यशवंतरावांसारखी एखादी व्यक्ती जीवन जगत असते तेव्हा ती विविध जीवनप्रेरणांनी आपल्या आयुष्याला थोडा थोडा आकार देत असते. त्यांच्या जीवनाला कोणत्याही मोठ्या अगर प्रतिष्ठित घराण्याची पार्श्वभूमी अथवा परंपरा लाभलेली नाही. एका खेड्यातील अत्यंत सामान्य घरात त्यांचा जन्म झाला. कुठलेही खास संस्कार त्यांना वारसा म्हणून लाभलेल नाहीत. त्यांच्याभोवती होते फक्त त्यांचे मन आणि त्या मनाभोवती होता निसर्ग आणि अशिक्षित समाज. या पार्श्वभूमीवर यशवंतरावांना अनेक बरेवाईट अनुभव आले. त्यांच्या जीवनाला आकार देत असताना त्यांना सुखदुःखाचे, आशा-निराशेचे अनेकविध अनुभव आलेले आहेत. पण या सर्व घटनांची, परिणामांची तमा न बाळगताच त्यांच्या जीवन-विकासाचा झगडा चाललेला दिसतो. यशवंतरावांचे बालपण, कृष्णाकाठचे सौंदर्य, देवराष्ट्राचा परिसर, आजोळची माणसे, सामाजिक स्थिती, विविध जातिजमाती, ग्रामीण जीवन इ. सर्व काही तपशीलवार या आत्मचरित्रात येते. आयुष्यातील क्रमवार अनुभवावर व सामाजिक प्रवाहावर त्यांनी भाष्य केले आहे. याचबरोबर अनेक विचारप्रवाह, राजकीय आंदोलने, आत्मछंद, अवतीभोवतीच्या चळवळी यांचेही चित्रण 'कृष्णाकाठ'मध्ये येते. या सर्व घटना, प्रसंगांतून यशवंतरावांचे व्यक्तित्व साकारत जाते. तसेच त्यांचे कौटुंबिक जीवन, शिक्षण, वकिली, १९३९, १९४० आणि इ.स. १९४२ च्या चळवळीतील त्यांचे अनुभव, नाट्य, साहित्य आणि संगीत यांत असलेला रस, काही प्रमुख व्यक्तींची व्यक्तिचित्रे असे अनेक विषय या आत्मचरित्रात प्रसंगानुरूप आले आहेत. पण वैयक्तिक भावनांचा आविष्कार यशवंतरावांनी अपरिहार्य तेव्हाच केला आहे.
'कृष्णाकाठ'मधील 'वैचारिक आंदोलन' हे दुसरे प्रकरण यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील इ.स. १९३० ते १९३७ या कालखंडातील राजकीय घडामोडींचा आणि त्यांच्या वैयक्तिक, वैचारिक दृष्टिकोनाचा आलेख होय. यशवंतरावांनी आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाची एकत्र केलेली ही टाचणे आहेत. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या राजकीय मनाचे प्रवासवर्णन करण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. शाळेत असतानाच त्यांना पहिला तुरुंगवास घडला. याबाबत ते लिहितात, ''हो, मी हे सर्व केले आहे आणि असे करत राहण्याचा आमचा निर्धार आहे.'' पोलीस अधिकार्याने हेडमास्तरांना सांगितले, ''मी ह्या विद्यार्थ्याला अटक करतो आहे आणि घेऊन जातो आहे. त्याच्या पालकांना कळवा.'' आणि अशा रीतीने माझी पहिली शास्त्रशुद्ध अटक झाली.'' शाळेत असतानाच त्यांना पहिला तुरुंगवास घडला. पुढे त्यांच्या मनावर अनेक राजकीय तत्त्वज्ञानाचा परिणाम होऊ लागला. प्रथम ते कम्युनिझमकडे आकर्षित झाले. त्यानंतर ते काही काळ काँग्रेस समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते झाले. त्यानंतर रॉयवादी झाले. परंतु त्याही मंडळींना त्यांनी सोडले. स्वातंत्र्यानंतर जशा त्यांनी आपल्या राजकीय भूमिका अनेक वेळा बदलल्या तसाच बदल स्वातंत्र्यापूर्वीही घडला. त्याचे स्पष्टीकरण त्यांच्याच शब्दांत सांगितले पाहिजे. ''आम्ही जेलमधून आल्यानंतर काही महिन्यांनी मला समजले की १९३२ सालीच देशातल्या काही प्रमुख तरुण नेत्यांनी जेलमध्ये एकत्र विचार करून काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा संकल्प सोडला होता. हा पक्षही काँग्रेस अंतर्गत पक्ष होता. परंतु स्वातंत्र्यासाठी काँग्रेस संघटनेला समाजवादी विचारांची दृष्टी देऊन शक्तिशाली बनवायचे असा या मंडळींचा विचार असावा. यावेळीच माझी जी मनोभूमिका होती ती या विचारांशी मिळतीजुळती अशी होती. त्यामुळे माझे मित्र राघुअण्णा यांनी एक दिवस मला सुचवले, हा तो नवा विचार आणि संघटना जयप्रकाश नारायण, नरेंद्रदेव वगैरे पुढार्यांच्या मार्गदर्शनाने निघत आहे. त्याच्याशी आपण समरस झाले पाहिजे. मी त्यांना सांगितले असेच काहीसे विचार माझ्याही मनात आहेत. मग त्यांनी विचारले, ''अडचण कोठे आहे ?'' मी सांगितले, ''माझी अडचण एवढीच आहे आपण ज्या कार्यकर्त्यांबरोबर काम करतो आहोत त्यांना हे पटविल्याशिवाय असे पाऊल उचलल्याने आपण एकाकी तर नाही पडणार ! आणि आज पन्नास वर्षांने तरीही मी हे कबूल केले पाहिजे की माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने ही कसोटी माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि व्यवहार्य कसोटी म्हणून नित्य वावरत राहिली आहे.'' यशवंतरावांच्या विचारांचा गोंधळ त्यांच्या वरील स्पष्टीकरणावरून सहज लक्षात येतो. त्या काळात अनेक राजकीय तज्ज्ञांचा प्रभाव त्यांच्यावर होत होता. त्या प्रवाहात सामील होताना त्यांची मानसिकता कशी घडत गेली याचे सुंदर विवरण त्यांनी केले आहे. त्यामुळे 'कृष्णाकाठ'मधील त्यांचा आत्माविष्कार जीवनातील सत्याशी संबंधितच ठेवला आहे. जीवनातील काही प्रसंग संकोच निर्माण करणारे असतात. पण असे प्रसंग, अनुभव, यशवंतरावांनी अहंभाव, प्रतिष्ठा, नैतिकता आड न येता सांगितले आहेत.