• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ५६

१२

संयुक्त महाराष्ट्राचे साध्य : माझी भूमिका

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य, आणि एकभाषी राज्यामुळे लोकांचे राज्य होण्यास मदत होते, ही कल्पना मान्य केली पाहिजे. अशा सर्वमान्य भूमिकेवरून संयुक्त महाराष्ट्राला माझा पाठिंबा होता. संयुक्त महाराष्ट्र परिषदेचा मी सभासद होतो आणि संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडण्यापर्यंत जे प्राथमिक प्रयत्‍न झाले, त्यांत इतरांच्या बरोबरीने मीही काम केलेले आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न खरा धसास लागला, तो राज्यपुनर्रचना मंडळाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर. या रिपोर्टात सुचविलेल्या ‘समतोल द्वैभाषिक’ राज्याला मी विरोध केला होता, विशेष कठोरपणे विरोध केला होता. पुढे महाराष्ट्र काँग्रेसचे शिष्टमंडळ संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडण्यासाठी व काँग्रेसश्रेष्ठांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले. मी त्यात होतो. तेथेच ‘विशाल द्वैभाषिक’ राज्याचा पर्याय सुचविण्याची कल्पना निघाली. ही कल्पना कोणाकडून व कशी पुढे आली, याची मला माहिती नाही, पण या कल्पनेला मी विरोध केला, प्रखर विरोध केला. आपण संयुक्त महाराष्ट्र मागायला म्हणून येथे आलो, आणि विशाल द्वैभाषिक पर्याय म्हणून मागावयाचे, ही गोष्ट मला पसंत नव्हती. ‘मी शिष्टमंडळात नाही,’ असेही सांगितले; पण वडिलधारी मंडळी तेथे होती. त्यांनी आग्रह केला. ही सूचना फेटाळली गेली. या वेळी मी एकंदर आढावा घेण्यास सुरुवात केली. हे काम सरळ नाही, पेचाचे आहे, असे मला आढळून आले. नंतर त्रिराज्य-योजना, मुंबई शहराचे केंद्रशासन आणि अखेर पुन्हा विशाल द्वैभाषिक असा घटनाक्रम घडला. प्रथम पुन्हा एकदा ‘मी संयुक्त महाराष्ट्र मानतो, पण शिस्त म्हणून तुमचा निर्णय पाळीन’, असेच काँग्रेसश्रेष्ठींना मी स्पष्टपणे सांगितले. पण ज्या द्वैभाषिकाच्या सूचनेला मी त्या वेळी विरोध केला, ते राबविण्याची जबाबदारी शेवटी मी स्वीकारली. तसे करण्यातील माझी भूमिका मी प्रांजलपणे मांडतो.

सर्वसामान्य व सर्वमान्य लोकशाहीनिष्ठ मागणी म्हणून मी संयुक्त महाराष्ट्र मागत होतो, पण हा मौलिक स्वरूपाचा प्रश्न मी कधीच मानला नाही. देशाचे स्वातंत्र्य, राष्ट्रैक्य व समाजवादी पुनर्रचना या गोष्टी मौलिक स्वरूपाच्या मी मानतो; त्यांच्या तुलनेने संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न मूलभूत स्वरूपाचा मी मानला नाही. त्या माझ्या सार्वजनिक जीवनाच्या तीन मूलभूत प्रेरणा आहेत आणि त्याच निकषांवर माझे राजकीय धोरण व निर्णय मी ठरवितो. या मूलभूत गोष्टी साधावयाचे साधन म्हणजे राजकीय पक्ष. माझी राजकीय निष्ठा काँग्रेस पक्षाशी निबद्ध होती व त्या पक्षाची शिस्त माझ्यावर बंधनकारक होती. ज्या तीन गोष्टी पायाभूत म्हणून मी सांगितल्या, त्या काँग्रेसमार्फत आणावयाच्या, असा माझ्या मनाचा निर्धार असल्यामुळे तुलनेने त्यापेक्षा कमी मूलभूत स्वरूपाची अशी संयुक्त महाराष्ट्रासारखी गोष्टही पक्षात राहूनच साधणे इष्ट, हा माझा दृष्टिकोन होता.

आपल्या मागणीतील न्याय व तिचे महत्त्व अखिल भारतीय नेत्यांना व महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना पटविणे हे आपले कर्तव्य आहे, असेही मला वाटे. म्हणूनच सर्व मराठी प्रदेश व गुजराती प्रदेश एकत्र येत आहे व त्रिराज्य योजनेतील मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा धोका नाही, असे दिसताच, ‘विशाल द्वैभाषिका’ बाबत मला विचारले गेले, तेव्हा एकभाषी ज्याबाबतची माझी अनुकूल भूमिका सुस्पष्टपणे वरिष्ठ नेत्यांपुढे मांडूनच, द्वैभाषिक राबविण्यास मी संमती दिली.