• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १५३

श्री. बेन्द्रे यांचा संभाजीराजांवरील ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्यासंबंधी जी चर्चा झाली, ती मी थोडी-फार ऐकली आहे, आणि त्यावर झालेली टीकाही मी वाचली आहे. त्या ग्रंथासबंधीचा खुलासा त्यांनी त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, त्यांनी जे चरित्र लिहिले, ते सर्वसामान्य अर्थाने आपण ज्याला चरित्र म्हणतो, तशा अर्थाचे चरित्र नाही. चरित्रनायकासंबंधी अथपासून इतिपर्यंतच्या सगळ्या गोष्टी एका सूत्ररूपाने शैलीदार भाषेत सांगण्याचा जो एक चरित्रलेखनाचा उद्देश असतो, तशा प्रकारचा उद्देश हा ग्रंथ लिहिण्यात त्यांचा नव्हता. संभाजीमहाराजांवरचा हा ग्रंथ आणि त्याचप्रमाणे मालोजीराजे आणि शहाजी महाराज हाही ग्रंथ, मला वाटते, तशा अर्थाने चरित्रग्रंथ नव्हे. चर्चात्मक अशा त-हेची जी माहिती त्यांना होती, ती माहिती देण्याचा त्यांनी या चरित्रग्रंथात प्रयत्‍न केला आहे. मी तर असे म्हणेन की, त्या सगळ्या ऐतिहासिक पुरुषांची चरित्रे लिहिण्यासाठी जी साधने एका अर्थाने उपलब्ध व्हावयास पाहिजेत, अशा प्रकारची साधने पुरविणारा प्रस्तुत मालोजीराजे आणि शहाजीमहाराज हा एक साधनग्रंथ आहे. या अर्थाने हा ग्रंथ अधिकृत चरित्र आहे, असा श्री. बेन्द्रे यांचाही दावा नसावा. कारण हिंदुस्थानच्या सगळ्याच इतिहासासंबंधी एक मोठी अडचण आहे. आपल्या देशाच्या इतिहासाची, मधली हजारो वर्षे अगदी अंधारासारखी गेली आहेत. आम्हांला राम आणि कृष्ण माहीत आहेत. पण त्यानंतर एकदम अलीकडचे अशोक किंवा त्याच्यासारखे इतर सम्राट. नंतर पुन्हा सर्वत्र अंधार. त्यानंतर मग मोगलांच्या अमदानीपासूनचा थोडा-फार इतिहास उपलब्ध आहे. पण मधल्या शतकानुशतकाच्या इतिहासाचे धागेदोरे आम्हाला मिळतच नाहीत. काय घडले. कसे घडले, त्यासंबंधीची जवळ जवळ काहीच माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाही. तेव्हा ही माहिती प्रथम गोळा करणे हे मला अत्यंत महत्त्वाचे काम वाटते.

मी काही इतिहासाचा पंडित नाही, पण इतिहासाचा एक अभ्सासू जरूर आहे. वर्तमानकाळ समजण्यासाठी इतिहासाचे सतत चिंतन करावे लागते. कारण वर्तमानकाळाशी झगडणा-या माणसाला भूतकाळ समजण्याची जर अक्कल नसेल, तर वर्तमानकाळाशी तो फारसा झगडू शकणार नाही, आणि म्हणून त्यासाठी इतिहासाचा थोडा-फार अर्थ समजून घ्यावा लागतो. इतिहासाच्या अर्थासंबंधीचा असाच एक प्रश्न माझ्या मनात पुष्कळ दिवस होता. म्हणून मी. श्री. बेन्द्रे यांना शहाजीमहाराजांचे चरित्र लिहिण्याचा आग्रह केला. तो अशाकरिता की, शिवाजीमहाराजांसारखी जी एक अद्वितीय व्यक्ती सतराव्या शतकात महाराष्ट्रात निर्माण झाली, ती काय अगदी एकाएकी निर्माण झाली ? माझे स्वतःचे असे मत आहे की, महापुरुष, आकाशात विद्युल्लता चमकावी आणि निमिषार्धात अन्तर्धान पावावी, तसे एकाएकी येतात आणि निघून जातात, असे कधीही घडत नाही. महापुरुषांच्या निर्मितीला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या पराक्रमाला काही सामाजिक कारणपरंपरा असावी लागते. त्यांच्या पाठीमागे हळूहळू समाजजीवनाची शक्ती निर्माण व्हावी लागते.

शिवाजीमहाराज म्हणजे फक्त भवानी देवीचा प्रसाद, असे मी मानीत नाही. शिवाजी महाराजांचे जीवन हे मराठी जनतेच्या जीवनाचा प्रसाद आहे, अशी माझी स्वतःची भावना आहे, आणि ही गोष्ट खरी असेल, तर त्यांच्या पित्याचे जीवन, त्यांच्या आजोबांचे जीवन, त्यांच्या भोवतालच्या महाराष्ट्राचे जीवन म्हणजे त्या वेळचा महाराष्ट्र कसा होता, मराठी समाज कसा होता वगैरे गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. ही कारणपरंपरा जर आपल्याला समजली नाही, तर शिवाजीमहाराज आपल्याला समजणार कसे? आजही, आम्ही आहोत, असे का आहोत, याची कारणपरंपरा आम्हांला समजली पाहिजे.