• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव १२४

ललित गद्यात स्वैर आत्माविष्काराला अधिक महत्त्व असते.  यामध्ये 'मी' ला जास्त महत्त्व असते.  'मी' ने जे पाहिले, अनुभवले, 'मी' ला जे आवडले, नावडले, भावले त्या 'मी' चा हा निखळ आविष्कार असतो.  म.द.हातकणंगलेकर या संदर्भात लिहितात, ''ललितलेखन हे मूलतः आत्मरंगांनी बहरलेले लेखन असते.  हे आत्मरंग किती गाढ आणि ताजे, किती संवेदनतत्पर व हळूवार आणि व्यक्तिगत असूनदेखील किती प्रमाणात जीवनाची सनातन स्पंदने स्वीकारणारी आहेत यावरच या लेखनाची सार्थकता व गुणवत्ता अवलंबून असते.''  या व्याख्येप्रमाणेच यशवंतरावांनीसुद्धा आपल्या ललितलेखनात वैचारिकतेचा उपयोग करून जीवनविषयक तत्त्वज्ञान व चिंतनशीलता याचा वापर केला आहे.  तसेच 'मी' चे राग-लोभ, रीती, सवयी, नाद, छंद इ. प्रकटीकरण त्यांनी या लेखातून केले आहे.  यशवंतरावांच्या ललित गद्याचे खरे सामर्थ्य त्यांना आलेले अनुभव वैविध्यपूर्ण रीतीने मांडण्यातच आहे.  त्यांच्या ललित लेखनाला कोणत्या विषयाचे वावडे नाही.  अनुभवांच्या कुठल्याही प्रांतात ते संचार करू शकते.  'माझ्या आयुष्यातील आशा निराशेचे क्षण' या लेखात त्यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक आत्मगत आठवणी सांगितल्या आहेत.  राजकारणातील अनुभव कथनही केले आहे.  राजकारणामध्ये माणसे जोडणे व स्नेहसंबंध टिकवणे महत्त्वाचे असते.  असंख्य लोकांची मने जपावी लागतात.  पण काही लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यास ते वैर स्वीकारतात.  अशा स्वभावाची माणसे पाहिल्यावर ते निराश होतात.  ते लिहितात, ''मला राग येत नाही, पण निराशेचा मात्र तीव्र अनुभव होता.  मला वाटते, कदाचित हा जीवनाच्या खेळातील आवश्यक भाग असेल.  राजकारणात निदान सरळरेषेत काहीच चालत नाही.  कदाचित इतर क्षेत्रातही चालत नसावे.  सरळ रेषेची ही संकल्पना फक्त भूमितीतच पाहायची.  वास्तव जीवनात दिसतात त्या अनेक समांतर रेषा किंवा एकमेकांना छेदून त्रिकोण, चौकोन करणार्‍या रेषा.  हेही खरे आहे की आकर्षक वळसे घेत मनोरम चित्रलेखा उभ्या करणार्‍या रेषाही असतात.  त्यांना विसरून चालत नाही.  जीवनाची ही वास्तविकता गृहीत धरून चालावे लागेल व ती हसतमुखाने स्वीकारल्याने मनुष्य निराशेच्या कक्षेबाहेर पडू शकेल.''  यशवंतरावांनी येथे प्रतिमांचा वापर करून सुंदर असे अनुभव कथन केले आहेत.  यशवंतरावांना समाजव्यवहारात वावरताना अनेक व्यक्तींशी निगडित असे भल्याबुर्‍या प्रवृत्तींनी युक्त असे जे अनुभव आले ते आपल्या स्मृतिकोशात वाङ्‌मयीन पातळीवर अनुभवून अशा स्वरूपाचे विचार व्यक्त केले आहेत.  'भारताची सद्यस्थिती', 'विकसित आणि अविकसित राष्ट्रांचे आर्थिक संबंध', 'लोकशाहीतील प्रशासन' यांसारख्या लेखातून त्यांचे राजकीय विचार समाविष्ट झाले आहेत.  हे लेख त्यांच्या स्वतंत्र, निर्भय व निर्मितीशीलविचारांची साक्ष देण्यास पुरेसे आहेत.  त्यांच्या या लेखनातील वैचारिकता कोठेही विचलित झालेली दिसत नाही.  

यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची खोली व्यापक आहे.  सामाजिक समस्यांकडे ते किती सूक्ष्मतेने केवळ चिंतनाच्या पातळीवरून पाहू शकतात याची अनेक उदाहरणे देता येतील.  त्यांचे चिंतनाचे क्षेत्र विस्तृत आहे.  जीवनाच्या महत्त्वपूर्ण अंगांना स्पर्श करणार्‍या अनेक विषयावर आपला स्वतंत्र विचार ते व्यक्त करतात.  ''जीवनाची धडपड ही काहीतरी प्राप्‍त करण्यासाठी असते.  माणूस हा काही तत्त्व, ध्येय, अर्थ जीवनाला जोडत असतो.  ते प्राप्‍त करण्यासाठी जीवन धडपडत असते.  ती तत्त्वे, ध्येय, अर्थ या सर्वांचे महत्त्व अशासाठी असते की त्यांची जीवनावर काही प्रतिक्रिया निर्माण होत असते.''  असा विचार ते मांडतात.  त्यांच्या या लेखनाला जीवनविषयक चिंतनाचा आणि व्यासंगाचा भक्कम आधार आहे.  त्यांच्या या विचारातून वाचकांना एक नवी दिशा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्‍न आहे.  त्यांच्या विधानांना सुभाषितांचे सामर्थ्य प्राप्‍त होते.  'जीवनाचे पंचामृत' या लेखात त्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतील.  उदा. ''सुखाचा क्षण असो अगर दुःखाचा, संकटाचा असो, साथीदाराचे बोट धरून ठेवलेच पाहिजे.  सुखाच्या वेळी एकत्र यायचे आणि संकटाच्या वेळी बोट सोडून दिसेल त्या मार्गाने निसटून जायचे.''  जीवन हाच जीवनाचा अर्थ.  वैयक्तिक जीवन हेच त्याचे ध्येय.  लोकसत्ताक जीवनाचा अर्थही वैयक्तिक जीवन असाच करावा लागतो.... सत्तेचा उगम मानवातून होतो.  माणूसच या सत्तेचा उत्कर्ष साध्य करू शकतो आणि या सत्ताशक्तीचा उच्छेदही माणूसच करू शकतो.''  ''विचार म्हणजे वाचनाने, अध्ययनाने, व्यासंगाने मेंदूत साठविलेले विचार.'' ''क्रांतीचा विचार असो वा शांतीचा, तो रक्तापर्यंत पोहचवावाच लागतो.  तरच तो जीवनाला ऊब आणतो.  विधायक विचाराचे बी रक्तात भिजत घातले, रुजवले तरच त्याला कोंब फुटतात आणि कालांतराने मूळ धरते.  अशी इतिहासाची साक्ष आहे.''...... परंतु पुढे-पुढे बोलून विचार करावा, यापेक्षा विचार करून बोलावे.''  ''खरे म्हणज लोकांना योग्य तर्‍हेने, योग्य ठिकाणी नेतो, तो नेता.  उदात्त उदाहरण घालून देणे, प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करणे म्हणजे नेतृत्व करणे होय.''  ''नेता हा नीतीमान असावा लागतो तसा तो असलाच पाहिजे.''...  ''श्रद्धा ही शक्ती आहे.  सत्य धारण करते, ती श्रद्धा.  सत्याचा पाठपुरावा हा त्या अर्थाने श्रद्धेचाच पाठपुरावा असतो.''  अशा काही उदाहरणांवरून यशवंतरावांची वैचारिता लक्षात तर येतेच.  यशवंतरावांच्या लेखनातील आशयाचा आविष्कार कसा होता हे वरील त्यांच्या शैलीवरून सहज लक्षात येते.