• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव २८

महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण होईल का या साशंक वृत्तीने यशवंतराव कोल्हापूरला गेले.  तेथे राहणे, जेवणे, शुल्क, पुस्तके व इतर खर्च इ. सर्व खर्चाची तरतूद त्यांनी केली.  तेथे त्यांना उत्तम प्राध्यापकवर्ग भेटला.  त्यामध्ये प्राचार्य बाळकृष्ण इतिहास शिकवत.  त्यांना यशवंतरावांबद्दल प्रेम वाटू लागले.  आर्थिक अडचणीमुळे सहा सहा महिने त्यांना फी भरता येत नसे.  पण प्राचार्यांनी त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना सवडीने शुल्क भरण्याची सवलत दिली.  एक प्रसंग असा घडला की परीक्षा शुल्कासाठी आणलेले पैसे चोरीस गेले.  मित्र गौरीहर सिंहासने यांनी शुल्क व परीक्षा फी भरून तो प्रसंग निभावून नेला.   

यशवंतरावांना 'अर्धमागधी' हा विषय डॉ. उपाध्याय नावाचे प्राध्यापक शिकवत होते.  तर्कशास्त्रासारखा अवघड विषय प्रा. ना. सी. फडके शिकवत होते.  अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांना होती.  जवळजवळ तीन पिढयांचे मनोरंजन करणारे थोर कादंबरीकार, कथाकार प्रा. ना. सी. फडके यांचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर पडला.  लेखनाला बोली भाषेने नटविणार्‍या ह्या साहित्यिकाने यशवंतरावांच्या पिढीला प्रेम आणि शृंगार यांचे धडे दिले.  प्राध्यापकाच्या पेशावर त्यांचे मनापासून प्रेम होते.  ते तरुण विद्यार्थ्यांत मिसळत असत.  अध्यापनातील कौशल्यामुळे त्यांनी यशवंतरावांसारख्या अनेक विद्यार्थ्यांना वश करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वळण लावले.  त्यामुळे विद्यार्थिदशेतच 'जादूगर' व 'दौलत' सारख्या कादंबरीचे ते उत्तम वाचक झाले.  त्यांची साहित्यिक अभिरुची दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेली.  

मराठी, इतिहास व तर्कशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते.  'माधवराव पटवर्धन', 'माधव ज्युलियन' उत्तम इंग्रजी कविता शिकवत असत.  त्यांच्याबद्दल यशवंतराव सांगतात, ''मात्र फडके जसे लोकप्रिय होते तशा तर्‍हेची लोकप्रियता माधवरावांना नव्हती.  पण ते प्रवृत्तीने विद्वान आणि प्रकृतीने गंभीर होते.  इंटरमिजिएटच्या वर्गामध्ये ते आम्हांला इंग्रजी कविता शिकवत असत.''  डॉ. बोस हे इंग्रजीचे प्रोफेसर यशवंतराव बी.ए.च्या वर्गात असताना शिकवत असत.  राजाराम कॉलेजमध्ये अशा थोर साहित्यिक व प्राध्यापक व्यक्तीचा प्रभाव यशवंतरावांच्या कॉलेजजीवनावर निश्चितच पडला.  त्यांच्याकडून घेतलेले सुसंस्कार हे त्यांना सतत प्रेरणादायी व प्रेरक ठरले.  वाचन, मनन, चिंतन या सवयी यशवंतरावांना लागल्या.  त्याचा खूप फायदा त्यांना झाला.  कोल्हापूरातील वास्तव्यात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे बहुमोल कार्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले.  सत्यशोधकीय चळवळीचा अनुभव जवळून घेतला.  कोणत्याही भाषिक वादात न गुरफटता अव्याहतपणे व चिरतरुण मनोवृत्तीने ते वाचन करीत होते.  अफाट वाचनातून, निरीक्षणातून त्यांनी स्वतःमधला लेखक जागता ठेवण्याचा प्रयत्‍न केला.  मराठीतील सर्व वाङ्‌मय प्रकारांवर त्यांचे नितांत प्रेम होते.  तसा त्यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता.  त्यांचे वाचन हे शोधक दृष्टीचे होते.  म्हणूनच सभोवतालच्या घटनांकडे ते पुढे सूक्ष्म दृष्टीने पाहू लागले.  त्यातली जीवनविषयक विसंगती शोधत सहजतेने लेखन व भाषण करू लागले.  वाचनाच्या वेडाने झपाटलेले त्यांचे मन जे हातात मिळेल ते वाचत गेले.  कॉलेजची आठवण सांगताना ते म्हणतात, ''कोल्हापूरची उच्च शिक्षणाची जी चार वर्षे माझ्या आयुष्यातील पायाभूत आणि गतिमान अशी वर्षे आहेत.  गेल्या तीन वर्षांच्या राजकीय अनुभवानंतर मी आता सर्व परिस्थिती व विचारांतील भेदाभेदांकडे काहीशा तटस्थ वृत्तीने पाहू शकत होतो.''  यशवंतराव कोल्हापूरच्या महाविद्यालयामध्ये शिकत होते.  परंतु आठवड्यातील तीन दिवस ते सातारा जिल्ह्यातल्या संघटनेच्या कामासाठी खर्च करत राहिले.  वर्षातील सात आठ महिने राजकीय जागृतीचे काम ते करत असत.  शेवटचे दोन महिने अभ्यास करून परीक्षा देत असत.  कॉलेज जीवनातच त्यांनी भावी राजकीय जीवनाचा पाया भक्कम केला.  येथील वास्तव्यामुळेच त्यांना अनेक कलांचा छंद जडला.  साहित्याची आवड निर्माण झाली.  के.डी.पाटील, आनंदराव चव्हाण, नानासाहेब अयाचित सारखे अनेक मित्र लाभले.  विद्यार्थी, छोटा कार्यकर्ता म्हणून यशवंतराव महाविद्यालयामध्ये ओळखले जाऊ लागले.  अखेर १९३८ मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली.