• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १९१

६२

माझी साहित्याची रुची

मी साधारणपणे सर्वच साहित्यप्रकार आवडीने वाचीत असतो. अर्थात अलीकडे विषयांची विविधता व ग्रंथांची विपुलता इंग्रजी भाषेत जास्त असल्यामुळे या भाषेतील पुस्तके अधिक वाचण्यात येतात. परंतु वाचनाचा खरा आनंद व जिव्हाळा मराठीतील उत्तम पुस्तके वाचण्यात आहे. जाणत्यांनी शिफारस केलेली, उत्तम परीक्षण आलेली पुस्तके मी मिळवतो व पुष्कळदा खरेदीही करतो. काही लेखक आपुलकीने आपली पुस्तके भेटीदाखलही पाठवितात. अधून-मधून मराठी वाचण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वाचनालयाचीही मदत घेतो. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत माझे पुष्कळसे वाचन प्रवासातच होते. प्रवासात नित्याच्या कामाच्या कागदपत्रांच्या वाचनासोबत साहित्याचे वाचन हा एक उताराच असतो, असे म्हटले, तरी चालेल.

सर्वच पुस्तके अथपासून इतिपर्यंत वाचणे शक्य होत नाही. अर्थात आवडणारी पुस्तके संपूर्णच नव्हे, तर चिंतनपूर्वक वाचतो. सामान्यतः एकाच वेळी माझे चार-पाच त-हेच्या पुस्तकांचे वाचन चालू असते, असे म्हटले, तरी हरकत नाही. गंभीर, विचारप्रधान ग्रंथ, चरित्र वा आत्मचरित्रे, कथा-कविता संग्रह आणि कादंबरी अशी या प्रवाहाची वाटणी प्रसंगानुसार असते. गंभीर व विचारप्रधान ग्रंथांत माझे आवडीचे विषय राजकारण आणि इतिहास हे आहेत. चरित्रे व आत्मचरित्रे मी वाचतो. अर्थात चरित्रनायक कोण आहे, याच्यावर निवड निश्चित अवलंबून असते. विद्यार्थिजीवनात महापुरुषांची चरित्रे वाचण्यास आम्हांला मुद्दाम सांगितले जाई. केळकरांनी लिहिलेले टिळकचरित्र, अण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिलेले शाहू महाराजांचे चरित्र, केळुसकरांनी लिहिलेली शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे नेपोलियन, मॅझिनी, डी-व्हॅलेरा, गॅरिबाल्डी यांची चरित्रे मी विद्यार्थिजीवनातच वाचली.

याच काळातील एक छोटी आठवण सांगितली पाहिजे. योगायोगाने जोतीराव फुले यांचे पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले छोटेखानी चरित्र मी वाचले. ते चरित्र आज, ज्याला चोपडे म्हणता येईल, अशा आकाराचे होते. परंतु या छोटेखानी चरित्रग्रंथाने माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावल्या, हे मला कबूल केले पाहिजे.

बी. ए. ला आम्हांला चरित्रवाङ्‌मयाचा एक साहित्यप्रकार म्हणून अभ्यास करावयाचा होता. त्यावेळी लिटन स्ट्रॅची लिखित क्वीन व्हिक्टोरिया आणि इतर काही प्रसिद्ध चरित्रे मी अभ्यासिली. चरित्र हा वाङ्‌मयप्रकार म्हणून वाचण्यातला खरा आनंद या वेळी अनुभवला.

१९३४-३५ साली पंडित जवाहरलाल नेहरूंचे आत्मचरित्र नुकतेच इंग्रजीत प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी या पुस्तकाला फार मागणी होती. या ताज्या पुस्तकाची एक प्रत कोल्हापूरच्या माझ्या मित्राकडून मिळवून ती कशी वाचली, याची आठवण माझ्या मनात ताजी आहे. आम्हांला ते पुस्तक चार दिवसांसाठीच मिळाले होते आणि वाचणारे तर पाच-सहा जण. मग आम्ही एकत्र बसलो. एकाने ते मोठ्याने वाचायचे आणि इतरांनी ऐकायचे, असा कार्यक्रम सुरू झाला. उन्हाळ्याचे दिवस, कराडचे आमचे घर खूप तापायचे, पण आमचा उत्साह इतका अमाप होता, की आम्ही ते पुस्तक तीन दिवसांतच संपविले. ते दिवसच मंतरलेले होते! स्वातंत्र्य-चळवळीने आमची मने भारून टाकलेली होती. काही नव्या प्रेरणा घेऊन, देशाच्या आकांक्षांची क्षितिजे उंचावणा-या विचारांची झेप असलेल्या एका तरुण नेत्याचे जीवन समजून घेण्याची ओढ होती.