• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव १२५

'सातव्या मजल्यावरील चढ' या लेखात यशवंतराव भूतकाळाविषयीचे चिंतन प्रकट करतात.  आठवणीच्या माध्यमातून अनेक प्रसंग सांगतात.  राजकीय, सामाजिक क्षेत्रातले अनेक अनुभव ते कथन करतात.  १९४६ पासून ते १९७२ पर्यंतच्या राजकीय व सामाजिक घडामोडींचा पट ते मांडतात.  हे सांगत असताना ते स्वतःबद्दलही सांगतात, ''पण आज मनाला शांतता आहे.  समाधान आहे.  सत्तेत असलो किंवा सत्तेच्या बाहेर असलो, तरी माझी वैचारिक संगत कधी सुटणार नाही.  जीवनाची लढाई संपलेली आहे, असं नव्हे. अंतापर्यंत ती चालू राहणार आहे.  त्यासाठीच जीवन समर्पित आहे.''  या लेखात लेखकाने भावनाविष्कार व्यक्त केला आहे, याचबरोबर भावोत्कट प्रसंगाने निर्माण झालेल्या भावनात्मक प्रतिक्रिया तितक्याच तीव्रतेने येथे नोंदवल्या आहेत.  माणसाचे विचार, चिंतन, तात्त्वि दृष्टिकोन, उत्कट-तीव्र झाले की तिचे भावमूल्य सिद्ध होते.  यशवंतरावांच्या विचारांना असेच भावमूल्य प्राप्‍त होते.  यामधून यशवंतरावांच्या विचारांतील भावमूल्यांचे स्वरूप पाहावयास मिळते.  

यशवंतरावांनी राजकारण व समाजकारण या आव्हान देणार्‍या विशाल क्षेत्रात प्रभावी व अभूतपूर्व अशी कामगिरी केली.  त्याचप्रमाणे एक खंबीर आणि प्रभावी नेता म्हणून तितकीच प्रभावी आणि बहुमोल कामगिरी राजकीय क्षेत्रात केली.  या नेतृत्वास त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने फार मोठा हातभार लावला.  अत्यंत साधी, सोपी भाषा, लोकांना कळेल, पटेल आणि रुचेल असा युक्तिवाद, त्यांची मनं भारून टाकणारं चैतन्य, त्यांना स्फुरण चढवणारी ओजस्विता आणि त्यांना सतत प्रसन्न ठेवणारे विचार यांनी त्यांचं वक्तृत्व नटलेलं असे.  गर्दी खेचून घेण्याचं आणि तिला खिळवून ठेवण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यात होतं.  अशा या वक्तृत्वाबद्दल 'भाषण म्हणजे संवाद' या लेखात विचार मांडले आहेत.  ते लिहितात, ''भाषण रंगविण्यासाठी काही प्रसंगी काही आडाखे जरूर बांधावे लागतात.  परंतु मला त्याची पुर्वतयारी करावी लागत नाही.  आडाखे, मी भाषणाला उभा राहिलो, म्हणजे मला सुचतात, हा दैवी योग आहे.  याबाबत प्रमुख गोष्ट म्हणजे, भाषणास उभे राहिले म्हणजे मनात विचारांची स्पष्टता असायला पाहिजे.  आत्मविश्वास असायला हवा.... वक्तृत्वासाठी वक्तृत्व मी कधी केले नाही.  त्यामुळे कधी माझी भाषणे चांगली होतात तर कधी सामान्य होतात.  पण ती कधी पडत नाहीत..... मी जेव्हा साहित्यविषयक प्रश्नांसंबंधी माझे विचार मांडण्याचा प्रयत्‍न करीत असतो, तेव्हा त्या क्षेत्रातील मी अधिकारी माणूस नाही.  परंतु बहुशृत आहे, असा माझा दावा आहे.  त्यामुळे या विषयांवर बोलण्याचा मला नेहमीच आनंद वाटतो.''  हा लेख आत्मविश्लेषणात्मक असल्याने यामध्ये त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये ते स्वतःच सांगतात.  भाषण कसे व किती लांब करावे, त्यामधील मुद्दे, भाषणाच्या विषयावरील वाचन व चिंतन, विषयाची मांडणी इत्यादीबाबतचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.  यशवंतरावांनी निरनिराळ्या प्रसंगी व्यक्त केलेल्या विचारावरून त्यांचे विचार किती चौफेर व परिपक्व होते, याचे दर्शन घडते.

यशवंतराव अभिजात साहित्यिक होते.  मराठी भाषेचा एक नम्र पाईक या नात्याने मराठी भाषेचा आणि साहित्याचा त्यांनी आदर केला.  त्यांनी मराठी साहित्यामध्ये विविध प्रकारचे लेखन केले.  ललित आणि आत्मलेखनात्मक तसेच चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणात्मक आठवणी, प्रवासवर्णनपर, स्फुट, वैचारिक, समीक्षात्मक, पत्रात्मक इ. स्वरूपातील लेखन त्यांनी केले आहे.  त्यांच्या 'कृष्णाकाठ', 'ॠणानुबंध', 'युगांतर', 'भूमिका', 'शिवनेरीचे नौबती', 'विदेश दर्शन', 'सह्याद्रीचे वारे', 'यशवंतराव चव्हाण-शब्दाचे सामर्थ्य' इ. ग्रंथातून त्यांच्या ललित प्रकृतीचा आपल्याला परिचय होतो.  या साहित्यकृतीतून आपली दीर्घकालीन वाङ्‌मयीन अशी साहित्य संस्कृती जपण्याचा प्रयत्‍न केला.  ते प्रथम राजकारणी होतो.  पण त्यांच्यामधील सामाजिक विचारवंत हा मात्र साहित्यिकाबरोबरचा असल्याचे स्पष्ट जाणवते.  एक सर्वसाधारण माणूस म्हणून साहित्यिकाने कसे जगावे व विचारसंपन्न कसे असावे याचा एक नमुना म्हणून त्यांच्या साहित्यिक कलाकृती लक्षवेधक असल्याचे दिसून येते.  यशवंतरावांच्या 'कृष्णाकाठ' या खंडामध्ये त्यांचे १९४६ पर्यंतचे चरित्र दिसते.  त्यातून त्यांच्या अभिरुचीसंपन्न व सुसंस्कृत अशा एका मनाचे दर्शन होते.  कृष्णाकाठ, भूमीविषयी प्रेम, अनेक छंदांची जोपासना, वैचारिक आंदोलन, विश्वास आणि मैत्रीचे, स्नेहाचे नाते जिवाभावाने जपणारे मन, वैचारिक मतभेद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद इ. विविध विचारसरणीतून त्यांच्या मनाचा प्रवास कसा झाला हे स्पष्ट होते.  अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन त्यांना कसे लाभले, संस्कारक्षम आणि संवेदनक्षम अशा व्यक्तित्त्वाची जडणघडण बालजीवनापासून ते प्रौढजीवनापर्यंत कशी झाली याचा पट 'कृष्णाकाठ' मध्ये साकारला आहे.  त्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे प्रत्ययकारी चित्रण दिसते.  यशवंतरावांचा विवाह, १९४२ चा लढा, भूमिगत चळवळ, पहिले स्वातंत्र्याचे आंदोलन, निवडणूक, प्रभावशाली व्यक्ती, विविध चळवळीतील सहभाग यांचे चित्रण त्यांनी केले आहे.  मात्र 'सागरकाठ' व 'यमुनातट' या त्यांच्या संकल्पित आत्मचरित्राचे खंड मात्र अपूर्ण राहिले.  'कृष्णाकाठ' मधील भाषा, विचारगर्भ व चिंतनशील सुभाषितवजा विधाने आपले लक्ष वेधून घेतात.  याची अनेक उदाहरणे या आत्मचरित्रात आहेत.