यशवंतराव चव्हाणांनी 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' या सह्याद्री मासिकात प्रकाशित झालेल्या लेखात त्यांच्या जीवनचरित्रावर संक्षिप्त प्रकाशझोत टाकला आहे. ते लिहितात, ''लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाण-घेवाण करणारे जननेते होते. आपली वृत्तपत्रे सुरू करताना जी परिस्थिती होती, तिचे राजकीय विश्लेषण करून त्यांनी आपले राजकीय डावपेच ठरविले होते.'' १९ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अखिल भारतीय पातळीवर अनेक समाजसुधारक, राजकीय नेते आणि पत्रकार होऊन गेले. त्या सर्व क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यकितमत्त्व म्हणूनच यशवंतराव त्यांच्या कार्याचा गौरव करताना दिसतात. अन्यायाविरुद्ध कडक भाषेत प्रहार करण्याची 'केसरी' ची भूमिका वाखाणण्याजोगी होती. या लेखनावरून त्यांच्या स्वभावातील बंडखोर वृत्तीचे दर्शन होते असेही ते स्पष्ट करतात. लोकमान्यांचे कर्तृत्व अलौकिक होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय अष्टपैलू होते. ''संपादकी लोकमान्य, गृहस्थ लोकमान्य, नेता लोकमान्य, वक्ता लोकमान्य, लेखक लोकमान्य, संशोधक लोकमान्य, विद्वान लोकमान्य, तत्त्वज्ञ लोकमान्य असे अनेक दृष्टींनी त्यांचे आपणास दर्शन होते.'' लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वातले असे कितीतरी पैलू यशवंतराव सांगतात. शिवाय प्रत्येक क्षेत्रात त्यांनी तेवढेच मोलाचे व महत्त्वाचे कार्य केलेले आहे त्यामुळे ते लोकमान्य ठरले असे ते सांगतात. लो.टिळकांनी आपले सबंध जीवन सातत्यपूर्वक देशाच्या कामाकरिता व्यतीत केले. त्यामुळे लोकमान्य हा अत्यंत स्फूर्तिदायी असा एक संदेश, असा एक विचार आहे. असे सांगून वैयक्तिक जीवनामध्ये माणसाने कसे वागावे, संकटांशी जिद्दीने कसे लढावे इ. मार्गदर्शन त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपणास मिळत असल्याचे यशवंतराव सांगतात. तसेच संकटास कसे तोंड द्यावे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारखे आहे. या चरित्रलेखात टिळकांचे वैयक्तिक गुण, त्यांचे खंबीर व्यक्तिमत्त्व, करारी स्वभाव, त्यांचे बौद्धिक सामर्थ्य, तत्वचिंतनात मग्न होणारा माणूस इ. गुणांचा उल्लेख करून महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत थोर व पूजनीय ज्या व्यक्ती आहेत त्यात लोकमान्य हे अत्यंत महत्त्वाचे नाव असल्याचे ते सांगतात. यशवंतरावांच्या प्रासंगिक लेखनाला साहित्यरूप प्राप्त करून देण्याची किमया त्यांच्या उत्कट शैलीत आहे. 'सेवाव्रती महर्षी' या लेखात यशवंतरावांनी महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला. त्यांचा जन्म जरी कर्नाटकात झाला असला तरी त्यांनी मराठीची उत्तम सेवा केली. कोणतेही काम त्यांनी सेवा म्हणूनच केले. म्हणूनच यशवंतरावांनी त्यांना 'सेवाव्रती महर्षी' म्हटले आहे. ते लिहितात, ''पुण्यामध्ये असताना हृदय हेलावून सोडणारे प्रसंग त्यांच्यावर आले. पुणे हे विद्येचे माहेरघर. म्हणून जमखिंडीसारखे लहानसे गाव सोडून ते या शहरामध्ये विद्या प्राप्त करण्याकरता आले. अक्षरशः मित्रांपुढे पदर पसरून शिक्षणाला मदत करावी अशी अपेक्षा ते करत आले. विद्येसाठी याचना करण्यात काही कमीपणा आहे असे मानण्याचे कारण नाही. त्यांच्या चरित्रामधील त्या गोष्टीचा उल्लेख वाचताना हृदय भरून येते. मदतीसाठी ते प्रिन्सिपॉल आगरकरांकडे गेले. न्यायमूर्ती रानड्यांकडे गेले.'' एका थोर सहृदय व्यक्तित्वाच्या जीवनाचा संघर्षमय इतिहासच यशवंतराव या चरित्रपर लेखात सांगतात. अस्पृश्योद्धारासाठी आणि समाजसेवेसाठी ज्यांनी आपले सबंध आयुष्य वाहिले अशा एका थोर पुरुषाचे जीवन नित्य वाहत राहणार्या जिवंत झर्यासारखे होते. त्याला थांबविण्याचा प्रयत्न कुणाला शक्य नव्हता. कधी लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तरी त्याची पर्वा त्यांनी केली नाही. स्वतःचे विचार, संस्कार व व्यासंग यांच्या आधारे त्यांची मते बनली होती. आणि ती त्यांनी अत्यंत निर्भीडपणे मांडली. स्वतः अत्यंत प्रामाणिक. जी गोष्ट मनाला पटेल ती स्वच्छपणे बोलावी आणि त्यानंतर त्यासंबंधी चिंता करू नये, असा त्यांचा स्वभाव होता.'' असे जीवनचित्रा-बरोबरच, स्वकालीन सामाजिक जीवनविषयीचे अनेक उल्लेख त्यांनी या लेखात केले आहेत. स्पष्टवत्तेफ्पणा, मनाचा प्रांजळपणा, जीवनाकडे पाहण्याची त्यांची वृत्ती, शुद्ध तत्त्वांचे पालन, अस्पृश्योद्धाराचे कार्य, मराठी-कानडी संबंधी विचार, महर्षी शिंदे यांचे मूलग्राही विचार, त्यांची भारतीय संस्कृतीची मीमांसा, अण्णासाहेब व यशवंतराव यांचा सहवास अशा अनेक घटना, प्रसंग, आठवणी सांगितल्या आहेत. तसेच अण्णासाहेबांच्या संशोधक वृत्तीचा व अभ्यासू वृत्तीचा वेध घेतला आहे. ''ते उपासना करीत असत. परंतु ते काही धर्मभोळे नव्हते. संशोधक होते. परंतु पढीक पंडित नव्हते. राष्ट्रभक्त होते. परंतु राजकारणी नव्हते. असा वरवर विरोधी वाटणारा मोठा विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा माणूस होता.'' अशा विविध पैलूंमधून अण्णासाहेबांचे चरित्र स्पष्ट करतात. शिवाय अशी बुद्धिनिष्ठ, ध्येयनिष्ठ, सेवानिष्ठ, कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि पराक्रमी माणसे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकून आहे. असाही ते त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करतात.
यशवंतराव चव्हाण गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यामुळे गांधीजींच्या चरित्राकडे भक्त आणि शिष्याच्या भूमिकेतून ते पाहत असत. अशा वेळी आपल्या गुरुचे चरित्र रेखाटन करताना त्यामध्ये तटस्थता असणे आवश्यक असते. अलिप्त राहून चरित्रलेखकाला चरित्रनायकाचे कर्तृत्व तपासणे महत्त्वाचे असते. त्यामुळे म. गांधीजींच्या विचारांचे, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी शब्दांकित केले आहेत. गांधीजींचे जीवन व विचार, नामदार गोखल्यांच्या सूचनेवरून तब्बल बावीस वर्षानंतर आफ्रिकेतून भारतात आगमन, राजकारणातील उदय, कस्तुरबा गांधींचा मृत्यू, टिळक-गांधी यांच्या विचारातील व कार्यपद्धतीतील तफावत, गांधीजींच्या विविध चळवळी, 'सत्य व अहिंसा' यांचा वापर, ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास या सर्व व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांचे, प्रसंगांचे चित्रण यशवंतराव चव्हाण यांनी अत्यंत समर्थपणे केले आहे. म. गांधीजींच्या राजकारणाची व समाजकारणाची झेप आणि त्यांच्या मानसिकतेचे अंतःप्रवाह यांचे विवेचन याचे चित्रण त्यांनी 'महात्माजी व महाराष्ट्र' या लेखात केले आहे. त्यांच्या साधेपणाबद्दल ते लिहितात, ''पोशाखातला थाट, इंग्रजी भाषेचा वापर, राहणीमानाचा दर्जा इ. ज्या गोष्टी सुधारणेची लक्षणे बनत होती त्यांना गांधीजींनी कटाक्षाने रजा दिली. स्वतः ते इतका साधा पोशाख घालू लागले की बॅरिस्टर असून ते एखाद्या शेतकर्याप्रमाणे पोशाख घालत. या गोष्टीने गांधी व बहुजन समाज यांच्यातील अंतर एकदम कमी झाले. पुढे तर ते पंचाच नेसू लागले व त्यामुळे रविंद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे ''भारतातील कोट्यवधी दरिद्री बांधवांच्या हृदयाचे दार त्यांनी सताड उघडले.'' अशा स्वरूपाचे म. गांधींचे संस्कारचित्र ते प्रभावीपणे मांडतात.