शैलीकार यशवंतराव १२९


ना. यशवंतराव -

एक थोर पुरोगामी विचारवंत म्हणूनही आपला लौकिक आहे.  सार्‍याच मराठी विचारवंतांना संतसाहित्याचा वारसा लाभला त्याचा आपणास सार्थ अभिमान वाटतो.  महात्मा फुले, न्या. रानडे, लो. टिळक, आगरकर, म. गांधी आणि आंबेडकर यांनी केलेले विचारमंथन, त्यातून निर्माण झालेले प्रबोधन आपण आत्मसात केले.  समाजवाद, साम्यवाद या नव्या विचारप्रवाहाचेही आपण परिशीलन केले.  मानवेंद्रनाथ रॉय यांच्या रॅडिलक ह्यूमॅनिझमचे प्रवक्ते म्हणूनही आपली ख्याती आहे.  आपल्या लोकाभिमुख प्रशासनाला ही समर्थ वैचारिक बैठक होती.

साहित्य, संगीत, चित्र, नृत्य, नाट्य, कला, वादसंवाद - यांनी बहरलेले सांस्कृतिक जीवन - यात सार्‍या विकासाचा आशय सामावलेला असतो.  रसिकवृत्तीने हे स्वप्न आपण मनात पाहिले आणि प्रत्यक्षात साकारही केले.  हे महाराष्ट्राचे मोठे हेवा करण्यासारखे भाग्य होय.  

वाचन आणि लेखन, ग्रंथ आणि ग्रंथकार, साहित्य आणि साहित्यिक यावरचे आपले अकृत्रिम प्रेम विलोभनिय आहे.  मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती यांच्या अभिवृद्धीसाठी आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र शासनाने केलेले कार्य केवळ निरुपण आहे.  भाषा संचालनालयाला आकार दिलात.  ग्रंथपुरस्काराची योजना कार्यवाहीत आणलीत.  चित्रपट नाटक आदी ललितकलांना आपण उत्तेजन दिलेत.  साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती आपल्या प्रशासनाची.  

आपले आर्जवी पण प्रभावी वक्तृत्व आपल्या संयमी लोकनेतृत्वाला शोभणारे आहे.  आपल्या प्रसन्न लेखनातून आपल्या संपन्न जीवनाचे मनोहर दर्शन होते.  विविध साहित्य संस्थांतून विभिन्न व्यासपीठावरून आपण केलेली भाषणे, प्रसंगाने केलेले आपले लेखन आणि आपले 'कृष्णाकाठ' आत्मचरित्र यांना मराठी साहित्यात मानाचे स्थान राहील.  

अकृत्रिम राष्ट्रपेम, उत्कट देशाभिमान, निस्वार्थ लोकसेवा, प्रखर पुरोगामी विचार, निरभिमान संयतवृत्ती, निरलस क्रियाशीलता आणि सर्वांत महत्त्वाचे - निष्कलंक चारित्र्य या सार्‍या गुणसमुच्चयाने जनसामान्यांच्या अंतःकरणात आपल्याविषयी नितांत प्रेम आणि आदर वसत आहे.

समर्थांनी श्री शिवछत्रपतींना जाणता राजा म्हणून गौरविले आहे.  त्याच रीतीने एक जाणता नेता म्हणून आपल्याविषयी आम्हा सर्वांना सादर अभिमान वाटतो.  आपणास डॉक्टर ऑफ लेटर्स ही सन्माननीय पदवी प्रदान करून विद्यापीठ आपला यथार्थ गौरव करीत आहे.  पुणे विद्यापीठाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक महत्त्वाचा ठरेल अशी आमची श्रद्धा आहे.


माननीय यशवंतराव यांचे हस्ताक्षर पाहण्यासाठी येथे क्लिक करा