• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २३०

युरोपमध्ये आज राजकीय पद्धतीत वेगळेपणा असला, तरी लोकशाही राष्ट्रे व कम्युनिस्ट राष्ट्रे आधुनिक विज्ञानाच्या साहाय्यानेच विकासक्षम झाली, हे निर्विवादच आहे. या सर्व औद्योगिक क्रांतीने तेथील समाजाच्या मनाची घडणच बदलली. चंद्रावर जाऊ इच्छिणारा व अंतराळ जिंकू इच्छिणारा समाज किंवा दोन युद्धांच्या भीषण अग्निदिव्याला तोंड देऊनही, धैर्य खचू न देता पुन्हा झपाट्याने प्रगती करणारा आकांक्षी समाज हा या विज्ञाननिष्ठेतून निर्माण झाला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. निसर्ग जिंकणा-या विज्ञानालाही एक साहसी मन लागते. कल्पकता लागते. अदम्य, अशरण व एक प्रकारची बेगुमान वृत्ती लागते. पाश्चात्त्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या साहाय्याने ही निसर्ग जिंकण्याची ईर्ष्या सामान्य नागरिकांत निर्माण केली. त्यामुळे तो सारा समाजच जिवंत आहे. उत्साहाने तुडुंब भरलेला आहे. त्याला नावीन्याची ओढ आहे. काही तरी शोधणारे व धडपड करणारे मन आणि शरीर ही त्या समाजाची फार मोठी संपत्ती आहे. विज्ञान अशाच समाजात फुलते, फळते.

भारताच्या समाजाचा विचार केला, तर आपणांस या दृष्टीने किती प्रगती करावयाची आहे, हे बुद्धिमंतांना सहज पटेल. भारताला ती साहसप्रियता हवी आहे. पाण्याच्या प्रवाहाला आतून जशी ओढ असते, तशीच ओढ समाजाच्या जीवनप्रवाहात असेल, तर तो संकटांचे पहाड फोडून पुढे जातो. ती ओढ त्याला सतत पुढे नेते. समाजजीवनाचे ते गतिशील, बुद्धिनिष्ठ रूप आपणांला दिसावयास हवे आहे. हे रूप आपल्या शिक्षणामधून विद्यार्थ्यांना दिसावयास हवे.

या विज्ञानाची मूल्ये प्रयत्‍नपूर्वक शिक्षणातून रुजविली गेली, तर त्याचे परिणाम आमच्या राजकीय व सामाजिक विचारसरणीवर दिसू लागतील. विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करावयाचा असेल, तर बुद्धिमंतांनी विज्ञान परिषदेसारख्या व्यासपीठावर एकत्र येऊन त्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. आपला समाज कृषिनिष्ठ असल्याने देशाचे संपूर्ण औद्योगिकीकरण होऊनच नवा औद्योगिक व विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होईल, असे मानणे व्यवहाराला धरून होणार नाही. म्हणून कृषि-औद्योगिक समाजसुद्धा विज्ञानवादी कसा करावयाचा, हा आपल्यापुढील खरा प्रश्न आहे.

यासाठी बुद्धिमंतांना समाजाशी समरस होऊन ही विज्ञानवादी चळवळ चालवावी लागेल. म्हणून साहित्यात व वृत्तपत्रांत या चळवळीकडे लक्ष द्यावे लागेल. शेतकरी व कामगार यांच्यावर विज्ञानाचे संस्कार करणारे वाङ्‌मय निर्माण करणे ही आजची गरज आहे. मराठीत विज्ञान वाङ्‌मय निघू लागले आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. पण आता मोहरा ग्रामीण विभागाकडे वळविला पाहिजे. खेडुतांनाही विज्ञानाची ओळख कशी करून देता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपले खेडूत नव्या साधनांचा सुजाण वापर करू शकतात, याचा पुरावा शेतक-यांनी पंजाब, महाराष्ट्र वा अन्यत्र दाखविला आहे.

आपले राष्ट्र सध्या क्रांतिसदृश अवस्थेतून जात आहे. याच काळात आधुनिकतेची मूल्ये, विज्ञानवादी प्रेरणा आपण नव्या तरुणांना दिल्या, तर त्यांची स्वप्ने आपण आपल्या लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांपेक्षा भव्य व वेगळ्या क्षितिजांकडे झेप घेणारी असतील. आज प्रादेशिकताल, भाषावाद, जातीयवाद यांच्या आवर्तात आपण सापडलो, त्याच प्रगती रोखणा-या या खड्ड्यात आम्ही अडकून पडलो, तर भारत हे एक प्रतिगामी राष्ट्र होईल. जग चंद्राकडे, अंतराळाकडे पाहत असताना आम्ही मात्र या क्षुद्र निष्ठा जपत आहोत, हा विसंवाद तरुणांच्यापुढे ढळढळीतपणे मांडला, तर ते बेड्या तोडतील. भारताची शास्त्रशुद्ध पुनर्रचना करण्यासाठी असे विज्ञानवादी तरुण निर्माण झाले पाहिजेत, हे स्वप्न कोणी तरी भारतीय तरुणांपुढे रंगविले पाहिजे. त्याच दृष्टीने महाराष्ट्रापुरते हे कार्य मराठी विज्ञान परिषद करील, अशी मला आशा आहे.