• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १५२

५३

वा. सी. बेंद्रे

काही महिन्यांपूर्वी श्री. बेन्द्रे हे दिल्लीस आपल्या चिरंजीवांकडे विश्रांतीसाठी आले असताना त्यांनी 'मालोजीराजे आणि शहाजी महाराज' या ग्रंथाची मुद्रितावस्थेत असलेली काही प्रकरणे माझ्याकडे ठेवून देऊन, ती वाचून पाहण्याची मला विनंती केली. त्या वेळी या ग्रंथाचे प्रकाशन माझ्या हस्ते व्हावे, अशी त्यांची फार इच्छा दिसली. माझ्या फुरसतीच्या वेळात मी ही सगळी प्रकरणे चाळून पाहिली. काही आठवड्यांपूर्वी, ग्रंथ तयार झाला असून, त्याच्या प्रकाशनासाठी मी आलेच पाहिजे, असे त्यांच्याकडून आग्रहाचे पत्र आले. त्यांच्यासंबंधी मला जो आदर आहे, त्या आदरामुळेच मी या प्रकाशन-समारंभासाठी येण्याचे मान्य केले. या समारंभास येण्याबाबत मला थोडासा संकोच वाटत होता. कारण इतिहासावरील चर्चात्मक असे हे पुस्तक असल्यामुळे त्याचे प्रकाशन एखाद्या नामवंत इतिहास-पंडिताकडून झाले असते, तर ते अधिक उचित झाले असते. परंतु श्री. बेन्द्रे यांचा आग्रह मला मोडवेना, म्हणून येथे आज उपस्थित झालो.

श्री. बेन्द्रे यांचा या विषयाचा अभ्यास ब-याच वर्षांचा आहे, हे मला आठ-दहा वर्षांपूर्वी समजले. त्या वेळी ते संभाजीमहाराजांच्या चरित्राची तयारी करीत होते. अधिकृत शिवचरित्र लिहिले जावे, अशी त्या वेळी महाराष्ट्रातून मागणी होती, म्हणून या बाबतीत मी त्यांच्याशी बोललो. परंतु संभाजी महाराजांच्या काळाचा त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे संभाजीमहाराजांच्या चरित्रलेखनावरच आपले लक्ष केंद्रीभूत करण्याचा त्यांचा मनोदय दिसून आला. तरीही अधूनमधून मी त्यांना भेटतच असे. विद्वानांना भेटावे, त्यांच्या विचारांना चालना द्यावी आणि त्यांचे बोलणे ऐकत बसावे, असे मला नेहमीच वाटते. त्यामुळे पुष्कळसे न वाचताच बहुश्रुत होण्याचे समाधान लाभते. मी जेव्हा बेन्द्रे यांना भेटत होतो, त्या वेळी माझ्या असे लक्षात आले की, शहाजीराजे आणि मालोजीराजे यांच्या काळातील इतिहासासंबंधीचाही त्यांचा व्यासंग बराच आहे. एवढेच नव्हे, तर आजपर्यंत जो इतिहास लिहिला गेला आहे, आणि जो आम्ही परंपरेने स्वीकारला आहे, त्यापेक्षाही काही वेगळे असे त्यांना सांगावयाचे आहे, हेही त्या वेळी माझ्या लक्षात आले; आणि म्हणून त्यानंतर मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटत असे, तेव्हा प्रत्येक वेळी शहाजीराजांवर व मालोजीराजांवर कधी ग्रंथ लिहिणार आहात, अशी मी त्यांच्याकडे आग्रहाने विचारणा करीत असे. शेवटी त्यांनी या विषयावर ग्रंथ लिहिण्याचे माझ्याजवळ कबूल केले. अर्थात माझ्यापाशी अनेक माणसे याप्रमाणे गोष्टी कबूल करतात. पण बेन्द्रे यांचे कबूल करणे हे एक वचन होते, हे आज माझ्या लक्षात आले. त्यांच्यासारख्या विद्वान माणसांचा व्यासंग हीच महाराष्ट्राची खरी दौलत आहे. अशा माणसांची आपण बूज राखली पाहिजे, त्यांच्याशी आपण सतत संपर्क ठेवला पाहिजे.

श्री. बाळासाहेब देसाई यांच्यावर या बाबतीत मी सोपविलेली कामगिरी त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. श्री. बेन्द्रे यांचा हा जो ग्रंथ आज प्रकाशित होत आहे, त्याबद्दल मला फार आनंद वाटतो आणि त्याच्या प्रकाशनाचा मान त्यांनी मला दिला, त्याबद्दल मला जरूर अभिमानही वाटतो.