• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ८७

यशवंतरावांनी रेखाटलेल्या चरित्ररेखा

यशवंतरावांचे हे चरित्रलेखन आकाराने छोटे पण गुणाने मोठे आहे.  ही चरित्रे लहान असली तरी त्यात 'साहित्यिक महानपणा' मात्र भरपूर आहे.  आपल्या चरित्रनायकांवर यशवंतरावांनी प्रामुख्याने गौरवपर लिहिले आहे.  त्यांनी चित्रित केलेले चरित्रनायक सामान्य नाहीत.  काही वेळा असामान्याला भेद पाडून पुढे जाणारे असे अति असामान्यांच्या कोटीत बसणारे आहेत.  जीवनाची आणि समाजाची विविध अंगे व्यापून उरणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व या चरित्रनायकांना लाभलेले आहे.  यशवंतरावांना मानवतावादी महापुरुष आवडतात.  शिवाजीमहाराज हे त्यांचे श्रद्धास्थान होते.  शिवनेरीवरील शिवजन्माच्या प्रसंगाचा अर्थ सांगताना यशवंतराव लिहितात, ''युगायुगातून येणारा आजचा हा दिवस आहे.  तीनशे वर्षांपूर्वी तो एकदा आला आणि या शिवनेरीत शिवाजीमहाराजांचा जन्म झाला.  केवळ एका व्यक्तीचा एका बालकाचा तो जन्म नव्हता, तर त्या बालकाच्या रूपाने महाराष्ट्राचा नवा इतिहास जन्माला येत होता.  शिवजन्माने आमचा हा इतिहास त्यावेळी गडावर सुरू झाला.''  असा शिवजन्माचा प्रसंग ते 'भाग्यवती शिवनेरी' या लेखात सांगतात.  मुंबई येथे दि.२६ जानेवारी १९६१ रोजी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते पुढील विचार प्रकट करतात, ''छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती त्यांची निव्वळ प्रतिमा आहे असे आम्ही मानीत नाही,  तर भारतामध्ये जी तेजस्विता आहे, भारताची जी अस्मिता आहे, भारताचा जो स्वाभिमान आहे, त्या तेजस्वितेचे, त्या अस्मितेचे आणि त्या स्वाभिमानाचे ही मूर्ती एक प्रतीक आहे अशी आमची तिच्या पाठीमागे एक भावना आहे.''  महाराजांविषयी यशवंतरावांच्या मनात असलेली निर्मळ भावना ते येथे व्यक्त करतात.  छ.शिवाजीमहाराज हे राष्ट्रीय इतिहासातील अभिमानाचे, गौरवाचे तसेच भारतीय जीवनमूल्यांचे आणि सद्‍गुणांचे सगुण रूप आहेत, असाही ते त्यांचा उल्लेख करतात.  शिवाजीमहाराजांचे सुंदर शब्दचित्र मोजक्या शब्दांत साकार करतात.  समर्थ रामदासांच्या दोन उक्तींचे उदाहरण ते देतात.  ''निश्चयाचा महामेरू ।  बहुत जनासी आधारू''  ही आणि ''पुण्यवंत नीतीवंत ।  जाणता राजा''  ही दुसरी.  यामधून छ. शिवाजीमहाराजांच्या अलौकिक गुणांचे दर्शन घडते.  या लेखात छ.शिवाजीमहाराज निश्चयाचे महामेरू कसे ठरतात याबाबत ते लिहितात, ''शिवाजीमहाराजांचा स्वातंत्र्याचा प्रयत्‍न हा एक पराक्रमी पुरुषाचा राज्य बळकाविण्याचा प्रयत्‍न नव्हता.  त्याला राष्ट्रीय उद्दिष्ट होते.  नैतिक प्रेरणा होती.  'बहुजनांना' आधार देण्याची इच्छा होती.  उदंड आत्मविश्वास होता.  'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे' असे महाराजांना वाटत होते.  ही त्यांची प्रतिज्ञेची पार्श्वभूमी होती.  म्हणून 'निश्चयाचा महामेरू या प्रतिकूल परिस्थितीतही टिकला.  हे राज्य समकालीन राज्यापेक्षा वेगळे व्हावे, गुणवान व्हावे ही त्यांची दुसरी मनीषा होती.  म्हणून ते स्वतः श्रीमंत योगी झाले, पुण्यवंत, नीतीवंत झाले.  ''राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे'' हा आदर्श त्यांच्यापुढे होता आणि सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे 'जाणता राजा'.  हा राजा ज्ञानी होता, उमजणारा होता, समंजस होता, त्याला जनतेची जाण होती.  शिवाजीमहाराजांचे कार्य आणि व्यक्तित्व अनेक पिढयांना प्रेरक ठरले आहे.  ठरणार आहे.''  शिवाजी-महाराजांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने यशवंतरावांनी जे चिंतन केले आहे ते मोलाचे आहे.  त्यांच्या आदर्शाचे संस्कार नव्या पिढीवर होणे आवश्यक आहे असे यशवंतरावांना वाटते.  म्हणूनच त्यांनी महाराजांच्या कार्याविषयी, राजनीतीविषयी, धर्मनीतीविषयी या लेखात मतप्रदर्शन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.  व्यक्तिनिरपेक्ष राजकारणाचा पायंडा त्यांनी पाडला.  संकुचित धर्मनिष्ठा त्यांना मान्य नव्हती.  राजनीतीत रयतेला स्थान होते.  साहस, पराक्रम, निष्ठा आणि शुद्धाचार यामुळे त्यांचा सैन्यात दरारा होता.  त्यांची राजनीती, गनिमी कावा, युद्धनीती, स्वराज्यनीती, शत्रूला अचानक घेरण्याचे तंत्र, चपळाई करून निसटण्याचे कौशल्य, भौगोलिक ज्ञान आदी गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत.  ते लिहितात, ''शिवाजी महाराजांच्या रूपाने अतिभव्य असे एक चरित्र इतिहासाने आम्हाला दिले आहे.  त्या चरित्राची मांडणी करण्याचे काम इतिहासकार आपल्या शब्दांनी करत आहेत.  आणि कादंबरीकारही आपल्या शब्दांनी करतील, पण प्रतिभावान कवींच्या शब्दामध्ये ते चरित्र रंगल्याशिवाय त्यातला खरा जिव्हाळा आपल्याला समजणार नाही आणि म्हणून हे एवढे सुंदर चरित्र एका महाकवीची वाट पाहात उभे आहे, असे मी नेहमी मानत असे.''  असे हे शिवाजीमहाराजांचे चरित्र आदर्श महापुरुषाचे चरित्र असल्याचे ते सांगतात.  ''ते जे तेजस्वी, पराक्रमी, कर्तृत्ववान असे जीवन जगले त्याने आमच्या मनाला विलक्षण ओढ लावली.  त्या जीवनातून एक तेजस्वी शक्ती आमच्या मनामध्ये घराघरामध्ये सतत तेवत राहिली आणि अद्यापही ती तेवत आहे.''  त्यामुळेच छ.शिवाजी महाराजांचे कार्य आणि व्यक्तित्व अनेक पिढयांना प्रेरक ठरले आहे, ठरणार आहे अस आत्मविश्वासही यशवंतराव व्यक्त करतात.  'मी जसा आहे तसेच माझे चित्रण करा' असा चरित्रलेखनाचा संकेत असतो.  चरित्र लेखनाची ती एक चौकट असते.  चौकटीत जी मोकळी जागा असते, ती मुक्तपणे वापरण्याचे स्वातंत्र्य लेखकाला असते.  पण चौकट मोडून बाहेर डोकावण्याचे स्वातंत्र्य घेतले तर चरित्र हा साहित्यप्रकार असंबद्ध ठरतो.  यशवंतराव चव्हाणांना या चौकटीचे तंत्र माहीत होते.  म्हणूनच चरित्र लेखामध्ये चरित्रनायकाचा जो पैलू ज्या प्रमाणात त्यांना भावत असे त्या प्रमाणात त्या पैलूचे झगझगीत दर्शन यशवंतराव घडवत असत.  यशवंतरावांनी राजर्षी श्री शाहूमहाराजांचे 'लोकमान्य राजर्षी' या लेखात मोजक्या शब्दांत त्यांची चरित्ररेखा उभी केली आहे.  ''कसब, गुण, कर्तृत्व याविषयी शाहूमहाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्यागांजल्यांबद्दल कणव होती.  त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते.  त्यामुळे समाजातील गुणी, कर्तृत्ववान यांना महाराजांचा आधार होता.  त्याचप्रमाणे लहानशा खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता.  सत्ताधारी हा असा असावा लागतो.  गांजलेल्यांना, पीडितांना तो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा.  शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते आणि लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत.''  यशवंतरावांनी छ. शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे कर्तृत्व, सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप, त्यांच्या कार्याचे महत्त्व, त्यांनी कलेला दिलेला आश्रय, त्यांची सहकारी चळवळीची प्रेरणा, गुणग्राहकतेची कदर करणारा राजा, शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी केलेले कार्य, विद्येला त्यांनी दिलेले प्रोत्साहन, अस्पृश्यता निवारणासाठी केलेले कार्य, त्यांनी मल्लविद्येला केलेला सहाय्य अशा स्वरूपाची अनेक गुणवैशिष्ट्ये यशवंतराव सांगतात.  त्यावरून त्यांचे कर्तृत्व कसे थोर होते हे या छोट्याशा चरित्रलेखातून सहज स्पष्ट होते.