• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १९२

चाळिशीनंतर माणसे चरित्रवाचनाकडे वळतात, असे एका सुप्रसिद्ध टीकाकाराने म्हटल्याचे माझ्या वाचनात आहे. आमची पिढी पंधराव्या-सोळाव्या वर्षापासूनच या वाचनाकडे वळली होती. असे म्हटले, तरी चालेल.

आता या वयात मात्र चरित्रे व आत्मचरित्रे वाचण्यामागे माझी भूमिका बदलली आहे, असे मला वाटते. १९३४-३५ पासूनच्या महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनांतील ब-याच घटना मी कमी-अधिक जवळून पाहिल्या आहेत. त्यांतल्या काहींमध्ये भागही घेतला आहे. त्या घटनांबद्दल इतर समकालीन लोकांना काय म्हणावयाचे आहे, हे जाणून घेण्याची आता मला उत्सुकता वाटते. एखाद्या घटनेच्या विविध बाजू, तिच्याबद्दलचे विविध दृष्टिकोन समजावून घ्यावेसे वाटतात. त्या दृष्टीने काकासाहेब गाडगीळ, आचार्य अत्रे, ना. सी. फडके इत्यादींची मराठी आत्मचरित्रे, त्याचप्रमाणे वेव्हेलच्या आठवणी, मौलाना आझादांचे 'इंडिया विन्स फ्रीडम', राजेंद्रबाबूंचे आत्मजीवन, इत्यादी पुस्तके मी वाचली आहेत. बर्ट्रांड रसेलचे आत्मचरित्र मला वेगळ्याच कारणामुळे स्पर्श करून गेले. एखादा माणूस प्रामाणिक आत्मचरित्रलेखनाची कोणती मर्यादा गाठू शकतो, हे रसेलच्या पुस्तकात दिसते. रसेलच्या उत्तरायुष्यातील चीन-भारत संघर्षविषयक धोरणाशी मी सहमत होऊ शकत नसलो, तरी रसेल ही चालू शतकातील एक लोकोत्तर व्यक्ती होऊन गेली, यात शंका नाही. आपल्या प्रत्येक अनुभवाचे बुद्धिवादी दृष्टिकोनातून विश्लेषण व परीक्षण करीत त्याने आपले आयुष्य घडवले. त्याच्या आत्मचरित्राचा शेवटचा परिच्छेद म्हणजे तर गद्यात लिहिलेली एक सुंदर कविता आहे.

गांधीजींचे आत्मचरित्रही सत्यकथन व सत्य-अहिंसेचा शोध या सूत्रांनी वेढलेले असे एक अविस्मरणीय आत्मचरित्र आहे. आपले आत्मचरित्र थोडे अधिक साफसूफ करण्याची संधी काकासाहेब गाडगीळांना मिळायला हवी होती, असे राहून-राहून वाटते. 'पथिक' वाचनीय आहे, पण त्यातले काही भाग खडबडीत राहून गेले आहेत. अत्र्यांचे 'क-हेचे पाणी' साहित्यिक गुणांनी श्रीमंत आहे; पण मला त्यांचे 'मी कसा झालो' हे पुस्तक अधिक आवडले होते. ते अधिक व्यक्तिगत होते. 'क-हेचे पाणी' मध्ये आपण एक ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्ती झालो आहोत, ही जाणीव सतत जागी असल्याचे जाणवते. पण हा काही दोष नाही. ना. सी. फडके यांचे आत्मचरित्रही मी आवडीने वाचले. ते माझे आवडते प्राध्यापक आहेत. कमलाबाई तर आमच्याच वर्गात होत्या. त्यामुळे ते आत्मचरित्र वाचताना काही Nostalgia ची भावना येऊन जाते. अलीकडच्या आत्मचरित्रांपैकी हंसा वाडकर, आनंदीबाई शिर्के, स्नेहप्रभा प्रधान, आनंदीबाई विजापुरे, आनंद साधले, जागीरदार, इत्यादींची आत्मचरित्रे मी वाचली किंवा चाळली आहेत. कमी - अधिक प्रमाणात ती सर्वच मला आवडली. लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतिचित्रां'शी जरी त्यांची तुलना करता आली नाही, तरी ती अधिकाधिक प्रामाणिक होऊ पाहत आहेत, असे मला वाटते. उदाहरणार्थ, डॉ. शिरोडकर व स्नेहप्रभा प्रधान या दोघांचाही चांगला परिचय असूनही, त्या दोघांमधील निष्कलंक, पण मनस्वी स्नेहाची कल्पना नव्हती. तशीच ती कदाचित इतरही लोकांना नसणार. पण स्नेहप्रभाबाईंनी मोकळेपणाने लिहिलेले आहे. आत्मचरित्र वाचताना ती व्यक्ती व तिची घडण सहानुभूतीने समजून घेण्याच्या भूमिकेने ती वाचत आलो. आत्मचरित्रे वाचताना वाचकांनी नैतिक न्यायाधीशाची भूमिका न घेणे बरे, या विचाराचा मी आहे.

अलीकडच्या आत्मचरित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आपले बालपण व तरुणपण यांबाबात ती अतिशय पारदर्शक, प्रामाणिक असतात. पण अलीकडच्या चालू काळाबाबत मात्र ती अतिशय सावध असतात. अर्थात याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. कारण ही सावधानता समजण्यासारखी आहे. शिवाय एखाद्या माणसाच्या अगदी खासगी जीवनात डोकवावयाची उत्सुकता मला वाटत नाही.