पण यावर उतारा म्हणूनच, की काय, योगायोगाने काही विनोदी प्रसंगही भूमिगत अवस्थेत माझ्यावर आणले होत. त्यांतला वानगीदाखल एक सांगायला हरकत नाही. मला काही सहका-यांनी काही दिवसांसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे रेल्वेने पुण्याला जायचे ठरले. कराडहून रात्रीच्या गाडीने निघायचे. माझ्याबरोबर दोन मित्र होते. त्यांतील एकाने सेकंडक्लासची तिकिटे काढावयाची आणि दुस-याने डब्याच्या दाराजवळ उभे राहावयाचे. मी स्टेशनसमोरच्या रानात दबा धरून बसायचे - अशी योजना होती. त्याप्रमाणे मी रानात दबा धरून बसलो. एकजण तिकीट काढायला गेला. गाडी आली. दुसरा डब्याजवळ थांबला. मी धावत प्लॅटफॉर्मवर गेलो आणि डब्यात शिरलो. वरच्या बर्थवर डोक्यावर पांघरूण ओढून झोपून राहिलो. जो मित्र तिकीट काढायला गेला होतो, त्याचे आणि तिकीट मास्तरचे भांडण जुंपले. त्यामुळे त्याला तिकीट मिळालेच नाही. गाडी सुरू झाली आणि एक पोलिस आमच्याच डब्यात शिरला. आम्हांला वाटले, आता सर्व संपले. येथून पळणे कठीण. कारण गाडी चालू झाली होती. तेवढ्यात पोलिसाने आम्हांला विचारले.
‘कुठे जाणार आहात?’
‘पुण्याला.’ निर्विकारपणाने माझा मित्र म्हणाला.
‘तिकिटं कुठाहेत तुमची?’ पुन्हा पोलिसाचा प्रश्न.
‘फार घाई झाल्यामुळं आम्हांला तिकिटं काढायला वेळ मिळायला नाही. पण आम्ही पुढच्या स्टेशनवर गार्डाला सांगणार आहोत.’ मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो.
पोलिसांने आमच्याकडे पाहिले आणि आम्हांला विश्वासात घेऊन बोलल्यासारखे तो म्हणाला, ‘कोणाला सांगताय् ? गार्डाला ? मी आहेच की इथं. तिकिटाचे पैसे गार्डाला देण्याऐवजी मला द्या, म्हणजे झालं. मी तुम्हांला सुखरूप स्टेशनबाहेर पोचवीन.’
मला हसू आले. त्या बिचा-याला चळवळीचा गंधही नसावा आणि असता, तरी त्याला तिकिटाचे पैसै अधिक महत्त्वाचे होते. मग मात्र आम्ही निश्चिंत मनाने झोपलो. आमच्या संरक्षणासाठी खास पोलिस होता. इतर पोलिसांना तर सोडाच, पण तिकीट-चेकरला सुद्धा तो डब्याकडे येऊ देणार नव्हता. माझा मित्र सातारा रोडला उतरून गेला. मला घोरपडीला उतरावयाचे होते. माझ्या रक्षकाने मला घोरपडीला उतरविले. सुखरूपपणे स्टेशनच्या बाहेर नेऊन पोचविले आणि वर एक सलामही ठोकला. मी खूश होऊन त्याला आणखी दहा रूपये दिले.
१९४३ च्या मे मध्ये माझी पत्नी अतिशय आजारी पडली. ती मृत्युशय्येवर असल्याची बातमी मला मिळाली. या बातमीने मात्र मी विलक्षण अस्वस्थ झालो. लग्न झाल्यापासून तिला सुखाचे दिवस असे दिसलेच नव्हते. सतत मनस्ताप आणि काळजी. तिच्या संसाराची सुरुवातच अशी दुःखमय झालेली. त्यात तुरुंगवासाचा त्रास. माझ्या मोठ्या बंधूंचा मृत्यू... माझे मलाच अपराध्यासारखे वाटू लागले. या क्षणी तरी मला तिला भेटलेच पाहिजे, हा विचार तीव्रतेने मनात येऊ लागला. माझ्या अनेक सहका-यांनी, असे करणे चूक आहे, असे सांगितले. पण शेवटी मी माणूसच होतो. माणसाचे गुणदोष माझ्यातही होते. मी पत्नीला भेटायला जायचा निर्णय घेतला. त्या वेळी ती फलटणला आपल्या माहेरी होती. फलटण हे संस्थान होते आणि तेथील पोलिस प्रमुख हा माझ्या श्वशुरांचा अत्यंत जवळचा स्नेही होता. तेव्हा फलटणला जाण्याचा फारसा धोका आहे, असे मला वाटले नाही. पत्नीला भेटून व तिला धीर देऊन आपण सहज परत येऊ, अशी माझी कल्पना होती. त्यादृष्टीने रात्री पुण्याहून निघायचे, १० वाजेपर्यंत फलटणला पोचायचे व पहाटे ४ वाजता परत यायचे, असा कार्यक्रम ठरला होता. पण तो दुर्दैवाचाच दिवस असावा. आमची गाडी नीरेजवळ पंक्चर झाली. मी पहाटे ४ वाजता फलटणला पोचलो. दुपारी वाड्याला पोलिसाचा वेढा पडला. ज्यांच्याबद्दल मला फार आशा वाटत होती, तो पोलिस प्रमुखच स्वतः दोन्ही हातांत दोन पिस्तुले घेऊन माझ्यापुढे आला. मला अटक झाली आणि माझ्या आयुष्यातील चळवळीचे एक पर्व संपले.