• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ८६

१९२० नंतर गांधीयुग सुरू झाले.  विशिष्ट तत्त्वज्ञान संपूर्ण देशात पसरले गेले.  त्यामुळे या काळात अनेक चरित्रे लिहिली गेली.  टिळक, गांधी, नेहरू, मालवीय, सुभाषचंद्र बोस, न.चि.केळकर यांनी लिहिलेले लो. टिळकांचे चरित्र दीर्घ स्वरूपाचे असून तीन खंडात आहे.  न.र.फाटक यांनी न्या.रानडे यांचे, श्री.दा.ना.शिखरे व आचार्य जावडेकर यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले.  पुढे स्वातंत्र्यवीरांची, क्रांतिकारकांची चरित्रे लिहिली गेली.  उदा :  वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सेनापती बापट, बॅ. सावरकर, भाई परमानंद, डॉ.वासुकाका जोशी, तात्या टोपे इ. राजकीय चरित्रेही मोठ्या प्रमाणात लिहिली गेली.  तसेच धर्मकारण, राजकारण, साहित्य, खेळ, संशोधन, उद्योग, कला, संगीत, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या लोकांची चरित्रे लिहिली गेली.  देवादिकांची आणि संतांची पारंपारिक पद्धतीनेही चरित्रे लिहिली गेल्याचे दिसते.  याचबरोबर स्त्रियांच्या चरित्रांनीही या दालनात मोठीच भर घातली आहे.  अलीकडच्य काळात तर या वाङ्‌मयाने चांगलेच बाळसे धरले आहे.  त्यामुळे यास वाङ्‌मयीन महत्त्व प्राप्‍त झाले.  स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महनीय व्यक्तीचरित्राचा विषय झालेल्या आहेत.  स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतरावांच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरलेल्या अशा अनेक व्यक्तीचरित्रलेखांचे विषय झाले आहेत.  तसेच वंदनीय, मान्यवर अथवा पूजनीय व्यक्तीबद्दलही पूज्यभाव चरित्रलेखनाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केला आहे.

यशवंतरावांचे चरित्रलेखन

यशवंतरावांची ओळख प्रामुख्याने आत्मचरित्रकार व भाषाप्रभू म्हणून सर्वसामान्य रसिकांना परिचित झालेली असली तरी त्यांचे लेखन गुण अन्य प्रासंगिक लेखनातूनही प्रकर्षाने जाणवत राहतात.  आणि शब्दप्रभू यशवंतराव चव्हाण यांची वैचारिक उंचीही लक्षणीय आहे याची साक्ष पटते.  पण यशवंतरावांनी हे चरित्रलेखन करायचे म्हणून केलेले दिसत नाही.  त्यांनी चरित्रलेखन केले असले तरी त्यामध्ये ठरवून, निश्चित करून, बेतून, फार कमी लिहिले आहे.  यातील काही पुस्तकांमध्ये यशवंतराव यांनी लिहिलेले चरित्र विषयांचे प्रासंगिक लेख आहेत, तर काही लेख म्हणजे त्यांनी पूर्वी केलेली भाषणे आहेत.  रूढार्थने ज्यांना आपण चरित्र म्हणतो तशा प्रकारची ही चरित्रे नाहीत.  चव्हाण यांना त्या त्या वेळी चरित्रनायकांचे दर्शन जसे घडले, त्यांना ते ते चरित्रनायक जसे दिसले, त्याप्रमाणे त्यांनी त्या चरित्ररेखा रंगवल्या आहेत.  स्थूलमानाने राजकीय, सामाजिक, वैचारिक अशा रीतीचे काही स्फुटलेखन करताना मनाशी काही निश्चय बाळगून यशवंतराव लिहित असल्याचे आढळते.  पण असे प्रसंगही फार नाहीत.  क्वचितच आहेत.  साहजिकच थोरामोठ्यांचे चरित्रलेखन करावे ते अमुकच एका हेतुसिद्धीसाठी असावे अशा दृष्टीने त्यांनी अजिबात लेखन केले नाही.  लेखनाची हौस आणि आपल्याला सांगावेसे वाटते ते सांगण्याच्या उर्मीतून हे लेखन झालेले आहे.  तरीही यशवंतरावांनी एकही चरित्रग्रंथ लिहिला नाही.  जे चरित्र लेखन झाले आहे ते स्फुट स्वरूपाचे आहे.  त्यांचे चरित्र लेखन सलग नाही.  ते प्रसंगानुसार झालेले आहे.  जयंत्या, षष्ट्यब्द्या, मृत्यूचा करुण प्रसंग किंवा विविध लढयांच्या वेळी उल्लेखनीय कार्याबद्दलची एखाद्या व्यक्तीची केलेली प्रशंसा, सत्कार समारंभ, अशा करुण, दुःखद व गौरवपर प्रसंगानुसार यशवंतरावांनी चरित्रलेखन केले.  तसेच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर ज्यांच्या विचारांच्या आणि आचारांच्या दृष्टीने चिरस्थायी ठसा उमटलेला आहे, अशा अनेक थोर विभूतींचे चरित्रलेख त्यांनी लिहिले आहेत.  यातून राष्ट्रीय पुरुषांबद्दलचे यशवंतरावांचे विचार पाहावयास मिळतात.

यशवंतरावांच्या चरित्रलेखाचा विवेचक मागोवा घेण्याआधी त्यांचे चरित्रलेखन कोणते याची समग्र नोंद करणे महत्त्वाचे आहे.  'सह्याद्रीचे वारे' या ग्रंथात 'शिवछत्रपतींचे पुण्यस्मरण', 'मला झालेले लोकमान्यांचे दर्शन', मानवतेचे पुजारी महाकवी रवींद्रनाथ टागोर, डॉ. आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा वारसा, 'ॠणानुबंध'मध्ये 'महात्माजी व महाराष्ट्र', (महात्मा गांधी) 'बुद्धिवंत मुत्सद्दी (डॉ. राधाकृष्णन्) अलौकिक नेता (पं. नेहरू), लालबहादूर शास्त्रीजींच्या सहवासात, पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा (छ. शिवाजीमहाराज), लोकमान्य राजर्षी (राजर्षी श्री शाहू महाराज), 'सेवाव्रती' (महर्षी वि.रा.शिंदे), 'लोकशिक्षक काकासाहेब' (काकासाहेब गाडगीळ), 'तत्त्वचिंतक रचनाकार' (डॉ. धनंजयराव गाडगीळ), 'नाट्याचार्य खाडिलकर' (काकासाहेब खाडिलकर), 'उदारमतवादी केळकर (तात्यासाहेब केळकर), 'प्रकाशाचा लेखक' (वि.स.खांडेकर), 'ग.त्र्यं.माडखोलकर', 'पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची' (ग.दि.माडगूळकर) इ. चरित्रपर लेख ॠणानुबंधमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.  युगांतरमध्ये 'सोन्याचा सोहळा' (य.दि.पेंढारकर), 'सामाजिक प्रगतीच्या प्रेरणा' (दादासाहेब गायकवाड) इ. यशवंतराव चव्हाण शब्दांचे सामर्थ्यमध्ये, 'डॉ. राजेंद्रप्रसाद', 'नाना पाटील', 'बाबू जगजीवनराम', 'शंतनूराव किर्लोस्कर', 'तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी', 'कवी सुधांशु' (ह.न.जोशी) इ. व यासारखे अनेक चरित्रलेख संपादित केलेले आहेत.  अशा विविध कार्यक्षेत्रांतल्या महनीय विभूतींसंबंधी यशवंतरावांनी चरित्रात्मक लेख लिहिले आहेत.  यापैकी बरेच चरित्रलेख नियतकालिकांतून व मासिकांतून प्रकाशित झालेले आहेत.  तरीही त्या लेखांना महत्त्वाचे अक्षरवैभव प्राप्‍त झाले आहे.  पण यावरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यशवंतरावांच्या या चरित्ररेखा जीवनाच्या विविध क्षेत्रांतल्या आहेत.  समाजसुधारक, पत्रकार, कलावंत, राजकारणी नेते, साहित्यिक, समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ असे अनेक क्षेत्रांतल्या महान व्यक्तींचे चरित्रविषयक लेख यशवंतरावांनी रेखाटले आहेत.  यशवंतरावांच्या एकूणच चरित्रलेखांचा आढावा घेतला तर सर्वच लेख वाङ्‌मयीन कसोटीवर मान्यता प्राप्‍त आहेत.  त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा चरित्रलेखन विस्तार या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्यासारखा आहे.