ठेची वस्तू मानतो, तितकेच त्या वर्गाने स्वतःचे ग्रंथालय असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले पाहिजे. मला असे वाटते, की एक प्रकारची ग्रंथशून्यता आता येत आहे. त्यामुळे पुस्तके खपत नाहीत. हे घातक आहे. ग्रंथालयांना पुस्तकांची आवड निर्माण करता येईल. 'चिंतनशील साहित्य म्हणजे केवळ धार्मिक साहित्य', असे समीकरण झाले आहे. हे अपुरे आहे. नवे पदवीधर, नवी विद्यालये, नव्या चिंतनशील साहित्याची गि-हाइके आहेत. पण महाराष्ट्रात नवी विद्यापीठे निघूनही ग्रंथांचा प्रसार का होत नाही, याचा विचार करावयास पाहिजे. विद्यापीठांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. शासन यासाठी काय करू शकेल, याचाही स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे. ग्रंथप्रसार होण्याची खात्री असेल, तर चांगले लेखक पुढे येतील.

दुसरे म्हणजे, संशोधनासंबंधी विद्यापीठांनी अधिक समाजभिमुख व्हावयास हवे. आज अनेक सामाजिक समस्यांचे संशोधन व्हावयास हवे आहे. दलितांचे, स्त्रियांचे व शहरी लोकांचे अनेक सामाजिक प्रश्न आहेत, की ज्यांच्यावर संशोधन झाले, तर साहित्यात त्याची महत्त्वाची भर पडेल. मराठीमध्ये 'गावगाडा' किंवा 'बदलापूर' यांसारखी समाजशास्त्रीय आशय असलेली पुस्तके निर्माण झाली होती त्यांची आठवण या वेळी होते. असे अनेक ग्रंथ इंग्रजी भाषेत होतात. बदलत्या समाजाचे चित्र या संशोधनातून मिळते. तसेच आपल्या इतिहासाचे आहे. अलीकडे मराठी ऐतिहासिक कादंबरीला बहार आला आहे. इतिहासाचे सर्वांगीण अध्ययन व संशोधन झाले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करणारे ग्रंथ, त्यांच्या चरित्रसाधनांची जमवाजमव यांत आपल्या विद्यापीठांनी लक्ष घालावयास हवे. महाराष्ट्रात सहा विद्यापीठे आहेत. त्यांनी विषयवार वाटणी केली, त्यासाठी अध्यासने निर्माण केली, तर ही कामे योजनापूर्वक करता येतील. ललित साहित्याला, चिंतनशील साहित्याला उपयुक्त असे आधारभूत ग्रंथ निर्माण होऊ लागतील. हे सगळे योजनापूर्वक करावयाचे काम आहे.

मित्रहो, माझे भाषण संपले आहे. आता फक्त शेवट. प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राजचिन्हे काढून साध्या वेशात जात असत. तसेच, या शारदेच्या उपवनात येताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरुदावली मी बाहेर ठेवून आलो आहे. मातृभाषेवर उत्कट प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी इथे आलो आहे. आमचा पाहुणचार भाजी-भाकरीचा असला, तरी तो भावमिश्रित आहे, जिव्हाळ्याचा आहे, सकस आहे, हे ध्यानात असू द्या. तो तुम्ही गोड करून घ्यावा. गोविंदाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे हा आपला देश राकट आहे, तसा कोमल आहे.

देवी ज्ञानेश्वरी करी जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ

भक्ती आणि बुद्धी हे महाराष्ट्राच्या सामर्थ्याचे दोन पंख आहेत. आजच्या गतिमान व प्रगतिमान जगात अनेक समस्या आहेत. आमच्या देशात सुप्त सामर्थ्ये फार मोठी आहेत. पण अडचणीही तेवढ्याच आहेत. या अडचणी दूर करण्यात आणि माणसामाणसांतील सहकार्य व स्नेह वाढविण्यात आपण लेखकांनी हातभार लावला पाहिजे. वाङ्‌मय सहेतुक असावे, की नाही, यात बोध असावा, की नाही, या वादात मी पडत नाही. पण एवढे मात्र मी  म्हणेन, की वाङ्‌मयाने माणसाचा हृदयविस्तार झाला पाहिजे. या विस्तारात पुष्कळ ग्रंथी सुटतात. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला  वर्षात दुर्गा भागवत यांची निवड अध्यक्षपदी व्हावी, हे उचितच आहे. त्यांच्या प्रखर ज्ञाननिष्ठेबद्दल त्यांच्यासंबंधी माझ्या मनात परम आदर आहे. मतात आग्रही व निःस्पृह, पण वृत्तीत कोमल आणि रसिक अशा गुणांनी मंडित अशा दुर्गाबाईंचे मार्गदर्शन आपणांला फलदायक होईल, एवढे सांगून व आपले हार्दिक स्वागत करून, दुर्गाबाईंनी संमेलनाची सूत्रे हाती घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो.