यशवंतरावांच्या साहित्याचे स्वरूप व भूमिका
जीवन आणि साहित्य यांचा परस्परसंबंध असल्याने साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब दिसते, तर काही वेळा साहित्याचा जीवनावर परिणाम होतो. साहित्यात मानवी अनुभवांचे प्रतिबिंब पडलेले असते. कोणत्याही साहित्याच्या निर्मितीची बीजे जीवनातील वास्तवात असतात. मानवी मनाच्या घडणीमध्ये साहित्याचा वाटा असतो. एवढेच नाही तर समाज आणि संस्कृती यांच्या जडणघडणीमध्येही साहित्याचा वाटा असतो. याचे कारण असे की साहित्याचा निर्माता असलेला लेखक हा स्वतःच समाजाचा एक घटक असतो. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची, विचार व्यक्त करण्याची एक स्वतंत्र शैली असते. त्यामुळेच त्यांचे अनुभव व्यक्त होताना लेखक म्हणून त्यांची स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण होत असते. लेखकाच्या मनावर होणार्या परिणामाचे स्वरूप जसे बदलत जाईल तसे साहित्याचे स्वरूपही बदलत जाते. म्हणून इतरांप्रमाणेच समाजातील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीचा, परिवर्तनाचा, बदलाचा किंवा साचलेपणाचाही परिणाम त्यांच्यावर होत असतो. अशा नानाविध अभिव्यक्तीच्या प्रकारांतून साहित्याला विविध घाट प्राप्त होतात. परिणामतः प्रत्यक्ष जीवनातील स्थितिगतीचे प्रतिबिंब त्याने निर्माण केलेल्या साहित्यात उमटते. लेखकाच्या मनात उठणारी वलये, विचारवलये तो त्याच्या परीने साहित्यात नोंदवत असतो. याला यशवंतराव चव्हाणांचे साहित्यही अपवाद असण्याचे कारण नाही.
आपल्या आयुष्यातील घटनांचे आविष्कार वास्तवाच्या पातळीवरून अभिव्यक्त करण्याच्या हेतूनेच यशवंतरावांची साहित्यनिर्मिती किंवा वाङ्मयनिर्मिती झाली आहे. आजचा सर्वसामान्य माणूस काहीसा आत्मलक्ष्मी बनत चालला आहे. आपल्या अस्तित्वाविषयी तो जागरूक आहे. स्वतःविषयी, स्वकालाविषयी, स्वकालीन वातावरणाविषयी सतर्क असणारी यशवंतरावांसारखी व्यक्ती निश्चितच लेखन करते. प्रत्यक्ष जीवनात निर्माण होणार्या समस्यांच्या अनुरोधाने ज्या चळवळी निर्माण होतात त्याचा आणि साहित्याचा जवळचा संबंध असतो. वाङ्मयीन निर्मिती ही राजकीय क्रांतीच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाही. आपल्या देशातही राजकीय स्वातंत्र्याचे आंदोलन प्रदीर्घकाळ चालू होते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणाने भारतीय साहित्य संस्कृतीची परंपरा नव्याने तपासून घेण्याची गरज निर्माण झाली. सांस्कृतिक प्रबोधनाची ही चळवळ क्रांतिकारक होती. या चळवळीतून सामाजिक, धार्मिक सुधारणांचा जन्म झाला आणि आधुनिक भारतातील साहित्य या सुधारणावादी प्रयत्नांनी अर्थातच प्रभावित झाले.
साहित्यकृती ही आपल्या काळाशी संवाद करत असतानाच सर्वकालीन बनण्याची धडपड करीत असते. कोणतीही साहित्यकृती विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट संदर्भात जन्म घेत असते. त्या त्या काळाच्या गरजा, वैशिष्ट्ये व अपेक्षा यांनी तिला घाट दिलेला असतो. म्हणून यशवंतरावकालीन त्यांच्या साहित्यकृतीच्या आस्वादाच्या, आकलनाच्या आणि मूल्यमापनाच्या संदर्भात तत्कालीन परिस्थितीचा, त्या काळाचा परामर्श घेणे अगत्याचे ठरते. त्या त्या काळातील वैचारिक व भावनात्मक वातावरणातून लेखकाचे व्यक्तिमत्त्व बनत असते. महाराष्ट्रात वेळोवेळी निर्माण झालेल्या वैचारिक आंदोलनांचा, सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा, स्वातंत्र्यलढ्याचाही परिणाम मराठी साहित्यात झालेला दिसून येतो. स्वातंत्र्यकाळापर्यंतचे मराठी साहित्य मध्यमवर्गीयांच्या चौकटीतूनच वावरणारे होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यक्षेत्रात विविध स्तरांतून लेखन करणारी मंडळी आली. मध्यमवर्गीयांच्या आकलनाबाहेरील कक्षेचे वास्तव साहित्यातून मांडू लागली. त्यातूनच ग्रामीण, दलित, समकालीन, अत्याधुनिक, जन, स्त्रीवादी असे कितीतरी साहित्याचे नवप्रवाह उदयास आले. या प्रवाहातील लेखकांनी सामाजिक बांधीलकी स्वीकारली. नवे नवे लेखक, नवे नवे आशय घेऊन लेखन करू लागले. समाज, इतिहास, राजकारण, मानसशास्त्र आदी विषयांना स्पर्श करणारे साहित्य समाजासमोर येऊ लागले.