शैलीकार यशवंतराव ९६

चरित्रात्मक लेखनशैली

यशवंतरावांनी हे चरित्रलेख अंतःप्रेरणेतून लिहिले आहेत.  तसेच जागोजागी सुभाषितांचा वापर केला आहे.  सुंदर व प्रत्ययकारी शब्दांचा उपयोग आणि वाक्प्रचारम्हणींचा चपखल वापर हे यशवंतरावांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य जागोजागी आढळते.  छ.शिवाजीमहाराजांच्या राजनीती व युद्धनीतीबद्दल क्रमशः लिहितात, ''रयतच राज्याचे रक्षण करते.  कारभार ऐसा करावा की मातीच्या देवासही हात न लावणे.  नाहीतर लोक बोलतील मोंगल बरे.  शत्रूला ओळखा, स्वतःला ओळखा म्हणजे शंभर लढाया झाल्या, तरी शंभर विजय मिळतील.''  राजर्षी शाहू महाराजांच्या लोकप्रियतेबद्दल यशवंतराव लिहितात, ''लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धावत येतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत.''  वि.रा.शिंदे यांचे जीवन ''नित्य वाहात राहणार्‍या जिवंत झर्‍यासारखे होते.''  डॉ. धनंजयराव गाडगीळ ''एका अर्थाने 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' या थोर तत्त्वाचे प्रतीक होते.''  लालबहादूर शास्त्रीजी अवघड वाटणार्‍या समस्या आपल्या रेशमी स्पर्शाने व मुलायम वागणुकीने सहज सोडवीत.  माणसाचे मन जिंकण्याचे, ते उकलण्याचे त्यांच्याजवळ अपूर्व कौशल्य होते.''  तात्यासाहेब केळकर हे टिळकांचे विश्वासू सहकारी होते.  त्यांच्या या निष्ठेबद्दल व कार्याबद्दल यशवंतराव लिहितात, ''तर इंद्रधनुष्यातला एक रंग संपून दुसरा कोठे सुरू होतो हे जसे समजत नाही तसे टिळकांचे राजकीय अनुयायित्व संपून केळकरांचे वैचारिक नेतृत्व कुठे सुरू होते हे कळत नाही.'' ..... लोकप्रियता ही चलनी नाण्यांची व्यवहारातील किंमत ठरविते.  ''व्यासंगासाठी मेहनत तर लागतेच, पण बौद्धिक कुतूहलही कायम राहावे लागते.''  अशा कितीतरी सुभाषितवजा वाक्यांचा ते वापर करतात.  'दोन ध्रुव' ही खांडेकरांची कादंबरी पहिल्यांदा यशवंतरावांनी वाचली.  त्या संदर्भातील त्यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे.  ''ते पुस्तक आपल्या हातात घेऊन कसे कुरवाळले, हे आईला आपले पहिले मूल झाल्यावर कुरवाळताना कसे वाटले असे विचारा, म्हणज कळेल..... शब्दांचे सामर्थ्य फार आहे.  मी शब्दांना फार मानतो.  त्यांच्यात अस्त्रांचे सामर्थ्य आहे तसेच प्रकाशाचे तेज आहे.''  यशवंतरावांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाला अनुसरूनच त्यांची जीवनशैली आणि त्यांची लेखनशैली होती हे वरील त्यांच्या काही वाक्यरचनेवरून प्रतीत होते.  अशी असंख्य वाक्ये त्यांच्या या लेखांत आलेली आहेत.  यशवंतरावांना जीवनाविषयीचे विलक्षण कुतूहल होते.  ही जिज्ञासा, हे कुतूहल त्यांना सतत सजग ठेवण्यास कारणीभूत होत होते.  ही जिज्ञासा अखेर जीवनविषयक चिंतनात परावर्तित झालेली दिसते.  आणि स्वाभाविकपणे यशवंतरावांच्या लेखनशैलीला नकळत चिंतनाची डूब प्राप्‍त होते.  यशवंतरावांनी चरित्रलेखामध्ये ज्या वेळी, ज्या प्रसंगी, ज्या चरित्रनायकाचे रूप जसे भावले तसेच रेखाटले आहे.  त्यामुळे हे चरित्रलेखन हे त्यांच्या मनाचे प्रांजळ आरसे आहेत.  त्यांनी रेखाटलेल्या प्रतिमांमध्ये चेहरा चरित्रनायकाचा असला तरी दर्शन यशवंतराव चव्हाणांच्या उत्कटतेचेच असते.