• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २२९

उद्योगपतींनासुद्धा या बाबतीत जाणीव देऊन त्यांच्याकडून सहकार्य व आर्थिक साहाय्य या तरुण संशोधकांना मिळवून दिले पाहिजे. मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था, विश्वविद्यालयांच्या मदतीने हे कार्य सहजपणे हाताळू शकतात. विद्यार्थिदशेत जर अशा संशोधनाचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनांवर झाले, त्यांच्यांत संशोधनाची आवड निर्माण केली, तर त्यांच्यांत एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल आणि विश्वविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते विश्वासाने, जिद्दीने संशोधन - कार्य चालू ठेवू शकतील, अशी मला खात्री आहे. तुम्ही-आम्ही सर्वांनी जर या दृष्टीने प्रयत्‍न केला, व संशोधन-कार्यात जर धनार्जनाची क्षमता निर्माण केली, तर आज विज्ञान-स्नातकांमध्ये जी नोकरी करण्याची प्रवृत्ती दिसून येते, तिला आळा बसेल व संशोधकांच्या संख्येत भर पडून संशोधन-कार्य व्यापक प्रमाणावर सुरू होईल. विज्ञान-संस्थांनी आजच्या उद्योगधंद्यांच्या विविध गरजा कशा भागवता येतील, याची पाहणी व अभ्यास सतत चालविला, निदान त्याला उत्तेजन दिले, तर भारताच्या औद्योगिक क्रांतीला अधिक वेग येईल.

भारतातील विज्ञानाच्या संशोधनात विविधता आली पाहिजे. देशातील वास्तवतेची व त्याच्या शास्त्रविषयक गरजांची त्यात जाण हवी आहे. औद्योगिक क्रांतीला विज्ञानाचे निकडीचे साहाय्य हवे आहे. जपानसारख्या देशाकडून आपल्याला पुष्कळ शिकण्यासारखे आहे. उपयोजित संशोधनावर भर देऊन देशाचा कायापालट कसा होऊ शकतो, याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जपान आहे.

पण विज्ञानाकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहून चालणार नाही. विज्ञान ही आधुनिक काळातील संजीवनी विद्या आहे. भारताला अशा संजीवनीची नितांत गरज आहे. कारण आपल्याला नुसते यंत्र नको आहे. त्या यंत्राबरोबर येणारे आधुनिक मन हवे आहे. आधुनिक मन हे कधीही स्थितिशील राहत नाही. ते चौफेर पाहते. इतर राष्ट्रांच्या प्रगतीचा सतत अभ्यास करते. असे आधुनिक मन भारताला हवे आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की आपल्या देशाच्या मनावर पुराणमतवादाचे प्रचंड ओझे आहे.

आत्मसंतुष्टता वा निष्क्रियता ही त्यातूनच येते. भारताच्या संदर्भात विज्ञान म्हणजे केवळ भौतिक सुखे निर्माण करणारी शक्ती असून, सामाजिक परिवर्तन घडविणारी ती सामाजिक शक्ती ठरणार आहे.

विज्ञानामुळे विज्ञाननिष्ठ समाज कसा निर्माण होतो, हे युरोपने सिद्ध केले आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीबरोबरच लोकशाही समाजरचना आकार घेऊ लागली. औद्योगिक क्रांतीची सामाजिक दोषस्थळे व त्यांतून येणारी आर्थिक विषमता जेव्हा विचारवंतांना दिसली, तेव्हा समाजवादाची आर्थिक विचारसरणी पुढे आली.