शेतकरी कामगार पक्षाचे त्यावेळचे विरोधीपक्षनेते उद्धवराव पाटील यांच्या चरित्र व गौरवग्रंथ स्मरणिकेसाठी लिहिलेल्या लेखात त्यांच्या स्वभावाविषयी लिहितात, ''तसा त्यांचा स्वभाव अतिरेकी नाही. आपल्या म्हणण्याला काही तात्त्वि बाजू आहे, अशा पद्धतीने ते आपले विचार मांडीत असत. ते परखड बोलत असले तरी त्यात कडवटपणा व वैयक्तिक टीकेचा भाग दिसून आला नाही. अत्यंत नेकीचा आणि पक्षाच्या कार्याला वाहून घेतलेला कार्यकर्ता व नेता हे उद्धवरावांचे वर्णन उचित ठरेल.'' गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या लेखात त्यांचे व्यक्तिमत्त्व चित्रण करताना लिहितात, ''कै. भाऊसाहेब बांदोडकरांची आठवण झाली की त्यांचे हसरे, उमदे व राजबिंडे व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते.... त्यांच्यात महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या मातीच्या गुणांचा मिलाफ होता. जिद्द, करारीपणा, स्पष्टवत्तेफ्पणा आणि गरिबांविषयी आस्था या गुणांत ईश्वरभक्ती, कला, साहित्यप्रेम, संगीत, नाटक यांचे वेड आणि अनौपचारिक जिव्हाळा यांचे इतके बेमालूम मिश्रण झाले होते की त्यामुळे त्यांचे वेगळेपण नजरेत भरे.'' यशवंतराव आपण पाहिलेल्या व्यक्तीचे अंतर्मन बारकाईने तपासतात. तसेच त्या व्यक्तित्वातील जगाच्या लक्षात न येणारी सूक्ष्म धाग्यांची गुंतागुंत आणि त्यांच्या वृत्तींची संमिश्रता यशवंतराव अशीच उकलून दाखवतात आणि आपल्याला दिसलेल्या माणसाचे रूप वाचकांसमोर मांडतात. सामार करतात.
यशवंतरावांनी कृ. भा. ऊर्फ अण्णासाहेब बाबर यांच्याबद्दल लिहिले आहे, ''अण्णांचा सहवास म्हणजे एक विचारांची उत्तम शिदोरी होती.'' यशवंतराव चव्हाणांनी किसन वीर यांचे व्यक्तिचित्रण फार हळव्या मनाने केलेले आहे. एका ध्येयाने वेडे झालेले, भावनेने झपाटलेले, अशा या व्यक्तीची प्रथम ओळखीची आठवण लिहिताना -माझी त्यांची प्रत्यक्ष अशी भेट ३४-३५ च्या सुमारास झाली. उंच व बांधीव शरीर, मिशीचे आकडे आणि हसरा चेहरा त्यांची तीन वैशिष्ट्ये प्रथम मी जेव्हा पाहिली तेव्हाच माझ्या मनात खिळून राहिली. हळूहळू आमच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊ लागले '.....ज्याने स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी काही मिळविले नाही; परंतु इतरांना मिळत राहावे यासाठी प्रयत्न केले, कष्ट केले, अखेरपर्यंत ज्याने आपले राहण्याचे ठिकाण वा घर सोडले नाही असे कार्यकर्ते देशात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. त्यात आबांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.'' यशवंतराव चव्हाण व किसन वीर या दोन कुटुंबातील परस्परसंबंध घरोब्यातले होते. यशवंतरावांच्या वैयक्तिक घडामोडींच्या प्रसंगामध्ये ते ज्या थोड्याच मित्रांवर विश्वास टाकत. त्यामध्ये किसन वीराचे स्थान महत्त्वाचे होते. अशी वरून दिसणारी कणखरमूर्ती हृदयाने कोमल होती; पण कॅन्सरच्या आजाराने १९८० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी स्मृतिविशेष अंकासाठी लिहिलेल्या लेखात आपल्या वरील भावना ते व्यक्त करतात. यशवंतरावांनी जी व्यक्तिचित्रे लिहिली त्यात या व्यक्तिरेखेला सर्वात वरचे स्थान आहे.
वसंतदादांचे मोठेपण सांगताना यशवंतराव लालित्यपूर्ण काव्यमय शैलीद्वारे सांगतात. ''सांगली जेलमधून हत्यारे घेऊन किल्ल्याच्या भिंतीवरून केलेले उड्डाण हा दादांच्या कर्तृत्वाचा श्रीगणेशा होता. किंबहुना त्यांच्या सर्व जीवनाचे व पुढे घडलेल्या सर्व कर्तृत्वाचे ते एक प्रतीक होते.'' पुढे पद्माळे या दादांच्या गावी गेल्यानंतर तेथील लिप्ट इरिगेशनचे काम यशवंतरावांनी पाहिल्यानंतर त्यांच्या कामाचे मूल्यमापन, गौरव करताना जुनी आठवण सांगतात... ''नदीच्या पात्रातून वाहणार्या कृष्णेच्या पाण्याला शतकानुशतके आपल्या काठावर असलेल्या व तहानलेल्या काळ्या बहिणीची आठवण आज झाली. कृष्णाकोयनेचा प्रीतिसंगम हा निसर्गाने दिलेला संगम आहे. पण काळी जमीन व कृष्णा नदी यांचा झालेला आजचा संगम हा माणसाच्या कर्तृत्वाने घडलेला संगम आहे आणि म्हणून त्याला जास्त महत्त्व आहे. या कर्तृत्वाचे प्रतीक आमचे वसंतराव आहेत. दादांसारखी पाच-दहा माणसे साथील असली तर महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला सोन्याचे पीक येईल.'' यशवंतराव वसंतदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या कर्तृत्वाचे, माणसांची पारख आणि पारखून मित्र केलेल्या माणसांची जपणूक, संघटना चातुर्य, प्रेम, जीवनातील प्रत्यक्ष अनुभव, विधायक स्वभाव, निर्धारी स्वभाव, तडजोडी वृत्ती, सार्वजनिक जीवनाची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी धडपड, पक्षनिष्ठा अशा विविध गुणवैशिष्ट्यांचे वर्णन करतात.
यशवंतराव चव्हाणांची व्यक्तिचित्रे आकर्षक आणि परिणामकारक झाली आहेत. ती मनाला स्पर्श करून जातात. ही चित्रे प्रदीर्ष जरी नसली तरी त्यातील वर्णने प्रत्ययकारी वाटतात. वसंतदादांना १९७६ साली मंत्रिमंडळातून काढले व प्रथम ते दिल्लीस भेटले तेव्हाच्या प्रसंगाची आठवण यशवंतराव सांगतात. ''जेव्हा त्यांची माझी भेट झाली, तेव्हा का कोण जाणे, माझे डोळे भरून आले आणि पुष्कळ प्रयत्न करूनही मला ते आवरता आले नाहीत. १९६५ साली आई गेली तेव्हाही असेच आवरणे अवघड झाले होते. पण तरीही मी ते सावरले होते. पण आज असे का होत आहे हे माझे मला सांगणे शक्य होईना.... सोन्यासारख्या या माणसाचा असा अवमान का झाला व कशासाठी ? आणि मी हे थांबवू शकलो नाही यात आमच्या सर्वांच्या कामाचा पराभव आहे, अशी एक प्रकारची असहायतेची भावना मनात तयार झाली होती.''