• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ५९ प्रकरण ८

प्रकरण ८ - शैलीकार सह्याद्री

श्री. यशवंतराव चव्हाण यांना राजकारण, समाजकारणाइतकीच साहित्याविषयी ओढ होती.  ललित साहित्य आणि वैचारिक वाङ्‌मय यांच्या वाचनाने त्यांची अभिरुची, रसिकता आणि बहुश्रुतता असे सर्व गुण वृद्धिंगत झाले होते.  त्यांची वाणी आणि लेखणी प्रभावी होती.  तसेच ते स्वतः एक सर्जनशील कलावंत व उत्तम समीक्षक होते.  साहित्याच्या क्षेत्रात माझी भूमिका नम्र, रसिक वाचकाची आहे असे ते आवर्जून सांगतात.  त्यांचा मूळ पिंडच प्रतिभावंताचा होता.  आपल्या मायबोलीवर त्यांचा खूप जीव होता. कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमाजवळचा भाग सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेला परिसर त्यांच्यातल्या सर्जनशील उमाअना खतपाणी घालणारा ठरला.  या परिसरात त्यांच्या मनात निसर्गसौंदर्याची ओढ रुजली.  यातूनच त्यांच्या विविध साहित्यकृती निर्माण झाल्या.  त्यांच्या 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर', 'ॠणानुबंध', 'कृष्णाकाठ', 'भूमिका', 'शिवनेरीचे नौबती', 'यशवंतराव चव्हाण शब्दांचे सामर्थ्य', 'विदेश दर्शन' इ. काही निवडक कलाकृतींच्या माध्यमातून त्यांची साहित्यिक जाण लक्षात येते.  तसेच त्यांच्या या पुस्तकांद्वारे काही प्रवास चिंतने, चरित्रलेख, वैचारिक लेख इ. च्या आधारे यशवंतरावांच्या लेखनातील साहित्यधर्माचे चिकित्सक विवेचन करायचे आहे.

यशवंतरावांच्या एकूण साहित्याचे स्वरूप पाहता त्यामध्ये विविधता आढळते.  त्यांच्या साहित्याचे वर्गीकरण करावयाचे झाल्यास ते असे करता येईल.  'कृष्णाकाठ' हे यशवंतरावांचे आत्मचरित्र.  'ॠणानुबंध' हा त्यांचा आत्मपर लेखांचा संग्रह आहे.  'विदेश दर्शन' हे संपादित पुस्तक प्रवासवर्णनपर आहे.  तसेच 'यशवंतराव चव्हाण-शब्दांचे सामर्थ्य' या संपादित पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रण, आत्मकथानात्मक लेखन व वैचारिक चिंतन, साहित्यविषयक विचार यांसारख्या विषयाला स्पर्श करणारे लेखन समाविष्ट आहे.  त्यामुळे वरील सर्व पुस्तकांतील लेखन ललित वाङ्‌मयामध्ये समाविष्ट करता येईल.  या लेखनामध्ये यशवंतरावांचे अंतरंग, त्या आधारे फुलत जाणारे त्यांचे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व स्पष्ट जाणवते.  तसेच स्वतःच्या मनाचे, जीवनाचे आणि स्वतःभोवती असलेल्या विश्वाचे अंतर्मुख दृष्टीने त्यांनी निरीक्षण केले.  त्यामुळे त्यातूनच यशवंतरावांची कल्पकता, अंगी असणारी संवेदनक्षमता व सहानुभूती दिसून येते.  याचबरोबर छोट्या मोठ्या अनुभवांशी तादात्म्य पावून त्यांच्याकडे तटस्थ वृत्तीने पाहण्याची सवय व चिंतनशील वृत्तीने जीवनातील विविध व परस्परविरोधी अनुभवांचा अर्थ लावण्याचे सामर्थ्य यांचे दर्शन घडते.  हाच त्यांच्या ललित लेखनाचा गाभा आहे.

यशवंतरावांच्या वैचारिक लेखनामध्ये विविध प्रसंगी केलेल्या भाषणांचा उल्लेख करावा लागेल.  ही त्यांची भाषणे वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत.  शिवाय साहित्यिक दृष्ट्याही त्याचे मोल महत्त्वाचे आहे.  'शिवनेरीचे नौबती', संपादित 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर', आणि 'भूमिका' हे त्यांचे भाषणांचे संग्रह होत.  स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतरावांच्या या वैचारिक साहित्याने समाजमनात या वाङ्‌मयाबाबत प्रतिष्ठा निर्माण करण्याचे काम केले आहे.  यामध्ये राजनीती, सामाजिक संस्था, धर्म व अर्थ यांसारख्या जीवनविषयक प्रश्नांवर त्यांनी स्वतंत्र रीतीने व्यासंगपूर्ण विचार मांडले आहेत.  अलीकडच्या काळात वैचारिक लेखन अथवा विचार दुर्लक्षित होत असताना यशवंतरावांसारखी एखादी व्यक्ती वैचारिक साहित्यात स्वयंतेजाने झळकताना दिसते.  वैचारिक साहित्याला आवश्यक असणारी चिंतनहशीलता, व्यासंग, जीवनदृष्टी व नवनवीन आव्हाने पेलण्याची कुवत त्यांच्याकडे होती.  म्हणूनच नानाविध विषयांवर सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर त्यांनी उपरोक्त पुस्तकांमध्ये लेखन व विवेचन केले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात निबंधाच्या माध्यमातून अनेक लेखक, विचारवंतांनी सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रश्नांची चर्चा केली.  एखाद्या प्रश्नाची विविध पातळीवर चिकित्सा करण्यासाठी या वाङ्‌मयप्रकाराचा उपयोग केला गेला.  लोकहितवादी, म.फुले, वि. कृ. चिपळूणकर, स्वा. सावरकर, श्री. म. माटे इत्यादींपासून ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ना.ग.गोरे, दि.के. बेडेकर, गं.बा. सरदार, ग.प्र. प्रधान. डॉ. आंबेडकर व यशवंतराव चव्हाण यांनी ही परंपरा समृद्ध केली. 

यशवंतरावांच्या या भाषणरूपी विचारातून निबंधाचा एक नवीन घाट प्रतीत होतो.  त्यातूनच वैचारिक गद्य निर्माण झाले.  यशवंतरावांकडे असलेली सामाजिक जाणीव व ध्येयदृष्टी यामुळे त्यांचा स्वतःचा असा एक ठसा या वाङ्‌मयात निर्माण झाला आहे.  या साहित्यातून त्यांनी नवी उर्मी, नवा विचार व नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्‍न केला आहे.  बदलत्या जीवनाचे बदलते संदर्भ, बदलत्या समस्या यांचा वेध घेण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला आहे.  यासाठी लेखणी व वाणी ही दोन्ही साधने त्यांनी अखंड राबविली.  त्यातून प्रबोधनाचे काम केले.  त्यांच्या विचारांचे सामर्थ्य बुद्धिनिष्ठा व समाजनिष्ठ होते.  त्यामुळेच विविध विषयांवर लेखन करणारा हा लेखक समाजातल्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेत राहिला.  यशवंतरावांच्या या वैचारिक भाषणांना व लेखनाला निबंधाचा दर्जा प्राप्‍त झाला आहे.  या साहित्याचे स्थूलमानाने विषयानुसार वर्गीकरण करावयाचे आहे.  यशवंतरावांनी विविध विषयांना स्पर्श करून निश्चित अशी मते मांडली आहेत.  साहित्याच्या दृष्टीने त्यांच्या भाषणांचे संकलित ग्रंथ हा अनमोल ठेवा होता.