• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २३



बरॅक नं. १२ : विद्वानांच्या सहवासात शाकुंतल ते समाजवाद

एका संध्याकाळी पोलिस-पहार्‍यात आम्ही रेल्वेने पुण्याकडे निघालो. पुण्याहून सकाळी येरवडा जेलमध्ये जाण्यासाठी आलेल्या मोटारीतून आम्ही जेलकडे निघालो. जेलच्या दारासमोर गाडी उभी राहिली आणि आम्ही सर्व मोटारीतून खाली उतरलो.

जेलचे तपासनीस पुढे आले आणि त्यांनी प्रत्येक कैद्याची पाहणी केली. त्यांपैकी फक्त बाबूराव गोखले यांना‘बी क्लास’ असल्यामुळे दरवाज्यातून आत घेतले, आणि आम्हां बाकीच्यांना पुन्हा गाडीत बसायला सांगून हुकूम सोडला. ‘या लोकांना कॅम्प जेलमध्ये घेऊन जा.’

जेलमध्ये पंधरा महिन्यांचे माझे जीवन म्हणजे माझ्या जीवनातला एक अत्यंत उत्तम काळ होता, असे आजही मला वाटते. माझ्या जीवनात भावनाशीलता कमी होऊन, विचारांची खोली वाढविण्याची प्रक्रिया या जेलमध्येच सुरू झाली, ही एक गोष्ट कबूल केली पाहिजे.

पहिले आठ दिवस मी असेतसेच काढले. तुरुंग हळूहळू भरत होता. एका आठवड्याच्या आत त्या जेलमध्ये जवळजवळ हजाराच्या वर कार्यकर्ते आले. या लोकांची वेगवेगळ्या बराकींमध्ये वाटणी करून, त्यांची व्यवस्था लावण्याचे काम आम्हां सत्याग्रहींपैकी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घेतले. बराकींना नंबर देण्यात आले. त्यांमध्ये बराक नंबर १२ या एका महत्त्वपूर्ण बराकीची निर्मिती झाली. ही बराक नंबर १२ मी जन्मभर विसरू शकणार नाही. जी प्रमुख माणसे जेलमध्ये आली होती, त्यांतील निवडक व नामवंत माणसांना, या बराकीत घ्यायचे, असे कोणी तरी पुढाकार घेऊन ठरविले आणि त्याच मंडळींनी, हायस्कूल व कॉलेज-शिक्षण अर्धवट सोडून यावे लागलेल्या विद्यार्थ्यांना याच बराकीत ठेवावे, असे सुचविले, त्यामुळे माझी या बराकीत निवड झाली आणि या बराकीतील आमचा बंदिस्त जीवनक्रम सुरू झाला.

प्रत्येक बराकीत शंभर माणसे राहतील, अशी व्यवस्था होती. बारा नंबरच्या बराकीमध्ये अगदी निवडक शंभर माणसे होती. त्यांमध्ये नावे सांगावयाची झाली, तर आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन यांची नावे प्रथम सांगावी लागतील. तसेच, या बराकीचे सुरुवातीला तेच प्रमुख होते, असे म्हटले, तरी चालेल. रावसाहेबांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि इंग्रजीवरचे प्रभुत्व यांमुळे नवीनच आलेल्या जेल- अधिकार्‍यांनी त्यांना ऑफिसमध्ये येऊन कामात मदत करण्याची विनंती केली. रावसाहेबांनी ती मान्य केली आणि ते रोज ऑफिसमध्ये जाऊ लागले.

रावसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्यामुळे एक उत्तम फायदा झाला. त्यांनी अधिकार्‍यांची मने वळवून राजबंद्यांना वाचण्यासाठी सर्व तर्‍हेची सर्व विषयांवरील पुस्तके मिळविण्याची व्यवस्था केली. मुंबई, पुणे येथील कार्यकर्त्यांच्या व जाणत्या मित्रांच्या सहकार्यामुळे लायब्ररीतून आणि इतरही काही ठिकाणांहून नानाविध पुस्तके जेलमध्ये येऊ लागली. राष्ट्रीय चळवळीतील काही लोकांनी तर अशा तर्‍हेने राजकीय कैद्यांना पुस्तके पुरविण्याचे काम हेच आपले राष्ट्रीय काम मानले होते. त्यामुळे थोड्याच दिवसांत बारा नंबरच्या बराकीमध्ये एक चांगल्यापैकी लायब्ररी स्थापन झाली, असे म्हटले, तरी हरकत नाही. अर्थात या पुस्तकांचे महत्त्व मला पहिल्या प्रथम समजले नाही, ही गोष्ट खरी.