यशवंतरावांना ब्राह्मणेतर चळवळीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडून काहीतरी केले पाहिजे याची सामाजिक व राजकीय जाणीव शालेय जीवनातच झाली होती आणि देशासाठी काम करण्याची भावना दृढ होत होती. पुढे जतिंद्रनाथांच्या उपोषणाच्या प्रसंगापासून तर त्यांना आयुष्याचा अर्थ समजला व जीवनाचा अर्थ गवसला असे ते लिहितात. त्यामुळे आपण देशासाठी काम करताना कोणती वैचारिक भूमिका घ्यायची हा प्रश्न त्यांनी पहिल्या पंधरा महिन्यांच्या तुरुंगवासाने सोडविला. आचार्य भागवतसारखे विद्वान तेथे त्यांना भेटले. गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मार्क्स, फ्रॉईड यांचे विचार त्यांनी समजून घेतले. यशवंतरावांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. कोणताही विचार हा क्रियाशील होण्यापूर्वी तो भावनेने समजावून घ्यावा लागतो अशी त्यांची धारणा होती. जर भावना अपुरी असेल तर त्यातून येणारा विचार हा अपुरा आणि चुकीचा असतो. त्यामुळे यशवंतरावांनी कराड येथे काँग्रेस समाजवादी पक्षाची परिषद संपल्यानंतर आपल्या सहकार्यांना सांगितले, ''परिषद संपून गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी माझी बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि मी या मताशी आलो की काँग्रेस समाजवादी पक्षाचा सदस्य म्हणून काम करणे मला शक्य होणार नाही. यावेळी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली काम करणार्या कार्यकर्त्यांचा विचार मनात अधिक होता, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. त्यामुळे ही परिषद संपून गेल्यानंतर एक दोन आठवड्यांतच काँग्रेस समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन मी यातून मुक्त झालो.'' यशवंतरावांच्या मनाची अवस्था त्यावेळी कशी झाली होती याचे वर्णन ते वरीलप्रमाणे करतात. या विचारांच्या गोंधळाबरोबरच वैचारिक आंदोलने त्यांच्या जीवनाशी कशी येऊन भिडत होती याचेही त्यांनी केलेले चित्रण मोठे मार्मिक आहे. ते लिहितात, ''माझे हे वैचारिक प्रकरण इतके साधे नव्हते. गांधींच्या नेतृत्वावर निष्ठा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळीक आणि माझ्या जिल्ह्यातल्या काही मित्रांच्या साहचर्यामुळे नाही म्हटले तरी काहीशा आपुलकीने मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा एका वैचारिक त्रिकोणात मी यावेळी उभा होतो.'' यावरून यशवंतराव मनातील विचारांचा संघर्ष नेमक्या शब्दांत चित्रित करतातच, शिवाय त्यावर उपाय कोणता करायचा हेही त्यांना समजले होते. ते म्हणतात, ''विचारांचा गोंधळ कितीही असला तरी प्रत्यक्ष कार्यामध्ये त्यांची कसोटी लावल्याशिवाय बरोबर काय आणि चूक काय हे समजत नाही.'' अशा रीतीने या काळात यशवंतरावांची वैचारिक पार्श्वभूमी तयार होत होती. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे कार्यकर्त्यांतही त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होत होता. ह्या विश्वासामुळेच त्यांच्या कार्याला या वैचारिक गोंधळातून बाहेर काढून प्रवाहित केले होते आणि या वैचारिक आंदोलनातून यशवंतराव घडत होते.
'कृष्णाकाठ'च्या तिसर्या प्रकरणामध्ये १९३७ ते १९४६ या कालखंडातील सामाजिक, राजकीय व दुसर्या महायुद्धातील राजकीय घडामोडींचा आलेख चितारला आहे. त्यावेळी यशवंतराव कायद्याचा अभ्यास करत होते. त्यांचे लग्नही याचवेळी झाले. प्रमुख घटनाही याच काळात घडल्या होत्या. १९४६ ची निवडणूक व यश यांची चर्चाही 'निवड' या प्रकरणात लेखकाने केली आहे. 'निवड' या प्रकरणात यशवंतरावांनी दुसर्या महायुद्धातील काँग्रेसची भूमिका मतमतांतरे अत्यंत स्पष्टपणे रेखाटली आहेत. तसेच ९ ऑगस्टची क्रांती, भूमिगत चळवळ, १९४६ ची निवडणूक, त्यात यशवंतरावांचे यश, काँग्रेसच्या वगि कमिटीचा इतिहास, 'भारत छोडो' आंदोलनाचे चित्र, आंदोलनाची पूर्व पार्श्वभूमी, वर्धा येथील वगि कमिटीची बैठक, अलाहाबाद येथील इ.स. १९४२ च्या एप्रिलमधल्या आयोजित केलेल्या वगि कमिटीची बैठक, सर स्टॅफर्ड क्रिप्स यांचे भारतात आगमन, निवडणुकांसंबंधीची यशवंतरावांची मते, निवडणुकीतील त्यांचा सहभाग, डॉक्टर हेडगेवार यांच्याशी झालेली चर्चा, गोलमेज परिषद इत्यादी प्रसंगी आणि कितीतरी व्यक्ती येतात. त्यामध्ये आई विठाई, बंधू गणपतराव, पत्नी वेणूताई या जीवाभावाच्या व्यक्ती येथे आहेत, तशा राजकीय व वैचारिक क्षेत्रांतील अनेक व्यक्ती आहेत. या व यासारखे अनेक प्रसंग, राजकीय व सामाजिक गोष्टी विश्लेषण करीत 'कृष्णाकाठ'मध्ये त्यांन चितारल्या आहेत. या काळात एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे यशवंतरावांचा विवाह. पुढे त्यांनी आपल्यावरील कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन कराड येथे वकिलीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. तेथे त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. चार पैसे मिळू लागले. पण तेथे चालणार्या चर्चा ऐकून हळूहळू ते निराश झाले. या व्यवसायात आपण रमू शकणार नाही असा विचार त्यांच्या मनात आला. यासंदर्भात ते लिहितात, ''या सगळ्या अनुभवातून मी जायचा प्रयत्न करीत असताना आपण फार खालच्या स्तरावर या पेशाचे काम सुरू केले, याची थोडीशी बोचणी माझ्या मनात सुरू झाली. कारण ज्या तर्हेची स्पर्धा तेथे चालू होती त्या स्पर्धेत मी भाग घेऊ शकत नव्हतो. लॉ कॉलेजच्या लायब्ररीत बसून कायद्याच्या तत्त्वांचा अभ्यास आणि हायकोर्टाच्या निर्णयांचा केलेला व्यासंग यांचा या दैनंदिन कामाशी कोठे संबंध येतो आहे असे मला दिसेना.'' असा त्यांचा वकिली व्यवसायातील विदारक अनुभव नोंदवला आहे.