• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ४८

व्हिएन्ना, झेकोस्लोव्हाकिया, युगोस्लाव्हिया आणि तेथून अन्य देशांत वाहत जाणारी विशाल डॅन्यूब नदी, रशियातील प्रचंड वोल्गा नदी, उत्तर-पूर्व आफ्रिकेतून युगांडा, इथिओपिया, सुदान, इजिप्त, आदी देशांतून भूमध्य समुद्रापर्यंत वाहत जाणारी मोठी नदी नाईल-ब्लूनाईल, सेंट लॉरेन्स नदी, सैबेरियातील दक्षिणेतून निघून उत्तर समुद्राकडे जाणारी ओब (Obe) नदी ही सुद्धा एक जबरदस्त नदी आहे. सैबेरियातील नेवासेब्रिस्क हे एक मोठे वाढते शहर आहे. या शहरापासून थोड्या अंतरावर ओब नदीला कोयनेसारखे एक प्रचंड धरण बांधले आहे. मध्य आफ्रिकेतील कांगो आणि निगर नदी, झांबियामधील झांबिया नदी, या सर्वच नद्या प्रचंड असून, या नद्यांच्या पाण्याचा उपयोग मानवी जीवन भौतिक अर्थाने संपन्न बनविण्यासाठी केला जात आहे. आस्वानसारखे प्रचंड धरण अलीकडे बांधले गेले. परंतु युरोपात नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, उद्योग, वीज आणि वाहतूक यांसाठी करावयाचा, हे फार पूर्वीपासून सुरू आहे.

भारतात गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, नर्मदा यांसारख्या प्रचंड नद्या आहेत. परंतु या नद्यांकडे पाहण्याची भारतीयांची दृष्टी धार्मिकतेची राहिली. धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले गेलेले पाण्याचे साठे घाण झाले, तरी आम्ही ते तसेच राखले. नद्यांच्या पाण्याने, लोकजीवन संपन्न करण्याच्या नव्या विचाराने आता आपल्याकडेही मूळ धरले आहे, हे मला सुचिन्ह वाटते. पाश्चात्त्य देशांतीलही नद्यांचे पाणी स्वच्छ राखण्याचा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. नदीकाठच्या औद्योगिकीकरणामुळे तेथील नद्यांचे पाणी आणि आसमंत घाण होऊ लागले असून, त्यातून दूषित हवामानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्ल्यू डॅन्यूबचे वर्णन पूर्वी आम्ही जे काव्यात वाचले होते, ते आता शिल्लक उरलेले नाही. ब्ल्यू डॅन्यूब आता ‘मडी-डॅन्यूब’ बनली आहे. या लोकांचे नदीचे प्रेम किती विलक्षण आहे, ते मला झेकोस्लोव्हाकियात प्रवास करीत असताना आढळून आले. स्लाव्हाकियामधील ब्राटिस्लाव्हा या राजधानीच्या शहरी पोहोचलो, तेव्हा शहराच्या बाहेर एका रम्य ठिकाणी संध्याकाळी फिरायला जाण्याचा आणि तिथेच जेवण घेण्याच्या कार्यक्रमाचा, एकूण कार्यक्रमात समावेश करण्यात आला  होता.

राजधानीच्या बाहेर, कापेथियन पर्वतराजीच्या सान्निध्यात ‘झोकशेके’ नावाचे सुंदर रेस्टॉरंट आहे. खुल्या जागेवर बसून मंडळी तिथे जेवण घेतात. आम्ही गेलो, तेव्हा सर्व सिद्धता होती. रशियन तरुणांचा एक कलावृंद तिथे सज्ज होता. या तरुण गायक कलाकारांनी एक सुरेख गीतगायन सुरू केले. लक्ष देऊन मी श्रवणभक्ती करू लागलो, हे गीत रशियन भाषेतले होते. त्यामुळे ते म्हणत असताना मला त्या गीताचा अर्थ समजला नाही; पण ते गीत ऐकत असताना त्याची गतिमानता, स्वरांची आर्तता आणि नादबद्धता यांनी मी फारच प्रभावित झालो.

नंतर मी चौकशी केली, तेव्हा या तरुणांनी सादर केलेले हे गीत ‘वोल्गा’ नदीवर रचलेले आहे, असे समजले. त्या गीताचे मग मी इंग्रजी भाषांतर करून घेतले. मला ते आवडले होते. या गीताची मी माझ्या डायरीत नोंद करून ठेवली. खरोखरच हे एक साधे पण सुंदर गीत आहे. ऐकताना समाधान झाले. डायरीतले गीत मी जेव्हा पुन्हा वाचतो, तेव्हा गीत म्हणताना त्या कलाकारांनी निर्माण केलेले वातावरण, ती स्वरांची आर्तता, माझ्यापुढे ते सारे तसेच उभे राहते. या सर्व लोकांचे नदीबद्दलचे प्रेम जबरदस्त आहे, पण ते धार्मिक अर्थाने नव्हे, हे पाहून बरे वाटले.

लॅटिन अमेरिकेत गेल्यानंतर तेथील सामाजिक परिस्थिती पाहताना दोन-तीन वंशांच्या मिश्रणातून एक चौथाच समाज तिथे निर्माण झाला असल्याचे आढळले. दक्षिण अमेरिकेची संस्कृती, तसे पाहता, काही हजार वर्षांची जुनी आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी स्पेनमधून स्पॅनिश राज्यकर्ते तिथे गेले. आपल्याकडे जसा लॉर्ड क्लाइव्ह पोहोचला, तसा स्पेनचा कोर्टेस हा लॅटिन अमेरिकेत गेला. त्याने तिथे जी जुनी राज्ये होती, त्यांचा पाडाव केला आणि आपले राज्य स्थापन केले. नंतर पोर्तुगीज गेले. इंग्रज पोहोचले. तिथे जे मूळचे लोक आहेत, त्यांना पुढे इंडियन्स म्हणण्याचा प्रघात पडला. नव्या राज्यकर्त्यांनी मग आफ्रिकेतून गुलाम म्हणून काही लोकांना नेले. या सर्वांनी आपला घाम, रक्त आणि कर्तृत्व यांतून देशाची बांधणी केली. हळूहळू त्यांच्यांत रोटी-बेटी व्यवहार सुरू झाले आणि मूळचे इंडियन, नंतर आलेले स्पॅनिश, इंग्रज, आफ्रिकी, पोर्तुगीज यांच्या मिश्रणातून एक चौथाच समाज निर्माण झाला आहे. तर मेक्सिकोमध्ये मूळचे इंडियन आणि गोरे यांच्या मिश्रणातून एका नव्या पिढीने जन्म घेतला आहे. एकूण हा सारा समाजच मल्टिरेशियल समाज बनला आहे. काही ठिकाणी गोरे अधिक आहेत, तर काही ठिकाणी काळे अधिक आहेत.