• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव २९

पदवी प्राप्‍त झाल्यानंतर एल.एल.बी.चे शिक्षण घ्यायचे असा विचार त्यांच्या मनात आला.  सुरुवातीला आपण शिक्षकी व्यवसायाकडे वळावे किंवा एखादी शिक्षणसंस्था काढावी किंवा एखादे वृत्तपत्र काढून संपादकाचे काम करावे असाही विचार त्यांच्या मनात आला.  परंतु मित्रांच्या सल्ल्यानुसार हा विचार बाजूला गेला.  त्या संदर्भात आपल्या मित्रांचे मनोगत नोंदवताना ते म्हणतात, ''तुला शिक्षक वा संपादक व्हायचे असले, तरी कायद्याचे ज्ञान काही तुझ्याआड येणार नाही.  कायद्याची परीक्षा देऊनही तू त्या मार्गाने जाऊ शकशील.  फक्त पदवीधरच राहिलास, तर अर्ध्यावर लोंबकळत राहशील.''  त्यामुळे यशवंतरावांनी कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.  दोन वर्षांच्या खर्चासाठी म्हणून त्यांनी विट्यात जी वडिलोपार्जित शेती होती ती विकली.  आणि पुण्याला लॉ साठी जाण्याचा निर्णय घेतला.  त्यासाठी त्यांना त्यांचे मित्र आत्माराम बापू पाटील यांचे खूप सहकार्य लाभले.  सुरुवातीस ते त्यांच्या घरी राहू लागले.  नंतर शुक्रवार पेठेतील श्री. स. आ. जोगळेकर यांच्या माडीवर ते राहू लागले.  व नित्यनियमित कॉलेजला जाऊ लागले.  पुण्यामुध्ये अनेक वाङ्‌मयीन मंडळे, सभा, संमेलने यास हजर राहू लागले.  अनेक अभ्यास मंडळात ते सहभागी झाले.  त्यामुळे विचारांची प्रगल्भता वाढू लागली.  अभ्यासाशिवाय त्यांचे लक्ष इतर क्षेत्रांकडे आकर्षित झाले.  त्याचा परिणाम असा झाला की १९३९ च्या कायद्याच्या पहिल्या परीक्षेत ते नापास झाले.  १९४० चे वर्ष संपत आले.  कायद्याच्या दुसर्‍या वर्षाचा अभ्यास ते करू लागले.  पूर्वी आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये असा विचार त्यांच्या मनात येतच होता.  आईनेही तसाच सल्ला दिला.  या काळात समाजकारण व राजकारण सोडून देऊन यशवंतराव मन लावून अभ्यासाला लागले.  या संदर्भात ते लिहितात, ''अभ्यास करू लागल्यानंतर विषयामध्ये रस निर्माण होतो.  आणि मग त्यातील सौंदर्य स्थळे लक्षात यायला लागतात.''  कायद्याच्या परीक्षेचा निकाल लागला आणि ते उत्तीर्ण झाले.  १९४० मध्ये ते वकील झाले.  त्यांनी काही फौजदारी खटले चालविले.  त्यात थोडेफार पैसे मिळू लागले.  कराडला ते प्रॅक्टिस करू लागले.  कराडमध्ये गुरुवात पेठेत कोळेवाडीकर देशपांडे यांच्या घरी ते भाड्याने राहू लागले.  एक वर्षभर त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला.  फौजदारी न्यायदानाचे विलक्षण काम पाहून ते अस्वस्थ झाले.  या धंद्यामध्ये असणारी विलक्षण स्पर्धा पाहून ते खिन्न झाले.  या संदर्भात ते म्हणतात, ''लॉ कॉलेजच्या लायब्ररीत बसून कायद्याच्या तत्त्वांचा अभ्यास आणि हायकोर्टाच्या निर्णयांचा केलेला व्यासंग यांचा दैनंदिन कामाशी कुठे संबंध येतो आहे असे मला दिसेना.''  पुढे त्यांच्या मनास असा विचार स्पर्शून गेला की, ''जर आपले सगळे आयुष्य या वातावरणात असेच जाणार असेल, तर माझ्या ज्या आशा व आकांक्षा मनामध्ये धरून मी शिक्षण पुरे केले, ते एका अर्थाने व्यर्थ आहे.''  यशवंतराव या व्यवसायापासून दूर झाले आणि सामाजिक कार्यात व राजकारणात ते पूर्ण वेळ रस घेऊ लागले.

ग्रंथ हेच गुरू

यशवंतराव विद्यार्थीदशेत वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत होते.  त्यावेळी वेगळी माणसे आणि वेगळ्या वातावरणामुळे त्यांच्या अनुभवात भर पडत होती.  वाचनाने आणखी चांगले संस्कार मनावर होऊ लागले.  त्यांचे बालपण जरी खेड्यात गेले असले तरी वाचनाची आवड लहानपणीच निर्माण झाली होती.  लहानपणी यशवंतराव आईबरोबर रामायण, महाभारताची पारायणे तसेच कीर्तन ऐकण्यास जात असत.  कधीकधी आई या ग्रंथांतील कथा सांगे.  त्यामुळे त्यांच्या मनाला नवीन जाणिवांचा लाभ होई.  या कथावाचनाचा उपयोग त्यांनी स्वतःचे जीवन घडविण्यासाठी केला.  यातून त्यांच्या मनाला उर्मी मिळाली.  लहानपणापासून त्यांच्या विद्वानांचे व त्यांच्या थोर साहित्याचे आकर्षण होते.  या विद्वानांपासून व साहित्यापासून आपण काहीतरी घेतले पाहिजे असे त्यांना वाटत असे.  त्यांना शिकण्याची तृष्णा होती.  त्यामुळेच त्यांना वाचनाचा आणि ग्रंथांचा लळा लागला.  मुळात लहानपणापासून ते बुद्धिमान होतेच.  पण बुद्धिमान असले तरी जिज्ञासेचा अभाव असून उपयोगी नाही.  जिज्ञासेपोटी ज्ञान मिळते.  यातूनच त्यांना वाचनाचा छंद लागला.  ग्रंथवाचन हाच त्यांच्या जीवनाचा पुढे व्यासंग बनला.  त्यामुळे विचार करून, अनुभवातून प्रतिक्रिया व्यक्त करावयाची हा त्यांचा स्वभाव बनला.  अनुभवाला वाचनाचे आणि विचारांचे कोंदण लाभले.

विठाईची देवावर श्रद्धा होती.  रामायणाच्या कथेबद्दल तिला आदर होता.  त्या कथा ती बाल यशवंतास सांगत असे.  पुढे यशवंतराव लिहू वाचू लागल्यानंतर ती यशवंतरावांकडून साखरेबुवांची 'सार्थ ज्ञानेश्वरी' वाचून घेत असे.  या ग्रंथाचा सारांश आईस विचारला असता ती म्हणते ''कृष्णदेव अर्जुनाला सांगतात, की तू आपला 'मी'' पणा सोड आणि जे तुझे काम तू केले पाहिजेस, ते तू करीत राहा.''  गीतेचा एवढा साधा आणि सरळ अर्थ आईने सांगितला.  त्यातून त्यांना स्वावलंबनाचे धडे मिळाले.