• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २४

बराकीतल्या लोकांच्या अधिक ओळखी होऊ लागल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील फार महत्त्वाची माणसे या बराकीत राहायला आली आहेत, यांमध्ये पुण्याचे श्री. अतीतकर, आयुर्वेदतज्ज्ञ मामा गोखले, श्री. वि. म. भुस्कुटे होते. श्री. एस्.एम्.जोशी होते. तसेच, त्यांत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात व पुण्याच्या आयुर्वेद विद्यालयात शिकणारे काही विद्यार्थी बरेच होते. तसेच, अहमदनगरच्या राष्ट्रीय शाळेतीलही विद्यार्थी होते. कोणी अंडरग्रॅज्युएट होते, तर कोणी मॅट्रिकपर्यंत शिकलेले होते, कोणी मॅट्रिक परीक्षेला बसणारे माझ्यासारखे चार-सहा जण होते. या दृष्टीने हा एक मोठा वेगळ्या स्वरूपाचा संच तेथे जमला होता, असे मला वाटू लागले.

या सर्व मंडळींची ओळखपाळख व्हायला आठवडा, दोन आठवडे गेले. बराकीत अंथरूणाला अंथरूण लागून बिस्तरे टाकले गेले होते आणि प्रत्येकाचा बिस्तरा म्हणजे जणू काही होस्टेलची रूम, असे त्याचे स्वरूप असे. कामाशिवाय असलेला वेळ आपापल्या बिस्तर्‍यावर बसून किंवा वाचन करून घालवावयाचा, असा कार्यक्रम चालू होता. हळूहळू त्यातून एक संघटित स्वरूप निर्माण झाले. समविचारांची माणसे एकत्र आली. शारीरिक खेळांची किंवा पत्ते वगैरे बैठ्या खेळांची आवड असणारी माणसे एकत्र आली. गंभीर वाचन करून वैचारिक चर्चा करणार्‍यांचा एक स्वतंत्र ग्रूप तयार झाला. शंभर माणसांच्या छोटेखानी समान घटकांमध्ये त्यांची वेगवेगळी अशी अंगे प्रस्थापित झाली.

आचार्य भागवत यांनी एकदा मला आणि माझ्याइतकेच शिक्षण झालेल्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सांगितले, ‘तुम्ही तुमचा येथील वेळ, बुद्धी आणि मन संस्कारित करण्याच्या प्रयत्‍नांत घालवा. परीक्षेला बसता येईल किंवा नाही, हे सांगता येत नाही, पण एवीतेवी तुम्ही देशभक्तीच्या कार्यात उडी टाकलेली आहे, तेव्हा होणार्‍या परिणामाची पर्वा करू नका. पण जेव्हा केव्हा बळ मिळेल, तेव्हा येथे असलेल्या माणसांची ओळख करून त्यांच्या सहवासाचा लाभ घ्या. तसेच, येथे उपलब्ध होणारी पुस्तके वाचून, त्यांचाही उपयोग करून घ्या.’

मला तर हेच हवे होते. म्हणून माझ्यासारखीच असणारी जी तरूण मुले होती, त्यांच्याशी मी याबाबत बोललो. त्यांमध्ये पांडूतात्या डोईफोडे होते, सेनापती बापट यांचे चिरंजीव वामन बापट होते, पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर लागू यांचे कनिष्ठ बंधू होते, सोलापूरचे भोसले होते, माझे कराडचे मित्र कोपर्डेकर होते. आम्ही विचार केला, की आपण एखाद्या विद्वान मंडळींची मदत घेऊ या.

या वेळेपर्यंत आणखी काही नवे सत्याग्रही आमच्या बराकीत भरती होत होते. त्यांमध्ये माझे मित्र राघू अण्णा आले, शिवाय ह.रा.महाजनी हेही आले. कर्नाटकामधील एक-दोन ज्ञानी मंडळीही या बराकीची सदस्य होती. ह.रा.महाजनी माझ्या जिल्ह्यातले, म्हणून चांगलेच परिचित होते. मी त्यांना आचार्य भागवतांनी मला दिलेला सल्ला सांगितला,‘तुम्ही या कामात सहकार्य कराल काय?’असे विचारले. ते स्वतः ‘वाङ्मयविशारद’ होते. संस्कृतचे मोठे पंडित होते. आधुनिक शास्त्रांचेही वाचन ते करीत होते. आम्ही तर आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे ‘महाजनीशास्त्री’या नावानेच त्यांना संबोधीत होतो. महाजनींनी सुचविले, की या सर्व विद्यार्थी मंडळींना जमवून आपण कालिदासाच्या‘शाकुन्तल’चे वाचन करू या. त्यांच्याजवळ ते पुस्तक होते व ते बरोबरच घेऊन आले होते; आणि मग दुसर्‍या दिवसापासून आमचा हा‘शाकुन्तल’च्या वाचनाचा वर्ग सुरू झाला. कालिदासाची आणि माझी जुनी ओळख‘मेघदूता’पासून होती. आता महाजनींसारखा पटाईत संस्कृततज्ज्ञ आणि उत्तम शिक्षक आम्हांला‘शाकुन्तल’शिकवू लागल्यामुळे हा वाचन-वर्ग बराच लोकप्रिय झाला. त्यामुळे आम्हां विद्यार्थ्यांखेरीज इतर मंडळीही त्या वर्गाला येऊन बसू लागली.

आमचे ‘शाकुन्तल’ चे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी आचार्य भागवतांनी आम्हांला शेक्सपिअरचे एक नाटक शिकविण्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे त्यांनी निवड केली ‘ज्यूलिअस सीझर’या नाटकाची. आम्हां विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षण मॅट्रिकपर्यंतचे होते, तेव्हा शेक्सपिअरच्या अभ्यासासाठी ते उपयोगी पडू शकेल, की नाही, याची आम्हांला शंका होती, पण आचार्य भागवत हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी फार परिश्रम घेऊन नाटकाची पार्श्वभूमी, ज्यूलिअस सीझरचे इतिहासातले महत्त्व आणि या नाटकातील इतर व्यक्तिरेखा व सौंदर्यस्थळे इतक्या कौशल्याने सांगायला सुरुवात केली, की‘शाकुन्तला’चा वर्ग जसा लोकप्रिय झाला, तसाच हाही झाला, ज्यूलिअस सीझरच्या आणि शाकुन्तलच्या या कीर्तीमुळे इतर विद्वान मंडळींनीही अशाच प्रकारचे वर्ग बराकीत सुरू केले.