• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २१०

लोकशाहीतील प्रशासनात जे जाऊ इच्छितात, त्यांनी ही गोष्ट सुरुवातीपासून नीट समजावून घ्यावी. मी म्हणतो, त्याचप्रमाणे त्यांनी ही गोष्ट समजावून घेऊन आपल्या दैनंदिन कामांत सतत नजरेसमोर ठेवली, तर आपले पुष्कळसे प्रश्न आपोआप सुटतील. एका ज्येष्ठ प्रशासकाने एकदा असे उद्‍गार काढले होते की, मंत्र्यांना 'नाही' म्हणण्याचे आणि प्रशासकाना 'होय' म्हणण्याचे शिक्षण मिळाले, तर बरे होईल. यात पुष्कळच अर्थ आहे. कारण हे घडून आले, तर लोकशाहीतील आणि लोकशाहीच्या प्रशासनातील पुष्कळशा प्रश्नांसंबंधी चिंता करण्याचे आपणांस कारणच राहणार नाही.

या सर्व गोष्टी आपल्याला मी हेतुपूर्वक सांगत आहे. प्रशासनाच्या कोणत्याही शाखेत तुम्ही प्रवेश करा, परंतु मी सांगितलेल्या गोष्टी कृपा करून विसरू नका. एखाद्या खासगी संस्थेत किंवा एखाद्या कारखान्यात तुम्ही काम करणार असला, तर तेथेही हीच कसोटी तुम्हांला दृष्टीसमोर ठेवावी लागेल. प्रशासकाकडून अखेरीस हीच अपेक्षा असते. खासगी व्यापारी संस्थेत देखील ग्राहकाचे समाधान ह्याच न्यायाचे त्याला पालन करावे लागते. प्रयोगशाळेत काम करणारा शास्त्रज्ञ असो किंवा रंगभूमीवर काम करणारा नट असो किंवा समाजसेवेच्या क्षेत्रात गाजावाजा न करता काम करणारा कार्यकर्ता असो, त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही, की आपण जे काही काम करतो, त्याचा अंतिमतः जनतेच्या जीवनावर परिणाम होत असतो.

लोकशाही ही केवळ विधानसभेपुरतीच नसते, किंवा तो केवळ प्रशासनाचेच कार्य करीत नाही. अधिक खोल अर्थाने पाहिले, तर सध्याच्या आधुनिक समाजात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर लोकशाहीची तत्त्वे आपला प्रभाव पाडीत असतात, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजावून घेतली पाहिजे. लोकशाही ही केवळ राजकीय कल्पना नाही, असे मी जे म्हणतो, ते याच अर्थाने. लोकशाही आता एक सामाजिक आणि आर्थिक कल्पनाही बनली आहे. जो विद्यार्थ्यांचे खरे समाधान करतो, तो चांगला शिक्षक. तो निवडणुकीसाठी उभा राहत नाही, तरीही त्याला मान्यता मिळते. माझ्या विद्यार्थिदशेत एक प्राध्यापक होते, त्यांच्या कॉलेजातील विद्यार्थीच नव्हे, तर दुस-या कॉलेजातील विद्यार्थीही त्यांचा अतिशय मान राखीत असत. शेक्सपिअर शिकविणारे दुसरे एक अत्यंत नामवंत प्राध्यापक होते, त्यांच्या व्याख्यानासाठी भिन्नभिन्न विद्यापीठांचे विद्यार्थी येत. अंतिम दृष्ट्या ही लोकशाहीच नव्हे काय ? पण निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच पुष्कळ वेळा लोकशाहीकडे आपण पाहतो. निवडणूक हा लोकशाहीचा एक भाग आहे, आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीला फार महत्त्वाचे स्थानही आहे, यात शंका नाही. परंतु निवडणुकीला किंवा लोकशाहीच्या बाह्य स्वरूपाला जनतेच्या समाधानापेक्षा अधिक महत्त्व नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करीत असा, जनतेचे समाधान हीच अंतिम कसोटी राहील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हाच मूलभूत तत्त्वाचा ठसा उमटलेला तुम्हांला दिसेल आणि म्हणून ह्याच कसोटीवर सर्व गोष्टींबद्दलचे निर्णय तुम्हांला तावून-सुलाखून घ्यावे लागतील.

'लोकशाहीतील प्रशासन' या विषयावर चर्चा करताना प्रशासनातील लोकशाहीच्या या मूलभूत प्रश्नांचीच चर्चा करण्याचा माझा उद्देश होता. आपल्या दैनंदिन कामात, मग ते प्रशासनातील असो, राजकारणातील असो अगर अन्य कोणत्याही क्षेत्रातील असो, आपण या मार्गदर्शक तत्त्वाचा स्वीकार केला, तर समाजातील अनेक गोष्टींत द्रुतगतीने सुधारणा होईल, आणि सरकार व जनता यांच्यांतील संबंधही सुधारतील. एवढेच नव्हे, तर विशिष्ट परिस्थितीत आपले कर्तव्य कोणते, हेही त्यामुळे तुम्हांला समजेल. अशा प्रकारे समाजात केवळ लोकशाहीच नव्हे, तर खरीखुरी स्वतंत्रता नांदू लागेल.

लोकशाहीमुळे ज्या वेळी समाजातील महान शक्ती मोकळ्या होतात आणि व्यक्तीला ख-या स्वातंत्र्याचा लाभ होतो, त्याच वेळी लोकशाहीचे खरे स्वरूप आपणांस पाहावयास सापडते. हे जेव्हा घडते, तेव्हाच समाज सामर्थ्यवान बनतो. अशा समाजात केवळ व्यक्तीच स्वतंत्र होते, असे नाही, तर सर्व समाजच बौद्धिक दृष्ट्या व अन्य प्रकारे स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यास समर्थ बनतो.